Eknath Shinde Vs Shivsena : बंडखोर आमदार मुंबईच्या वाटेवर, विमानतळावर स्वागताची जय्यत तयारी, 11 दिवसांनी राज्यात परतणार
Maharashtra Political Crisis : बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार आज मुंबईत येत आहेत.
मुंबई: उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपद निवड आणि सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत येत आहेत. गोव्यातून हे आमदार निघाले असून सव्वा तासामध्ये मुंबईत येणार असून त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी तदडा बंदोबस्त ठेवला आहे.
तब्बल 11 दिवसांनंतर शिंदे गटाचे आमदार हे मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज डोमेस्टिक एयरपोर्ट च्या गेट क्रमांक 9 मधून ते बाहेर पडतील. त्या ठिकाणी आता ढोल ताशे आणण्यात आले असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमदार ज्या मार्गाने जाणार त्या मार्गावर विशेष कॉरिडॉर पोलिसांनी केला आहे. तीन विशेष बसच्या माध्यमातून हे आमदार एयरपोर्टमधून बाहेर येतील.
गोव्यातून बंडखोर आमदार मुंबईत येत असल्याने मुंबई पोलीस सतर्क असून सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलीस गिरगांव चौपाटीजवळ रस्त्यावर कोणतेही वाहन उभे करू देत नाहीत. कारच्या क्रमांकाच्या मदतीने ते मालकांशी संपर्क साधून त्यांना कार काढण्यास सांगत आहेत. या बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांचे सर्व कर्मचारी गस्त आणि राऊंडअपवर आहेत. त्यासाठी मुंबईत एअरपोर्ट ते ओबेरॉय हॉटेलपर्यंत जागोजागी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करत हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार पहिला सुरतमध्ये गेले, त्यानंतर ते आसाममध्ये गुवाहाटीला गेले. एकनाथ शिंदे मुंबईला आल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार गोव्याच्या ताज कन्वेंशन सेंटर हॉटेलमध्ये राहिले. उद्या विधानसभा सभापतींची निवड आहे, तसेच सोमवारी एकनाथ शिंदे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आमदार आज मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे.
उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड
विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात अध्यक्ष महोदय असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे. दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे.