Uddhav Thackeray : 'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…' 'वर्षा'वरून निघताना उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य, संघर्षाला आता भावनिक वळण
Maharashtra Political Crisis : जनतेला तसचे शिवसेनेच्या आमदारांना संबोधन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'वर्षा' निवासस्थान सोडलं असून ते 'मातोश्री'कडे रवाना झाले आहेत.
मुंबई: ज्यांना जायचं आहे त्यांनी जा... असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 'वर्षा'वरून 'मातोश्री'कडे जाताना उद्धव ठाकरे असं बोलले आणि निघून गेले. उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पाहायला मिळतंय.
तिकडून काय सांगता, तोंडावर सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी तसेच बंडखोर आमदारांशी संवाद साधला. तुम्ही इकडे या, आणि मला सांगा, मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही लायक नाही, मी लगेच राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला 'वर्षा' बंगला आजच सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडलं.
वर्षा निवासस्थान सोडताना त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, ज्यांना जायचं आहे त्यांनी जा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले आणि निघून गेले. उद्धव ठाकरेंच्या भावनिक भाषणावर एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देणार नाही अशी माहिती मिळाली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको असं तोंडावर सांगावं. मी आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो... जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबुरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत... तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन."
पक्षप्रमुख म्हणून मी राजीनामा द्यायला तयार
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे... त्यानी मला थेट सांगावं. हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार.... माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे."