Devendra Fadanvis : सरकार अल्पमतात, त्यामुळे त्यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत; भाजपची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra Political Crisis : राज्यपाल महाविकास आघाडीला योग्य ते निर्देश देतील अशी आशा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई: राज्यातल्या सत्तानाट्यात आता भाजपची एन्ट्री झाली असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी मागणी भाजपने राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल यावर योग्य तो निर्णय घेतील असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यपालांना एक ई-मेलच्या माध्यमातून बंडखोर आमदारांनी पत्र दिलं आहे. शिवसेनेचे 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत रहायचं नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करुन राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे."
भाजपची एन्ट्री
शिवसेनेची बंडखोरी ही त्या पक्षाची अंतर्गत बाब आहे असं सांगत आतापर्यंत त्यापासून हात झटकणारा भाजप आता अचानक या सत्तासंघर्षाच्या केद्रस्थानी आला आहे. आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीनंतर लागोलाग फडणवीस हे दिल्लीमध्ये आले आणि संध्याकाळी त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक बोलावली. भाजप नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर या नेत्यांनी थेट राजभवन गाठलं आणि राज्यपालांची भेट घेतली.
व्हायरल होणारे पत्र राजभवनचे नाही
दरम्यान भाजपकडून राज्यालांना बहुमत चाचणीसाठी पत्र देण्यात आलं असल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि त्यासंबंधीचे एक पत्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे अशा प्रकारचे कोणतंही पत्र आपल्याला मिळालं नाही, किंवा राजभवनाने विशेष अधिवेशनाचे कोणतेही पत्र काढलं नसल्याचं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
व्हायरल होणाऱ्या पत्रात काय आहे?
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना बहुमत चाचणीचं पत्र दिल्याची बातमी व्हायरल झाली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी 30 तारखेला विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती सर्वत्र पसरली. तसेच या संबंधी एक पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं. असं असलं तरी या पत्रावर कोणाचीही सही नव्हती.