मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात आज 12 हजार कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी 68 रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. यापैकी सर्वात जास्त म्हणजे 40 रुग्ण हे मुंबईतील असून त्यानंतर 14 रुग्ण पुण्यात सापडले आहेत. 


राज्यातील आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ओमायक्रॉनचे 68 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी मुंबईमध्ये 40, पुण्यामध्ये 14, नागपूरमध्ये 4, पुणे ग्रामीण आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 3, कोल्हापूर, नवी मुंबई, रायगड आणि सातारा या ठिकाणी प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. 


राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनची एकूण रुग्णसंख्या 578 इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील असून ती संख्या 368 इतकी आहे. त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागत असून पुणे शहरात आतापर्यंत 63 रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत सापडलेल्या 578 रुग्णांपैकी 259 रुग्ण हे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी 26 रुग्ण हे राज्यातील नागरिक आहेत. तर 9 रुग्ण हे परदेशी नागरिक आहेत. 7 रुग्ण हे ठाणे तर 4 रुग्ण हे कोल्हापूरातील आहेत. 


दरम्यान, राज्यात आज तब्बल  12 हजार 160 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1748 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आज  11  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 52 हजार 422 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 14 हजार 358 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे.


महत्त्वाच्या बातम्या :