बीड: मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनी धनदांडग्या लोकांनी बळकावल्याची बातमी ताजी असतानाच अशाच प्रकारचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. बीडमध्ये चक्क एका दर्ग्याच्या जमिनीवर आलेल्या पंधरा कोटी रुपयांचा शासनाचा मावेजा बळकावण्यासाठी त्या जमिनीवर प्लॉटिंग पाडून विकण्याचा घाट महसूल विभागामधील काही अधिकाऱ्यांनी घातल्याचं समोर आलं आहे. या विरोधामध्ये आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
खिदमतमास जमीन असताना बनावट दस्तावेज बनवून उपजिल्हाधिकारी आघाव यांनी मदतमास करून खालसा केली. बीड शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्गाची 796 एक्कर 37 गुंठे जमिनीपैकी 405 एकर 5 गुंठे जमीन, बनावट दस्तावेज तयार करून खालसा केलीय. भूमाफियांनी यामधील काही जमिनीवर प्लॉटिंग करून जमीन विकली असल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान, या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असून या जमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने, तब्बल 15 कोटी रुपयांचा मावेजा शासन दरबारी पडून आहे. त्यामुळं आरोपी भूमाफियांनी हा मावेजा उचलण्यासाठी नामी शक्कल लढवली असल्याचं तक्रारीत म्हटलंय. या संदर्भात मूळ तक्रार सादेक बाबामिया इनामदार यांनी केली होती. दोषींवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली.
बीड जिल्ह्यात देवस्थान व मुस्लिम धार्मिक स्थळ, वक्फ बोर्डची जमीन हडपल्या प्रकरणी महसूल मधील बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यात तीन गुन्हे दाखल झाले असतांना आता चौथा गुन्हा देखील दाखल झाला आहे. बीड शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्ग्याला गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. दर्गाची तब्बल 405 एक्कर जमीन बनावट दस्तऐवज बनवून, महसूलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी लाटली आहे. याप्रकरणी बीडमधील महसूलच्या उपजिल्हाधिकारी यांच्यासह 15 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा वक्क बोर्ड अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून मुस्लिम धार्मिक स्थळ दर्गा, जमीन गैर व्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याच्यासह,15 जणांवर गुन्हा दाखल झालाय. यामध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
दरम्यान, या गुन्ह्यात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव-पाटील यांच्यासह हबीबोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी,रशीदोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, कलीमोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, सलीमोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, अशफाक गाँस शेख, अजमतुल्ला पि. रजाउल्ला सय्यद,अजीज उस्मान कुरेशी, महसूल साहय्यक खोड, महसुल सहाय्यक मडंलिक, मंडळ अधिकारी पी.के.राख तत्कालीन तलाठी हिंदोळे, पी एस.आंधळे तत्कालीन तहसिलदार व अभिलेख विभागातील महसूल अधिकारी या 15 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :