corona vaccine India : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी देशात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली. त्यानंतर आतापर्यंत देशात लाखो लोकांनी लस घेतली. पण, गेल्या काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यत लसीकरण मोहिमेअंतर्गत देण्यात येणाऱ्या लसी एक्सपायर झालेल्या असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या प्रसारमाध्यमांचा दावा फेटाळून लावला आहे. भारतातील नागरिकांना मुदत संपलेल्या लसी दिल्या जात आहेत अशा आशयाच्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत भारतातील नागरिकांना मुदत संपलेल्या लसींचे डोस दिले जात आहेत, असा आरोप करणाऱ्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. या बातम्या चुकीच्या आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलंय. सीडीएससीओ या संस्थेने यापूर्वीच कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसींची साठवण मुदत वाढवली आहे. कोवॅक्सिनची मुदत 12 आणि कोव्हिशिल्ड मुदत 9 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
केंद्रीय औषध मानके नियंत्रण संघटना म्हणजेच सीडीएससीओने 25 ऑक्टोबर 2021 रोजी, कोवॅक्सिन या लसीची साठवण मुदत मर्यादा 9 महिन्यांवरून वाढवून 12 महिने केली होती. त्याच प्रकारे 22 फेब्रुवारी 2021 रोजी कोव्हिशिल्ड लसीची साठवण मुदत मर्यादा 6 महिन्यांवरून वाढवून 9 महिने केली होती, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही लसींच्या कार्यक्षमता स्थिरतेच्या अभ्यासाविषयी लस निर्मात्यांनी दिलेल्या माहितीचे परीक्षण तसेच समावेशक विश्लेषण यांच्या आधारेच राष्ट्रीय नियामक संस्थेने या लसींची साठवण मुदत मर्यादा वाढविली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही आरोग्य मंत्रलायकडून करण्यात आले आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live