(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Water Issue: राज्यात पाणीटंचाईचे चटके; राज्यातील 455 गावांना 401 टँकरने पाणीपुरवठा
राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई जाणवत असून, यात ग्रामीण भागाचा अधिक समावेश आहे. त्यामुळे राज्यभरात आजघडीला 401 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
Water Issue: राज्यातील अनेक गावांना आणि वाड्यांना पाणी टंचाईचे चटके जाणवत असल्याची चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाण्याच्या टँकरमध्ये वाढ झाली असून राज्यात 455 गावांना 401 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची आकडेवारी समोर अली आहे. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत 46 टँकरची संख्या वाढली आहे. तर सर्वाधिक टँकर नाशिक जिल्ह्यात सुरु असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.
महिनाभरापूर्वी राज्यात 113 टँकर सुरु होते. मात्र मे महिन्यात टंचाई वाढली असल्याचे दिसून येत आहे. राज्यात 89 शासकीय तर 312 खाजगी टॅंकरने टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात 455 गावे आणि 1081 वाड्यांवर सद्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक 71 टँकर नाशिक जिल्ह्यात सुरु आहे. त्यापाठोपाठ पुणे 54 टँकर, रत्नागिरी 33 आणि ठाण्यात 32 टँकर सुरु आहे.
कोणत्या विभागात किती टँकर...
राज्यात सद्या 455 गावांना 401 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात कोकणात 101 टँकर, नाशिक विभागात 102 टँकर, पुणे विभागात 70 टँकर, मराठवाडय़ात 59 टँकरने तर अमरावती विभागात सर्व 69 टँकर सुरु आहे. त्यामुळे नाशिक विभागात सर्वाधिक टँकर सुरु असून लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
'या' जिल्ह्यांना फटका...
पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसताना पाहायला मिळत असून नाशिकमध्ये सर्वाधिक 71 टँकर सुरु आहे. तर नाशिकमध्ये 81 गावे आणि 117 वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे 14 शासकीय तर 117 खाजगी टँकर नाशिकमध्ये सुरु आहे. त्यांनतर पुण्यात 51 गावे आणि 270 वाडयांना 54 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. ज्यात 9 शासकीय आणि 45 खाजगी टँकरचा समावेश आहे.
गेल्यावर्षीपेक्षा परिस्थिती वेगळी...
गेल्यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र यावेळी गेल्यावर्षीपेक्षा पाणी टंचाई अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण गेल्यावर्षी या काळात राज्यात 388 टँकर सुरु होते. तर 497 गाव आणि 837 वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी 11 टँकरची संख्या वाढली असून ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.