Shirdi : शिर्डीत रामनवमी उत्सवात साईंच्या झोळीत साडेचार कोटींच दान
Shirdi Ram Navami : शिर्डीत 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान 4 कोटी 57 लाखांचे दान संस्थानला प्राप्त झाले असून या तीन दिवसात पावणे तीन लाख साईभक्तांनी साई दर्शन घेतले आहे.
शिर्डी : दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यावर्षी साईंच्या शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान तीन दिवसीय उत्सवात लाखो साईभक्तांनी शिर्डीत दर्शना बरोबर साईंच्या झोळीत भरभरून दान टाकलं. तीन दिवास चाललेल्या उत्सवादरम्यान साईंच्या झोळीत साडेचार कोटींचे दान जमा झाले असून यात सोने चांदीसह परकीय चलनाचा देखील समावेश आहे.
9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान 4 कोटी 57 लाखांचे दान संस्थानला प्राप्त झाले असून या तीन दिवसात पावणे तीन लाख साईभक्तांनी साई दर्शन घेतले आहे. तर 1 लाख 66 हजार भक्तांनी प्रसादलयात भोजनाचा स्वाद घेतला. तर या तीन दिवसात 2 लाख 29 हजार हजार लाडूंची विक्री झाल्याची माहिती साई संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
गेली दोन वर्ष असलेले निर्बंध हटविण्यात आल्याने यावर्षी राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या. साईबाबा हयात असताना देखील हा उत्सव मोठा उत्साहाने साजरा करत होते. आजही साई संस्थान आणि गावकरी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. तीन दिवस अनेक कार्यक्रमाची रेलचेल शिर्डीत असते. पंढरपूर प्रमाणे शिर्डीलाही अनेक पायी पालख्या येतात. राज्यभरातून शेकडो पालख्या शिर्डीत दाखल होतात. साईनामाचा गजर करत खांद्यावर पालखी घेऊन नाचत गात अनेक भक्त शिर्डीत आल्याने रामनवमी उत्सवाला मोठी रंगत आली आहे.
दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या उत्सवात ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कुस्ती स्पर्धा, तमाशा, दीड एकरवर साकारणारी साईंची रांगोळी हे उत्सवाचं प्रमुख आकर्षण असते. रामनवमी निमित्त शिर्डीत 40 हजार स्क्वेअर फूट आणि 10 टन रांगोळी वापरून साईबाबांची प्रतिमा साकारली. शिर्डीत साई दर्शनासाठी (Shirdi Sai Baba Darshan) सक्तीचा असलेला बायोमेट्रिक पास बंद करण्यात आल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळालाय. भाविकांची होणारी ससेहोलपट आता थांबली असून वेळेची देखील आता बचत होणार आहे. यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.