PM Narendra Modi In Dehu: मोदींच्या दौऱ्यामुळे देहू नगरीला छावणीचं स्वरुप, तीन हजार पोलीस तैनात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्यामुळे देहू परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त केला आहे. परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. सुमारे तीन हजार पोलीस देहूत तैनात केले आहे.
PM Narendra Modi In Dehu: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (14 जून) देहूत येत आहेत. त्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. यामुळे परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त केला आहे. परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने मुख्य मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मंदिर परिसरात पास धारकांनाच प्रवेश दिला जात आहे.
देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत 22 एकरच्या मैदानात सभा होईल. त्यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी स्क्रीनही उभारल्या आहेत. या ठिकाणापासून जवळच तीन हेलिपॅड उभारले आहेत. दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधानांचे आगमन होईल. मोटारीने परंडवाल चौक, मुख्य कमानीमागे ते चौदा टाळकरी कमानीपर्यंत पोहोचतील. तेथून मुख्य मंदिरापर्यंत मंडप उभारला आहे.
या दौऱ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. त्यात 10 उपायुक्त, 20 सहाय्यक आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 295 सहाय्यक निरिक्षक, 2,270 कर्मचारी यासोबतच एसपीजी, एनएसजी, सीआरपीएफ, एसआरपीएफ.फोर्स वन पथकही तैनात आहेत. चारशे वारकरी टाळ-मृदंगांच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत. शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर मोदी माळवाडीच्या सभामंडपाकडे जातील.
देहू संस्थानने मार्च महिन्यात मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून मोदींनी येत्या 14 जूनची वेळ दिली होती. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू इथे येणार आहेत.
बंद राहणारे रस्ते व पर्यायी मार्ग
- मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड ऑडनन्स फॅक्टरी कमान ते गाव रस्ता वाहतुकीसाठी बंद राहतील त्यासाठी निगडीतील भक्तीशक्ती चौक, त्रिवेणी नगर तळवडे कॅनबे चौैक हा पर्यायी रस्ता असतील.
- तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौैक महिंद्रा सर्कल रस्ता बंद राहिल त्यासाठी तळवडे गावठाण- चिखली ते डायमंड चौक, मोईगाव मार्गे निघोजे एमआयडीसी हा पर्यायी मार्ग सुरु असतील.