Nashik News : मोहाच्या फुलांपासून लाडू, बर्फी, बिस्कीट, भाकरीसह सतरा पदार्थ, जाणून घ्या रेसिपीसह आरोग्याचे फायदे
Nashik News : मोह फुलांपासून आदिवासीबहुल (Tribal Community) भागातली महिलांनी तब्बल सतरा प्रकारचे पदार्थ बनविण्याचा विक्रम केला आहे.
Nashik News : मोहाची फुल (Butter Tree) म्हटलं की मोहाची दारू नजरेसमोर येते. मात्र याच मोह फुलांपासून आदिवासीबहुल (Tribal Community) भागातली महिलांनी तब्बल सतरा प्रकारचे पदार्थ बनविण्याचा विक्रम केला आहे. लाडू, बर्फी, बिस्कीट, भाकरीसह सतरा पदार्थ बनवून केली जात असल्याची माहिती आदिवासी महिला व्यावसायिकाने सांगितले नाशिक (Nashik) शहरात आदिवासी दिनानिमित्त जनजाती गौरव दिवसाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राजभरात स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये मोह फुलांपासूनच्या पदार्थांची माहिती मिळाली.
नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानात चार दिवशीय जनजाती गौरव (Janjati Gaurav) दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या उदघाटन केले. तर या महोत्सवात राज्यभरातून अनेक आदिवासी संघटना, बचत गट आदींनी सहभाग घेतला.तसेच या ठिकाणी दीडशेहून अधिक स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये नंदुरबार येथून आलेल्या सुरेखा गावित यांनी मोह फुलांपासून बनविलेल्या सतरा प्रकारच्या पदार्थांचे प्रदर्शन मांडले होते. तर यामागील दोन दिवसांत या पदार्थाना प्रेक्षकांनी पसंतीही दिली. यामध्ये मोह फुलापासूनच्या भाकरी पासून ते गोड पदार्थांपर्यत मेजवानी असल्याने अनेकांनी या पदार्थांना पसंती दिली. शिवाय आरोग्यास महत्वपूर्ण असल्याने महोत्सवात मोह फुलांपासूनचे पदार्थं चर्चेचा विषय ठरला.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबक परिसरात आजही अनेक ठिकाणी अनधिकृत रित्या मोह फुलांची दारू बनवली जाते. मात्र वागवीत यांनी दारू न बनविता दारूबंदी करून याच फुलांचे जास्त आहारमूल्ये असलेले लाडूसह इतर पदार्थ बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्याचे ते म्हणाल्या. दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊन लागल्यापासून हाताला काम नव्हते. दरम्यान मोह फुले वेचण्यासाठी जात असू, यातूनच मोह फुलांपासून इतर पदार्थ बनविण्याची कल्पना सुचली. आज मोठी मागणी या पदार्थाना असल्याचे सुरेख गावित यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे, या लाडवांमुळे कुपोषणावरील एक उत्तम पर्याय समोर आला आहे.
दरम्यान या मोह फुलांपासून सुरेखा गावित यांनी सतरा पदार्थ बनवले असून ते विक्रीसाठी नाशिकच्या आदिवासी महोत्सवात लावण्यात आले होते. यामध्ये लाडू, चटणीचे तीन प्रकार ओली मिरची, लाल मिरची, चकली, चकलीचे तीन प्रकार, शंकर पाळे, पेठा, बर्फी, भाकरी, केक, बिस्कीट, बोर्नव्हिटा, बालुशाही, डोनट आदीसंह महोत्सवात सर्वाधिक विकला गेलेला व शरीरासाठी महत्वाचा असलेला लाडू हा पदार्थही त्यांनी बनविले आहेत. विशेष म्हणजे मोहफुलांमध्ये प्रथिने, कॅल्शिअम, खनिजे, तंतूमय पदार्थ, ऊर्जा आणि ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मोह फुलांच्या पदार्थांपासून व्यक्तीला चांगला आहार या माध्यमातून मिळू शकतो, अशी माहिती देखील गावित यांनी दिली.
असे बनवले जातात पदार्थ
ग्रामीण भागात मोहाची झाडे मुबलक असून या झाडांना मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान फुले येतात. ही फुले झाडावरून गळून पडतात. ती गोळा करून सुकविली जातात. या फुलांमध्ये काही घटक मिसळून त्याचे लाडू तयार करतात. हे लाडू वनविभागाने माळशेज घाट रस्त्यावरील नाणे घाट प्रवेशद्वाराजवळील विक्री केंद्रावर ठेवले असून पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी मोहफुलांपासून लाडू, जॅम, सरबत, पुरणपोळी यांसारखे पदार्थ बनवतात. मुरबाडमधील आदिवासी महिलांनी देखील त्याची माहिती घेऊन मोहफुलांचे लाडू बनविण्याचा गृहउद्योग सुरू केला आहे. या लाडवांना चांगली पसंती मिळते आहे.
उपजीविकेचं नवं साधनं
मोहाची फुल गोळा कारण म्हणजे जिकिरीचं काम असून पहाटे उठून ही फुल गोळा करावी लागतात. कारण मोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे त्यांचा टिकवण कालावधीही अत्यंत कमी आहे. सुरवातीला फक्त मोह फुलांची दारू बनते. एवढेच माहिती उपलब्ध होती, मात्र आता अनेक पदार्थ बनवून त्यातून व्यवसाय उभारू शकतो, येऊ आदिवासींना ज्ञात झाले आहे. शिवाय आरोग्यासाठी देखील मोह फुले महत्वाची असल्याने या पदार्थांना मागणी देखील आहे. दूध आणि मनुक्यापेक्षा मोहफुलांमध्ये प्रथिनं आणि जीवनसत्व तिपटीनं अधिक असतात. त्यामुळे आगामी काळात हा व्यवसाय उद्योगांत रूपांतर होऊ शकतो.