![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik News : मंत्री दादा भुसे, झिरवाळ संपर्क कार्यालय एकच, फलकही झळकले, कार्यकर्ते संभ्रमात
Nashik News : एकाच संपर्क कार्यालयावर दादा भुसे (Dada Bhuse) आणि नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या नावाचे फलकाने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
![Nashik News : मंत्री दादा भुसे, झिरवाळ संपर्क कार्यालय एकच, फलकही झळकले, कार्यकर्ते संभ्रमात maharashtra news nashik news Name plaques of Bhuse, zirwal at the same contact office Nashik News : मंत्री दादा भुसे, झिरवाळ संपर्क कार्यालय एकच, फलकही झळकले, कार्यकर्ते संभ्रमात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/04/cd32ff30425b72aebd37696319faa69b166753995210989_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नाशिकच्या (Nashik) पालकमंत्री पदाची धुरा मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी स्वीकारली. मात्र भुसेंचे संपर्क कार्यालय मालेगाव (Malegaon) येथे असल्याने नाशिकच्या नागरिकांना जाणे येणे जिकिरीचे झाले होते. या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी थेट नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे संपर्क कार्यालय असलेल्या इमारतीवरच संपर्क कार्यालयाची पाटी झळकविल्याने हे संपर्क कार्यालय नेमके कुणाचे असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे.
दोन महिन्यांपासून जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नागरिक व अधिकाऱ्यांच्या संपर्कासाठी कार्यालय नव्हते. मात्र आता दादा भुसे यांनी जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या उंटवाडी रस्त्यावरील विश्रामगृहाचा ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचेही संपर्क कार्यालय असून भुसे यांच्या संपर्क कार्यालयाचा नाम फलक लावण्यात आल्याने या ठिकाणी आता नेमका कोणाला संपर्क करायचा असा प्रश्न पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांना पडला आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि शिवसेना भाजप युतीतील लोकांचे मतभेद वारंवार समोर येत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सेनेचे मालेगाव बागेचे आमदार दादा भोसे कृषी मंत्री होते. तर दिंडोरीतील राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांची विधानसभेच्या उपसभापती निवड झाली. दोन अडीच वर्षाच्या कालावधीत दोन्ही पक्षांनी एकत्र काम केले. तेव्हापासून ही इमारत झिरवाळांचे संपर्क कार्यालय म्हणून अस्तित्वात होते. तदनंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्ता समीकरणासह स्थानिक राजकारणही बदलले. शिवसेना आणि भाजप सरकारमध्ये दादा भुसे यांची खनिकर्म मंत्रीपदी वर्णी लागली. त्याचबरोबर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. नागरिकांना सहजपणे संपर्क साधता यावा, म्हणून त्यांनाही शहरात कार्यालयाची नितांत गरज आहे. त्यासाठी जागेचा शोध घेत असताना उंटवाडी रस्त्यावरील झिरवाळ यांच्या कार्यालय असलेल्या जागा निश्चित करण्यात आली.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या नाशिकमधील संपर्क कार्यालयासाठी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांचे उंटवाडी रस्त्यावरील सिंचन भवन परिसरातील संपर्क कार्यालय शासकीय यंत्रणेने खाली करून घेतले आहे. या संदर्भात निरोप आल्यानंतर उपसभापतींनी हा विषय प्रतिष्ठेचा न करता जागा सोडण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आता पालकमंत्री भुसे यांचे संपर्क कार्यालय होणार असल्याचे समजताच बांधकाम विभागाने लगबगिने इमारतीची रंगरंगोटी, नव्या फर्निचरची व्यवस्था करीत स्वागताची तयारी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाशिकचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे होते. मात्र त्यांचे शहरात निवासस्थान आणि संलग्न कार्यालय असल्याने त्यांना वेगळ्या संपर्क कार्यालयाची गरज भासली नाही. सध्या दादा भुसे हे पालकमंत्री असून ते मालेगावचे आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांना कामांसाठी नाशिक हे ठिकाण सोयीस्कर ठरते. त्यामुळे त्यांचे नाशिक शहरात कार्यालय गरजेचे होते. त्यासाठी उपसभापतींच्या अस्तित्वातील कार्यालयाची जागा निवडण्यात आली. सेनेतील दोन्ही गटाच्या वादात उपसभापती म्हणून झिरवाळांची भूमिका महत्त्वाची असून हा विषय न्याय प्रविष्ट असल्याने याबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह....
विधानसभेचे उपसभापती झिरवाळ यांचे कार्यालय नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे संपर्क कार्यालयात रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आजही प्रवेशद्वारावर उभयंताचे फलक करतात. कार्यालयाची इमारत कधीकाळी पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह होते. तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकत्व असताना विश्रामगृहाचे पहिल्यांदा संपर्क कार्यालयात रूपांतर झाले. तेव्हापासून सत्ताधारी ही जागा कार्यालयासाठी वापरू लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)