Nashik Crime : फोन पेने नुसते पैसे ट्रान्सफर होत नाहीत, तर संशयितही पकडले जातात, नाशिक पोलिसांची कमाल कारवाई
Nashik Crime : फोन पेने (Phone Pay) नुसते पैसे ट्रान्सफर होत नाहीत, तर संशयितही पकडले जातात, नाशिक (Nashik) पोलिसांची कमाल कारवाई
Nashik Crime : भंगाराच्या माल कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून अपहरण केलेल्या व्यक्तीचा शोध सिनेस्टाइल पद्धतीने पोलिसांनी घेतला आहे. फोन पे (Phone Pay) द्वारे खंडणी पाठविता पाठविता पोलिसांनी चतुराईने लोकेशन मिळवत नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अपहरण करणाऱ्या संशयितास अटक करत अपहरण आलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली.
दरम्यान 14 नोंव्हेबर रोजी मदुराई, तामिळनाडू (Tamilnadu) येथील मुळ रहीवासी असलेल्या व सध्या गुजरातमधील अहमदाबाद येथे कार्यरत असणा-या एका 24 वर्षीय व्यापाऱ्यास अहमदाबाद ते धुळे (Dhule) प्रवासादरम्यान संशयितांनी खंडणीसाठी अपहरण केल्याची माहिती संबंधित व्यक्तीचा भाऊ निलेश भंडारी (मदुराई, तामिळनाडू) यांनी नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Nashik SP Shahaji Umap) यांना फोनव्दारे दिली होती. सदर घटनेबाबत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तात्काळ माहिती देवून शोध घेवून पुढील कारवाईबाबत सुचना दिल्या होत्या. अपहरण झालेल्या व्यक्तीच्या भावाने कळविलेल्या माहितीप्रमाणे तो सटाणा परिसरात असल्याचे समजले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व वडनेर खाकुर्डी पोलीसांनी नाशिक व धुळे जिल्हयाचे सीमावर्ती भागातील जंगल व डोंगराळ परिसरात शोध अपहरण झालेल्या मुरली यांची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुखरूप सुटका केली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 नोव्हेंबर रोजी यातील अपहरण झालेली व्यक्ती मुरली रघुराज भंडारी हे अहमदाबाद ते धुळे प्रवास करीत होते. यावेळी त्यास यातील संशयितांनी फोनव्दारे संपर्क साधून कमी किंमतीत सुझलॉन कंपनीचे तांब्याचे भंगार आणुन देतो असे आमिष दाखवले. त्यानंतर त्यास धुळे बस स्टॅण्ड वरून मोटरसायकलवर बसवून डोंगराळे परिसरात आणले होते. सदर ठिकाणी त्यास मारहाण करून संबंधित व्यक्तीकडून चार हजार रुपयांसह घड्याळ जबरीने काढुन घेतले. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी त्याचा भाऊ निलेश भंडारी यास 03 लाख रूपये खंडणीची मागणी करून पैसे फोन-पे वर न पाठविण्यास सांगितले. शिवाय पैसे न पाठविल्यास दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान निलेश भंडारी यांनी घटनेची माहिती नाशिक पोलिसांना दिली. घटनेबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ पथके रवाना केली. दरम्यान अपहरण झालेल्या व्यक्तीचे नातेवाईकांनी पोलीस पोहचेपर्यंत थोडी-थोडी रक्कम फोन-पेव्दारे खंडणीखोरांना ट्रान्सफर केली व त्याकाळात पोलीस पथकांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास सुरु ठेवला. अशा पद्धतीने पोलिसाना अपहरण झालेली व्यक्ती व खंडणीखोर हे सटाणा परिसरातील भारदेनगर परिसरात असल्याचे स्थान निश्चित केले. त्यानुसार तपास सुरु ठेवून लोकेशनवर पोहचून संशयितांना ताब्यात घेत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली.
या कारवाईत दादाराम अख्तर भोसले, बबलु उर्फ बट्टा छोटू चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे साथीदार श्यामलाल भारलाल पवार, लुकडया फिंग्या चव्हाण, मुन्ना कलेसिंग भोसले, रामदास उर्फ रिझवान भारलाल पवार हे पोलीसांची चाहूल लागताच डोंगराळ भाग व जंगलाचा फायदा घेवून पलायन केले. दरम्यान या प्रकरणाबाबत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस.डी.कोळी हे करीत आहेत.