(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : अवघ्या दोन मिनिटांत होत्याच नव्हतं झालं, नाशिकमध्ये अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) अंगावर गरम पाणी सांडल्याने चिमुकलीचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
Nashik News : नाशिकच्या (Nashik) जुना गंगापूर नाका परिसरातील अपार्टमेंटमध्ये चिमुकलीच्या अंघोळीसाठी गरम पाणी काढले असता, ते अंगावर पाणी सांडल्याने अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली. आवेरा शुभम इंगळे असे मयत चिमुकलीचे नाव आहे. परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकच्या गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरात ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अंघोळीसाठी तापवलेले पाणी काढून ठेवलेले असतानाच बाथरूमध्ये गेलेल्या दहा महिन्यांच्या चिमुकलीचा धक्का लागून तिच्या अंगावर पाणी पडल्याने गंभीररीत्या भाजली. पाच दिवस उपचाराला प्रतिसाद देणाऱ्या चिमुकलीची मंगळवारी प्राणज्योत मालवली. जुना गंगापूर नाका परिसरात असलेल्या राठी आमराई भागातील श्री साई अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या शुभम इंगळे यांची कन्या आवेरा ही शनिवारी खेळतच बाथरूमध्ये गेली. यावेळी अंगावर गरम पाणी पडल्याने ती गंभीर भाजली. तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान गंभीर भाजलेल्या या चिमुरडीवर तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र काल सायंकाळी उशिरा तिचे निधन झाले. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी खेळताना तोल जाऊन हौदात पडल्याने आदि चव्हाण हा बालक बेशुद्ध झाला होता. त्याचाही उपचारावेळी मृत्यू झाला होता. यामुळे बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असून, पालकवर्गानेही अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसाांनी केले आहे.
औरंगाबादची घटनाही हृदयद्रावक
हसनाबाद येथील योगीराज नारायण आकोदे हा पाच वर्षीय बालक आईसोबत खुलताबाद तालुक्यातील सोबलगाव येथे प्रदीप जाटवे या नातेवाइकाकडे आला होता. दरम्यान 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी जाटवे यांच्याकडून पाहुणचार करण्यासाठी वरण बनवण्यात येत होते. याचवेळी वरण बनविलेल्या भांड्याजवळ योगीराज आला. तर यावेळी तोल जाऊन उकळत्या भांड्यात तो पडल्याने तो गंभीर भाजला. त्याला उपचारासाठी तत्काळ औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच योगीराज आकोदे या बालकाचा मृत्यू झाला आहे.
मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्या!
एकीकडे धडकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. अशातच अशा प्रकारच्या अनुचित घटनांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी घर ऑफिस सांभाळून मुलांकडे देखील लक्ष देणं आवश्यक आहे. अनेकदा वस्तू गिळल्याने, अंगावर पाणी पडल्याने, हौदात पडल्याने, स्विमिंग पूल मध्ये पडून बालकांच्या मृत्यूच्या घटना सावर आल्या आहेत. यामध्ये पालकवर्ग आसपास असताना देखील अशा अनुचित घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी सजग राहून मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे.