Nandurbar News : शहादा शहरात खोदकाम करताना सापडलं पुरातन मंदिर, नागरिकांची मोठी गर्दी
Nandurbar News : शहादा (Shahada) शहरातील मढीच्या जागेवर खोदकाम करताना पुरातन मंदिर आढळून आले आहे.
Nandurbar News : शहादा (Shahada) शहराला लागून कुकडेल भागातील शनिमंदिराच्या मागच्या बाजूला पुरातन मढीच्या जागेवर खोदकाम करताना समाधीवजा शिवलिंग, चबुतरा व पादुका आढळून आली आहे. हा परिसर प्राचिन ऐतिहासिक व धार्मिक भाग समजला जातो. त्यामुळेच अनेकदा ऐतिहासिक वास्तू खोदकामात निदर्शनास आल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) शहादा शहराला लागून वाहणाऱ्या गोमाई नदीच्या काठालगत शनि मंदिर आहे. मंदिरापाठीमागे भावसार समाजाची जागा आहे. अनेक वर्षापासून या भागात माणूस फिरकत नाही. स्थानिक गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव यांनी शहरातील जुन्या जाणत्यांकडून माहिती घेत आणि भावसार समाजाचे अध्यक्ष शिरीष भावसार यांच्याशी चर्चा करुन त्या ठिकाणी खोदकाम करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता पाच सहा फूट खोल खोदकाम गेल्यानंतर मंदिराच्या चबुतरा दिसून आला. आजूबाजूची सगळी माती बाजूला काढून चबुतऱ्याखाली समाधी शिवलिंग दिसून आले. याठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
शहादा शहराला पुरातन इतिहास
संपूर्ण जागा साफसूफ करत मंदिराच्या चबुतरावर समाधी शिवलिंग स्वच्छ केले. ही जागा खूप काळापासून ओसाड पडलेली होती. या भागात कोणाचेही येणे जाणे नव्हते. या भागात 150 वर्षांपूर्वीची वसाहत असून देखील या भागात मंदिर सापडेल अशी कोणालाही शाश्वती नव्हती. खोल गल्ली परिसरात राहणारे वेदमूर्ती रमेश गणेश शास्त्री यांच्याशी याबाबत माहिती घेतली असता त्यांनी म्हटले की, शहर गोमाई नदीच्या काठी असल्याने या भागात पुरातन धार्मिक आणि ऐतिहासिक गोष्टी आढळून येत आहेत. यामुळे शहादा परिसरात ऐतिहासिक धार्मिक याबाबतच्या अनेक गोष्टींना इथे उजाळा मिळत आहे. दरम्यान शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ लागले आहे.
वेदमूर्ती रमेश गणेश शास्त्री म्हणाले...
जुनी मढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुकडेल भागातील गौतमेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला शिरीष भावसार यांच्या घराला लागून समाधीवजा शिवलिंग आणि पादुका सापडल्या आहेत. पूर्वीच्या काळी थोर ऐतिहासिक पुरुषांच्या समाधी स्थानी अशाच छत्र्या बनवण्याची पद्धत होती. बऱ्याच वेळा युद्धात धारातीर्थी पडलेल्या लोकांच्या देखील अशा छत्र्या बनवत असत. युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना मानवंदना म्हणून अशा छत्र्या असत. प्रकाशा किंवा जुन्या ऐतिहासिक गावी नदीकाठी अशा अनेक छत्री आढळून येतात. ज्या भागात या वास्तू आढळून आल्या, तो शहाद्याचा सर्वात प्राचीन आणि पुरातन भाग आहे. याच भागात यादव काळातील पंचमुखी महादेव मंदिर तसेच रामेश्वर मंदिर आदी प्राचीन वास्तू आहेत. होळकरांच्या काळातीलही कागदपत्रात या मंदिरांच्या संदर्भात माहिती मिळते.