Maharashtra News LIVE Updates : फ्रान्समधील नेहा आई-वडिलांच्या शोधात महाराष्ट्रात, परळीत शोध सुरु

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Feb 2024 12:46 PM
Bhandara News : विजेच्या तारांच्या सापळ्यात अडकून शेतकऱ्याचा मृत्यू, भंडाऱ्याच्या नेरला शेतशिवारातील घटना

Bhandara News : शेतातील पिकांचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यानं शेतात तारांचं कुंपण लावून त्यात जिवंत वीज सोडली होती. याची कल्पना नसलेल्या एका शेतकऱ्याचा वीज प्रवाहित तारांना स्पर्श झाल्यानं त्यात अडकून मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या नेरला गावाच्या शेतशिवारात काल सायंकाळी उघडकीस आली. विजय तुळशीराम खोब्रागडे (54) असं या मृतक शेतकऱ्याचं नावं आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी शामराव लोहारे या शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मृतक विजय खोब्रागडे हे त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

Malegaon Bombblast : मालेगाव बॉम्बस्फोटाला 18 वर्षे पूर्ण, बडा कब्रस्थान परिसरात चोख बंदोबस्त

Malegaon News : नाशिकच्या मालेगाव मध्ये 2006 ला शब्बे-ए-बरात सणाच्या दिवशी बडा कब्रस्थान सह तीन ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते..या स्फोटात 31 लोक ठार तर शेकडो जण जखमी झाले होते..दरम्यान बॉम्बस्फोट करणारे मुख्य आरोपी 18 वर्ष पूर्ण झाले तरी सरकार त्यांना पकडू शकली नाही, असा आरोप करत कुलजमाती तंजीम 18 वर्षापासून धरणे आंदोलन करीत आहे. बॉम्बस्फोटात जे मृत्युमुखी पडले त्यांना न्याय मिळावा म्हणून आज 'निषेध दिन' पाळला जातो. या पार्श्वभूमीवर बडा कब्रस्थान येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बॉम्ब शोध पथकाच्या सहाय्याने देखील संपूर्ण बडा कब्रस्थान परिसरात पाहणी करण्यात आली.

Nashik Godavari Cleaning : पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीमध्ये वाद

Nashik Godavari River News : गोदा आरतीवरून सध्या पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच आज सकाळी याच रामतीर्थ समितीच्या वतीने गोदावरी नदीची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. रामकुंड, दुतोंडया मारुती परिसर, रामसेतू या सर्व परिसराची समितीच्या सदस्यांच्या वतीने साफसफाई करण्यात आली. यावेळी एस्कॉन तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधकही उपस्थित होते. नदी प्रदूषण मुक्त करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याने आता अशाप्रकारे विविध धार्मिक संस्था पुढे येत असल्याचं बघायला मिळत आहे. 

Malegaon News : मुस्लिम धर्मियांचा आज शब - ए - बारात सण साजरा..

मालेगाव : मुस्लिम धर्मियांमध्ये शब-ए-बारात सणाला विशेष महत्त्व असून या दिवशी आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याची रात्र साजरी केली जाते. मुस्लिम बांधव या दिवशी कब्रस्थान मध्ये दुवा पठणासाठी जातात. आज शब-ए-बारातच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी बडा कब्रस्थान येथे जाऊन आपल्या पूर्वजांच्या कबरीची साफसफाई करून त्यावर रंगरंगोटी केली तसेच या ठिकाणी पूर्वजांच्या स्मरणार्थ कबरीवर फुले वाहत दुवा पठण केले. आज दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत हे दुवापठण तसेच पूर्वजांचे स्मरण करण्यात येणार आहे.

Bhandara Constitution Rally : भंडाऱ्यात संविधान जनजागृती रॅली, सातही तालुक्यात रॅलीला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhandaraa News : संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यात संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली आहे. ही रॅली जिह्यातील सातही तालुक्यात भ्रमण करून नागरिकांना रॅली काढण्यामागील उद्देश समजावून सांगण्यात येत आहे. ईव्हीएम हटाव, देश बचाव, संविधान बचाव, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गास आरक्षण द्या, महागाई निर्देशांकानुसार शेतमालाला हमीभाव द्या, जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण रद्द करा, नोकऱ्यांचे कंत्राटीकरण रद्द करा आणि इतर मागण्यांना घेवून संविधान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सातही ही रॅली पोहचणार असून सध्या या रॅलीला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.

Kolhapur News : गडहिंग्लज शहरात ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा पार पडतेय. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील भाविक या यात्रेत सहभागी होतात, याच यात्रेच्या निमित्ताने भाजपा नेते  शिवाजीराव पाटील यांनी मंदिराला 16 किलो चांदीची प्रभावळ अर्पण केली आहे. गेल्या  वर्षी यात्रेच्या वेळी काळभैरी देवाची काळ्या पाषाणातील मनमोहक मुर्ती पाहून देवाच्या मागे चांदीची प्रभावळ अर्पण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. प्रशासन, नियोजन समिती आणि  गुरव समाजाने ही चांदीची प्रभावळ बसवून घेतली आहे.

Gulabrao Patil : निवडणुका आहेत म्हणून आपण विकास काम करत नाही, सामाजिक काम करतो : मंत्री गुलाबराव पाटील 

Gulabrao Patil : निवडणुका आल्या म्हणून विकास काम असतील किंवा सामाजिक काम करत नाही, विधानसभा निवडणुकांनाच म्हणजे माझ्या मतदानाला अद्याप एक वर्ष अवकाश आहे, परंपरागत दोन वर्षापासून हे काम सुरू आहेत, असं म्हणत जळगाव ग्रामीण मतदार संघातील विकास कामांवरून टीका करणाऱ्या विरोधकांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे. 


राजकारण काय राजकारण सुरूच राहील राजकारण म्हणजे छापा-काटा. कुस्ती होईल तेव्हा पाहून घेऊ. पण जे सामाजिक काम करतो आहे, असं गुलाबराव पाटीलांनी म्हटलं आहे. पाळधी येथे दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत फटकेबाजी केली

 

 
Beed News : फ्रान्समधील नेहा आई-वडिलांच्या शोधात महाराष्ट्रात, परळीत शोध सुरु

Beed News : बीडच्या परळीतील वैजनाथ मंदिर परिसरात 21 वर्षांपूर्वी एका स्त्री जातीच्या अर्भकाला फेकून देण्यात आल होते. या मुलीचे सांत्वन आणि जबाबदारी फ्रान्स येथील कुटुंबांनी घेतली. आता 21 वर्षानंतर ही मुलगी आपल्या मूळ जन्मदात्या आई-वडिलांच्या शोधात परळीमध्ये दाखल झाली आहे.


8 जून 2002 रोजी परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरात टोपलीमध्ये एक लहानगे अर्भक मंदिराचे पुजारी विनायक खिस्ते यांना आढळून आले होते. याची माहिती त्यांनी परळी पोलिसांना दिली. यानंतर हे अर्भक बालकाश्रम पंढरपूर येथे दाखल करण्यात आले. तेथून 29 जून 2002 रोजी प्रीतम मंदिर पुणे या संस्थेत दाखल करण्यात आले. तेथून तिला फ्रान्समधील असंते दांपत्याने दत्तक घेतले. यानंतर तिचं पालन पोषण केल्यानंतर आज 21 वर्षानंतर नेहा आसांते. आपले जन्मदाते आई वडील कोण आहेत? त्याचा शोध घेण्यासाठी परळी या ठिकाणी दाखल झाली आहे.

 

एडवोकेट अंजली पवार यांनी 2020 पासून शोधकार्यास सुरुवात केली. अंबाजोगाईचे दगडू दादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीने पुजारी खीस्ते यांचा शोध घेतला. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड देखील शोधण्यात आले. या मुलीबाबत ज्यांना कुणास माहिती असेल त्यांनी अंजली पवार यांना संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे.
Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर wkt




Ajit Pawar Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांचा आजचा इंदापूर दौरा महत्वाचा मानला जातोय. आज अजित पवार इंदापुरात शेतकरी मेळावा घेणार आहेत.. या मेळाव्याच्या स्टेजवर सुनेत्रा पवारांचा फोटो आकर्षकनाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. मागच्या आठवड्यात हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि पुणे भाजयुमो च्या अध्यक्ष अंकिता पाटील यांनी आम्हाला तीन वेळा फसवलं आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले होते. याची राज्यभर चर्चा झाली होती. त्यातच आज अजित पवारांच्या उपस्थित मेळावा पार पाडतो आहे. 





Wardha News : वर्धा जिल्ह्यात उन्हाळी तीळ लागवडीत वाढ

Wardha News : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना हातची पिके गमवावी लागली. तर रब्बीत भावच मिळत नसल्याने काय पिकवावे आणि काय विकावे? असाच प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळेच वर्ध्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी कपाशी उपडून उन्हाळी तिळाची पेरणी केली आहे. गेल्या दोन वर्षात तीळ या तेलवर्गीय पिकाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी उन्हाळी पीक म्हणून तीळाकडे वळल्याचे चित्र आहे. वर्ध्यात 162 हेक्टरवर तिळाची पेरणी केल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षात हा पेरणीचा टक्का यावर्षी वाढला आहेय. एकरी चार ते पाच क्विंटल तीळ येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याने तिळाला मिळणाऱ्या भावातून अतिवृष्टी आणि हमीभावात बसलेला फटका भरून काढता येईल अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Yavatmal Gutkha Seized : 13 लाखांच्या गुटखासह 23 लाखांचा मुद्धेमाल जप्त

Yavatmal Crime News : राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा तेलंगणातुन पुसदकडे जात असताना उमरखेड शहरातील गावंडे कॉलेजजवळ पुसद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. यात 13 लाखांच्या गुटखा आणि 10 लाखाची बोलेरो (एमएच 26 बिई 812) या क्रमांकाचे पिकअप वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी युनूस खान अन्सार खान (हिमायतनगर, विक्रम शंकर कराळे (पुसद) आणि सय्यद अमीर सय्यद खमर (हिमायतनगर) या तिघांना अटक करण्यात आली. पुसद पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातून 1600 जण अयोध्या दर्शनाला

Yavatmal Pilgrims in Ayodhya : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातील 1600 रामभक्त अयोध्येला आस्था ट्रेनने  रवाना झाले. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे स्थानकावर आस्था एक्सप्रेसला भाजप नेते नितीन भुतडा, श्याम जयस्वाल यांनी भगवा झेंडा दाखवून भक्तांची ही विशेष रेल्वे रवाना केली. आस्था ट्रेनचा धामणगाव ते अयोध्या तब्बल 1450 किलोमीटरचा प्रवास नियोजित आहे.

Chhatrapati Sambhajinagar News : नशेची गोळी विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 600 नशेच्या गोळ्या जप्त

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या पैठणगेट भागात अवैधरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन जणांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल 600 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या असून, दोन्ही आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशेच्या गोळ्यांमुळे मागील अनेक दिवसापासून शहरांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

Hingoli Crime News : रेती माफियाची तलाठी आणि कोतवालला मारहाण, ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा प्रयत्न 

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध रेती वाहतूक होत आहे असा आरोप करत दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार तानाजी मुटकुळे हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये उपोषणाला बसले होते. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यांमध्ये अवैध रेती वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे. अशाच पद्धतीने अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील चीचोली गावांमध्ये गेलेल्या तलाठी आणि कोतवालाला रेतीमातीने मारहाण केली आहे. अवैध रेती वाहतूक रोखणाऱ्या तलाठ्याला रेतीमाफी यांनी ट्रॅक्टरच्या टायर खाली चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या झटापटीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. अत्यंत धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Hingoli Crime : दोन ठिकाणी दुकानचे शटर फोडले, रोख रक्कम पळवत दुकानांचे मोठे नुकसान  

Hingoli News : हिंगोली शहरांमध्ये रात्री दोन चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी एक सायकलचे दुकान फोडले असून त्या दुकान मधील काही रोख रक्कम पळवली आहे. तर, दुसरे हिंगोली शहरातील कापड गल्लीत असलेले एक स्पोर्ट साहित्याचा दुकान फोडले आहे. या दुकानामधील सुद्धा काही रोख रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. या चोरीच्या घटनेमुळे दुकानच्या शटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर या दोन्हीही चोरीचा घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्या आहेत. तीन चोरट्यांनी मिळून ही चोरी केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समजते आहे. दुकानचे शटर तोडून हे चोरटे दुकानामध्ये शिरले आणि दुकानामध्ये असलेली रोख रक्कम या चोरट्यांनी  पळवली आहे. दरम्यान. या ठिकाणी हिंगोली पोलिसांनी भेट दिली असून याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेमका किती ऐवज चोरीला गेला आहे, याची माहिती गुन्हा दाखल झाल्यानंतर कळेल.

Ratnagiri Kashedi Bogda Start : कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग शनिवारपासून सुरू; शिमगोत्सवासाठी कोकणात येण्यासाठीचा मार्ग खुला 
Ratnagiri News : शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग शनिवारपासून सुरू झाला असून, मुंबईहून कोकणात येणारी वाहने या बोगद्याचा वापर करू शकतात. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे. 
Mumbai News : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आज भाजपकडून विकास कामांचा धडाका

Shiv Sena vs BJP : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आज भाजपकडून विकास कामांचा धडाका


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार एकाचवेळी 21 कामांचे भूमिपूजन


वरळी व शिवडीत राहुल नार्वेकरांकडून भूमिपूजनाचा सपाटा


भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही नार्वेकरांसोबत दिसणार मैदानात


वरळीत नार्वेकरांच्या हस्ते भाजपच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन


ठाकरेंच्या भावनिक प्रचाराला विकास कामांतून उत्तर देण्याची भाजपची रणनिती


भूमिपूजनात वरळीसह जिजामाता नगर, अभ्युदय नगर, काळाचौकी, परळ येथील विकासकामांचा समावेश

Nashik Cold Weather : नाशिककर गारठले
Nashik Thandi : नाशिकसह निफाडच्या पाऱ्यात अचानक घसरण झाल्याने हा चर्चेचा विषय ठरलाय. आज निफाडमध्ये चक्क 5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून नाशिक शहरातही 10 अंशांपर्यंत पारा घसरलाय. अचानक पडलेल्या थंडीमुळे नाशिककर सध्या चांगलेच गारठले असून कपाटात ठेवलेले उबदार कपडे पुन्हा बाहेर काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
Bhandara Crime News : कत्तलखाण्याकडं नेणाऱ्या 27 जनावरांची सुटका, चौघांविरुद्ध सिहोरा पोलिसांत गुन्हा दाखलृ

भंडारा : मध्यप्रदेशातून आणलेली 27 जनावरे एका वाहनात निर्दयपणे कोंबून कत्तलखाण्याकडं नेत असताना भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसांनी कारवाई करताना जनावरांना ताब्यात घेऊन सुटका केली. आंतरराज्यीय सीमेवरील बावणथडी प्रकल्पाच्या सोंट्या शेतशिवारातील जंगलाच्या मार्गे ही सर्व जनावरे नागपूर जिल्ह्यातील कत्तलखाण्याकडं नेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. जनावरांच्या अवैध वाहतूक प्रकरणी सिहोरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 1 लाख 29 हजारांची जनावरे ताब्यात घेतली. 


कारवाई करण्यात आलेल्या चौघांची नावं :


1) राजकुमार रामा नागपुरे, 
2) दिनेश तांडेकर, 
3) आशिष चौधरी, तिन्ही रा. मोहगाव नांदी, ता. तिरोडी, जिल्हा बालाघाट
4) हरिचंद बागडे, रा. खंडाळ, ता. तुमसर

Gajanan Maharaj Prakat Din : आजपासून संत गजानन महाराज प्रगट दिनाची विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात

बुलढाणा : देश विदेशातील कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रगट दिन सोहळा आजपासून शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ होत आहे. आज महारुद्रस्वाहाकार यज्ञाने या सोहळ्याचा प्रारंभ होत आहेत. त्यानिमित्त मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक सह राज्यभरातून हजारो दिंड्या या शेगावच्या दिशेने निघाल्या आहेत. आजपासूनच शेगाव शहरात मोठा उत्साह बघायला मिळत आहे. उत्सवानिमित्त मंदिरात रंगरंगोटी, तोरण, केळीचे खांब लावून मंदिराची सजावट करण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News Latest LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.