बीड: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीत गुरुवारी अपेक्षेप्रमाणे हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्याविरुद्ध रान उठवले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही सुरेश धस यांनी पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासमोर त्याच आवेशात बीडमधील विकासकामांच्या नावाखाली पैसे उचलण्यात आल्याचा मुद्दा मांडला. मात्र, विरोधकांना खमक्या भाषेत उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरेश धस यांचा 'परफॉर्मन्स' फार बहरुन दिला नाही. तुम्ही लई मागचे बोलू नका, तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याची लेखी तक्रार करा, असे सांगत अजित पवार यांनी सुरेश धस यांचे बोलणे कापले आणि त्यांना फार वाव दिला नाही. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता. मात्र, ही बैठक संपल्यानंतर बाहेर पडलेल्या आमदार आणि लोकप्रतिनिधींमध्ये अजित पवार आणि सुरेश धस यांच्यात झालेल्या या खडाजंगीची खमंग चर्चा रंगली होती. 


अधिकारांनी कुणाच्याही दबावात काम करण्याची गरज नाही. पोलिसांच्या कामातही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. बीड जिल्ह्यातील कामे दर्जेदार झाले पाहिजेत. जर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क करा, असे अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले.


ही बैठक संपल्यानंतर सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घडलेल्या प्रकारविषयी सारवासारव करण्याचा प्रयत्न. बैठकीत बाचाबाची झाली, पण तो प्रसारमाध्यमांनी चर्चा करण्याइतका मोठा विषय नसल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. डीपीडीसीच्या आजच्या बैठकीत रिअॅप्रोपिएशनबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. आष्टीत जनावारांच्या बाबतीत झेरॉक्स आणि मशीन पोट तपासायचं मशीन त्यासाठी 50 लाख देण्याचा निर्णय झाला. बीडमधील विविध बोगस कामांसाठी तब्बल 73 कोटी रुपये उचलण्यात आले. बोगस कामांसाठी पैसे उचलल्याचा मुद्दा मी उपस्थित केला. तेव्हा अजितदादांनी लेखी पत्र द्या, असे सांगितले. मी त्यानुसार लेखी पत्र तयार केले आहे. बैठकीतील बाचाबाचीचा विषय किरकोळ आहे. मी हे बोगस पैसे उचलल्यासंदर्भातचे पुरावे आणि कागदपत्रे पेनड्राईव्हच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पीएला दिली आहेत, असेही सुरेश धस यांनी सांगितले.



आणखी वाचा


बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?