Passenger plane and US military helicopter crash : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी रात्री एक प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक झाली. अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर गोठलेल्या पोटोमॅक नदीत पडले. विमानात 4 क्रू मेंबर्ससह 64 लोक होते. सीबीएस न्यूजनुसार, आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. वॉशिंग्टन अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रोनाल्ड रीगन विमानतळाजवळ ही घटना घडली. यूएस एअरलाइन्सचे CRJ700 Bombardier जेट आणि लष्कराचे ब्लॅक हॉक (H-60) हेलिकॉप्टर यांच्यात हा अपघात झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये तीन जण होते. अमेरिकन एअरलाईन्सचे विमान कॅन्सस राज्यातून वॉशिंग्टनला येत होते. रात्री 9 नंतर कंपनीने अपघाताला दुजोरा दिला. विमानतळावर सर्व उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आले आहे. 


बचावकार्याला काही दिवस लागतील


वॉशिंग्टन अग्निशमन विभागाचे प्रमुख जॉन डोनेली यांनी अपघाताबाबत दिलेल्या निवेदनात सांगितले की, पाण्यात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. येथील परिस्थिती वाईट आहे. पाणी खूप खोल आणि गढूळ आहे. त्यामुळे बचाव करणाऱ्यांना  डायव्हिंग करण्यात अडचण येत आहे. बचावासाठी काही दिवस लागू शकतात. रशियन न्यूज एजन्सी TASS ने दिलेल्या माहितीनुसार, दोन रशियन फिगर स्केटर येवगेनिया शिश्कोवा आणि वदिम नौमोव्ह हे देखील विमानात होते. दोघांनी 1994 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपही जिंकली होती. दोघांचे लग्न झाले होते.


ट्रम्प म्हणाले, परिस्थिती वाईट, अपघातावर प्रश्न उपस्थित केले


राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, विमान विमानतळाच्या योग्य मार्गावर होते. बराच वेळ हेलिकॉप्टर थेट विमानाच्या दिशेने येत होते. रात्र साफ होती, विमानाचे दिवे लागले होते, तरीही हेलिकॉप्टर वर-खाली का वळले नाही. ट्रम्प यांनी पुढे लिहिले की, त्यांनी विमान पाहिले आहे का हे विचारण्याऐवजी कंट्रोल टॉवरने हेलिकॉप्टरला काय करावे हे का सांगितले नाही? "ही एक वाईट परिस्थिती आहे जी रोखायला हवी होती, हे चांगलं नाही." राष्ट्रीय हवामान सेवेनुसार, विमान अपघातानंतर पाण्यात जिवंत राहिलेल्या प्रवाशांना धोका असू शकतो. वॉशिंग्टनमध्ये तापमान शून्य अंशांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत जे लोक पाण्यात पडतात त्यांना 20-30 मिनिटांत हायपोथर्मिया होऊ शकतो.


इतर महत्वाच्या बातम्या