नवी दिल्ली : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प (Budget 2025) 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून (31 जानेवारी) सुरुवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्या वर्षी निवडणूक असल्यानं पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेला नव्हता. आता निर्मला सीतारामन आठव्यांदा अर्थसंकल्प माडणार आहेत. निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत. त्यापूर्वी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 1970 मध्ये अर्थसंकल्प मांडला होता. 


इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प कधी सादर केला?


अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान इंदिरा गांधी यांच्याकडे आहे. 1969 हे वर्ष भारतीय राजकारणासाठी महत्त्वाचं होतं. इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यावेळी अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई कार्यरत होते. काँग्रेसमधील अंतर्गत  मतभेदांमुळं   मोरारजी देसाई यांना पक्षाबाहेर काढण्यात आलं होतं. त्यामुळं वित्तमंत्री हे पद रिक्त होतं. तीन महिन्यानंतर सादर होणारा अर्थसंकल्प हे इंदिरा गांधी यांच्या सरकारसमोर आव्हान होतं. मोरारजी देसाई यांच्याकडील अर्थमंत्रिपद अतिरिक्त कार्यभार म्हणून पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी स्वत:कडे घेतलं होतं. इंदिरा गांधी यांनी 28 फेब्रुवारी 1970  रोजी अर्थसंकल्प सादर करत इतिहास रचला.स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या महिला नेत्या ठरल्या. 


निर्मला सीतारामन आठव्यांदा अर्थसंकल्प मांडणार


इंदिरा गांधी यांच्यानंतर कोणत्या महिला नेत्याला अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली असेल तर ती निर्मला सीतारामन यांना मिळाली. निर्मला सीतारामन यांनी पहिल्यांदा 2019 मध्ये अर्थसंकल्प सादर केला. 2019 पासून निर्मला सीतारामन यांनी दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. निर्मला सीतारामन यांनी अर्थ मंत्रालयावर आपल्या कामानं प्रभाव निर्माण केला आहे. याशिवाय निर्मला सीतारामन देशाच्या पूर्णवेश संरक्षण मंत्री देखील बनल्या. आता निर्मला सीतारमन 1 फेब्रुवारी 2025 ला आठव्यांदा अर्थसंकल्प मांडतील. 


1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार


संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरुवात होईल. 1 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. त्या बैठकीत अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली जाईल. यानंतर निर्मला सीतारामन या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटतील. राष्ट्रपती अर्थसंकल्प मांडण्यास मंजुरी देतील. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील.  


इतर बातम्या : 


Budget 2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?