Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर...

Maharashtra LIVE Updates : आज दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Feb 2024 02:53 PM
Beed : मराठा समाजानंतर आता धनगर समाजाचाही आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा

Beed News : मराठा समाजानंतर आता धनगर समाज (Dhangar Community) देखील आरक्षणासाठी (Reservation) आक्रमक झाला आहे. रविवारी बीडमध्ये धनगर समाजाच्या वतीने आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळावा घेण्यात येणार आहे. बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हा मेळावा होणार असून या मेळाव्यातून धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे

Abhishek Ghosalkar : मुझे फसाया गया है! मॉरिसचा बॉडीगार्ड जोरजोरात ओरडत कोर्टातून बाहेर, अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी!

Abhishek Ghosalkar Firing News : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मॉरिस नोरोन्हा (Mauris Noronha) या गुंडाने दहिसरमधील एका कार्यक्रमादरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा जागीच मृत्यू झाला होता. घोसाळकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरु आहे. गुन्हे शाखेने मॉरिस नोरोन्हा याचा अंगरक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्रा (Amrendra Mishra) याला अटक केली होती. याच अमरेंद्र मिश्राच्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्याकडून शेतकरी आंदोलनाचे संकेत

Manoj Jarange : सोन्याचे खतांचे, साखर कपड्यांचा भाव वाढला, आमच्या कापसाचा भाव कसा वाढला नाही? पाणी आमच्याच विहिरीचं बाटलीत टाकलं की 20 रुपये किंमत होते, आमच्या गायी-म्हशींचं दूध पिशवीत टाकलं की त्याची कशी किंमत वाढते? कांदा आमचा मसाल्यात टाकला की त्याची किंमत कशी वाढते? देशातील शेतकरी कसे एकत्र येत नाहीत तेच बघू असं सांगत मनोज जरांगे यांनी शेतकरी आंदोलनाचे संकेत दिले आहेत.

Uddhav Thackeray : मॉरिसने गोळ्या झाडल्याचं दिसत नाही, अभिषेक घोसाळकर प्रकरणात उद्धव ठाकरेंकडून मोठी शंका व्यक्त

Uddhav Thackeray : अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडण्यात आल्या. मॉरिस नोरोन्हा या गुंडाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते. मात्र, फेसबुक लाईव्हमध्ये कॅमेऱ्याच्या मागून गोळ्या झाडणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेले नाही. मॉरिस नोरोन्हाला अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर सूड उगवायचा होता मग त्याने स्वत:ही आत्महत्या का केली? हा एकूणच प्रकार संशयास्पद असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. ते शनिवारी मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. 

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर, डॉक्टरांनी सांगितलं मृत्यूचं कारण

Abhishek Ghosalkar Firing Case : मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गुरूवारी गोळ्या झाडून हत्या (Mumbai Dahisar Firing) करण्यात आली, याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपी मॉरिसचा पीए मेहुल पारिख, रोहित साहू आणि मॉरिसच्या अंगरक्षकाला ताब्यात घेतलंय. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले होते, आज अभिषेक घोसाळकर यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा अतिरक्तस्त्राव तसेच हॅमरेज शॉक यामुळे झाल्याचं जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे.

Uddhav Thackrey on Devendra Fadnavis : कलंक, फडतूस नव्हे हे तर मनोरुग्ण गृहमंत्री, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर जहरी वार

Uddhav Thackrey on Devendra Fadnavis : मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. राज्यात निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्याच्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली आहे. फडणवीसांची मानसिक स्थिती स्थिर नाही, राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे. तसेच, सरकार बरखास्त करा, ताबडतोब निवडणुका आणि राष्ट्रपती  राजवट लागू करा, अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

Uddhav Thackeray : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची पहिली मोठी मागणी

Uddhav Thackeray :   राज्यात मागील काही  दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबार,  हल्ला प्रकरणावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना आता शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. हे राज्य सरकार तात्काळ बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. 'मातोश्री' येथे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. 

Nitesh Rane : शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये, नाहीतर नसबंदी करावी लागेल, नितेश राणेंचं वक्तव्य

Nitesh Rane On Sanjay Raut : राज्यातील राजकारण आता एवढ्या खालच्या पातळीवर गेले आहे की, नेतेमंडळी एकमेकांना कुत्र्याची उपमा देत आहेत. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात देखील असेच काही आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. “कुत्रे तुम्ही आहात दिल्लीत जाऊन शेपटी हलवत आहात आणि महाराष्ट्रात मराठी माणसावर भुंकत आहात" असे राऊत म्हणाले होते. तर, त्यांच्या टीकेला उत्तर देतांना "शरद पवारांच्या (Sharad Pawar) निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नस बंदी करायला लागेल" असे नितेश राणे म्हणाले आहेत. 

2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 8.25 टक्के निश्चित

-2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 8.25 टक्के निश्चित 


-मागील तीन वर्षांतला सर्वोच्च व्याजदर, जवळपास साडे कोटी जणांना फायदा होणार 


-2021-22 मध्ये ईपीएफवरील व्याजदर 8.10 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला होता, जो गेल्या चार दशकातील सर्वात कमी व्याजदर होता 


-मार्च 2023 मध्ये 2022-23 साठी ईपीएफवरील व्याजदर 8.15 टक्के जाहीर केला गेला


-दरम्यान, कोव्हिडची परिस्थिती बघाता 2020-21 मध्ये ईपीएफवर 8.5 टक्के व्याजदर होता 


-केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत व्याजदर वाढीसंदर्भात निर्णय

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; जाडेजा, राहुलची वापसी

Team India Announced for England Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. आतापर्यंत त्यापैकी दोन सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील एक सामना इंग्लंडनं, तर एक सामना टीम इंडियानं जिंकला आहे. आता पुढच्या तीन सामन्यांच्या निकालावर कसोटी मालिकेच्या विजयी संघाची घोषणा होणार आहे. अशातच गेल्या दोन सामन्यांत दिग्गज खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला उर्वरित तीन सामन्यांत काहीसा दिलासा मिळणार आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजा आणि स्टार फलंदाज केएल राहुलचं पुनरागमन झालं आहे. पण टीम इंडियाची रनमशीन असलेला दिग्गज विराट कोहलीनं मात्र, इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांमधूनही ब्रेक घेतला आहे. 

Vijay Wadettiwar : अभिषेक घोसाळकर हत्येमागे सत्ताधारी पक्षाचा महिला किंवा पुरुष प्रवक्ता, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं बोट कुणाकडे?

Vijay Wadettiwar नागपूर : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर  (Abhishek Ghosalkar) यांचावरील गोळीबाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून नावालाही कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. हे सर्वकाही वसुलीबाज सरकारचा परिणाम आहे. राज्यात गुंडांचा मुक्त संचार असून घोसाळकर यांचे प्रकरण सत्ताधारी लोकांमुळे झाले आहे. तसेच हा सर्व पूर्वनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. या हत्येमागे सत्ताधारी पक्षातील प्रवक्ता जे नेहमी पुढे पुढे करतात, ती व्यक्ती महिला की पुरुष हे लवकरच कळेल. त्यांनी रचलेल्या कटाचा बळी घोसाळकरांच्या रुपाने गेला, असं वडेट्टीवार म्हणाले. ते शुक्रवारी नागपुरात बोलत होते

 Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरामच्या हत्येनंतर त्यांच्या परिसरात आजही तणावपूर्ण शांतता 

 Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरामच्या हत्येनंतर त्यांच्या परिसरात आजही तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. ते राहत असलेल्या औदुंबर सोसायटीच्या बाहेर कस्तुरबा पोलिसांचे तीन पथक तैनात आहेत. काल या दहिसर बंदची हाक देण्यात आली होती. बंद कडकडीत पाळण्यात आला होता. आज  सकाळ नंतर दुकाने उघडली गेली. घोसाळकर कुटुंब राजकारणात सक्रिय असल्याने त्यांच मोठा चाहता वर्ग आहे. आज घोसाळकर कुटुंबियांच्या सात्वणासाठी नातेवाईक, नेते, विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त आजही ठेवण्यात आला आहे. 

Pune : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन 

Pune : जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, अँड.असीम सरोदे, विश्वंभर चौधरी तसेच आपल्या महिला, युवती व कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले

Sameer Wankhede : शाहरुखच्या पोराला अडकवायला गेले आणि स्वत:च अडकले; CBI नंतर आता ED कडून समीर वानखेडेंना तगडा झटका

ED case On Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत असून अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्या विरुद्ध 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट' (PMLA Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर, ईडीने काही लोकांना समन्स देखील पाठवले आहेत, ज्यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करणार आहे. 

Political News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनिस अहमद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे - धर्मराव बाबा अत्राम

Political News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनिस अहमद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. तसेच अमोल कोल्हे यांची शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असली तरी ते कधी पण अजित पवार गटात येऊ शकतात असे संकेत मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिला आहे. जेथे विद्यमान चार खासदार आमच्या पक्षाचे आहे त्या चार जागा आम्ही लढणारच आहे. यासह भंडारा गोंदिया व गडचिरोली या विदर्भातील या जागे सह 9 जागेवर अजित गटाचा दावा असल्याचे धर्मराव बाबा अत्राम यांनी सांगितले.शरद पवार यांनी आता आराम करून मार्गदर्शकांच्या भूमिकेत राहावे असा हि सल्ला धर्माबाबा अत्राम दिला आहे. महाराष्ट्रात शरद पवार पेक्षा अजित पवार हा मोठा चेहरा आहे. आहे त्यामुळे शरद पवार यांना सहानभूती मिळणार नसल्याचे अत्राम म्हणाले.

Chhatrapati Sambhaji Nagar : संपावर गेलेल्या संभाजीनगरच्या 440 आशा सेविका निलंबित; मनपा आयुक्तांचे आदेश

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) 440 आशा स्वयंसेवीका (Asha Sevika) निलंबित करण्यात आले आहेत. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी याबाबत आदेश काढले आहेत. संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. दरम्यान, आरोग्य विभागाला वेठीस धरू नाही आणि 24 तासात कामावर हजर होण्याची नोटीस अशा सेविकांना देण्यात आले होते. मात्र, या नोटीसकडे दुलर्क्ष केल्याने आणि कामावर हजर न झाल्याने मनपा आयुक्तांनी तब्बल 440 आशा सेविकांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे. 

Anil Ambani : अनिल अंबानींना मोठा झटका, 'या' कंपनीचं मोठं नुकसान

Anil Ambani : बुडत्याचा पाया खोलात अशी मराठीत एक म्हण आहे. अगदी असाच काहीसा प्रकार उद्योगपती अनिल अंबानी (Anil Amban) यांच्या बाबतीत होत आहे. कारण, त्यांच्या कंपन्यांचे सतत नुकसान होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Reliance Infrastructure Ltd) या कंपनीला तिच्या उच्च खर्चामुळं डिसेंबर तिमाहीत 421.17 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात 267.46 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा या कंपनीला झाला होता.

Chalisgaon Firing : चाळीसगावात भाजप माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, कार्यालयात घुसून 5 जणांचा अंदाधुंद गोळीबार

Chalisgaon Firing : भाजपाचे माजी नगरसेवक बाळू मोरे (Balu More Firing Case) यांच्यावर चाळीसगाव येथील कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात ते गंभीर झाले होते. नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे 

ST Bus : राज्यातील पहिली धुळे ते अयोध्या बस आज धावली! तब्बल वीस तासांचा, सोळाशे किलोमीटरचा प्रवास, भाविकांचा उत्तम प्रतिसाद

ST Bus : सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या लाल परीने भाविकांचा प्रवास व्हावा या उद्देशाने धुळे परिवहन महामंडळाने राज्यातील पहिलीच धुळे ते अयोध्या बस सेवा सुरू केली असून आज पहाटे पाच वाजता ही बस आयोध्याच्या दिशेने रवाना झाली. अयोध्या येथे रामललाच्या दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून भाविक विविध मार्गाने जात आहेत. मात्र धुळे परिवहन महामंडळाने पहिल्यांदाच धुळे ते अयोध्या बस सुरू केली असून आज पहाटे पाच वाजता पहिली बस अयोध्येच्या दिशेने रवाना झाली. या बसला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Pakistan Election : पाकिस्तान निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट व्हायला सुरूवात, इम्रान खान यांचा विजयाचा दावा

Pakistan Election : पाकिस्तान निवडणुकीच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे, या निकालाची अद्यापही मतमोजणी सुरूच आहे. मतमोजणीसाठी देखील बराच विलंब होताना दिसत आहे. अशात, माजी पंतप्रधान तसेच 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ'चे (PTI) इम्रान खान (Imran Khan) यांनी विजयाचा दावा केला आहे. इम्रान खान यांनी आपल्या एका भाषणाचा व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ AI आधारित आवाजासह रेकॉर्ड करण्याच आल्याचे समजते. इम्रान खानचा हा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणारे अपक्ष उमेदवार पाकिस्तान निवडणुकीत जागांच्या संख्येच्या बाबतीत आघाडीवर आहेत. इम्रान खान यांनी म्हटंलय, 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ' (PMLN) चे प्रमुख नवाझ शरीफ (Nawaz Shariff) यांची 'लंडन योजना' अयशस्वी ठरली आहे.

Maharashtra Weather : राज्यात पुढील 2-3 दिवस 'या' भागात पावसाची शक्यता

Maharashtra Weather : पुढील दोन दिवस राज्यात पावसाची ( Maharashtra Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.  राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाने याबाबत माहिती दिली असून, आजपासून दोन ते तीन दिवस म्हणजेच 10, 11 आणि 12 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे असं म्हटंलय. पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख. डॉ. के. एस होसाळीकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवणारी माहिती त्यांच्या X अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर विदर्भातील काही भागात देखील हलक्या स्वरुपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण

Manoj Jarange Strike : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची (Maratha Reservation  GR) अंमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) आज पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे. याबाबत जरांगे यांच्याकडून सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबईतील (Mumbai) आंदोलनादरम्यान सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवले होते. मात्र, सरकारने या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे यांनी केली होती. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने आजपासून आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi) मनोज जरांगे आमरण उपोषण सुरू करणार आहे.


 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे आंतरवली सराटीला उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी ते गोदापट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील चौथ्यांदा उपोषणाला बसणार आहेत. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. आज दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.