मुंबई: कोकण रेल्वेच्या मडगाव एक्सप्रेसनं कणकवली येथून मुंबईत येताना एका मुस्लिम कुटुंबाला 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्याचा आग्रह केल्याच्या प्रकारावरून भयभीत झालेल्या या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश हायकोर्टानं जारी केले आहेत. जास्मीन शेख आणि आसीफ अहमद शेख यांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. शेख कुटुंबासोबत घडलेली घटना अतिशय वेदनादायी आहे असं निरीक्षण नोंदवत याप्रकरणाचा योग्य तपास करून आरोपींविरोधात गुन्हा नोंदवा असेही निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहे.


काय आहे प्रकरण?


चेंबूर येथील रहिवासी असेललं शेख कुटुंबीय जानेवारी 2024 मध्ये हे एका धार्मिक उत्सवासाठी सिंधुदुर्गातील कणकवलीत गेलं होतं. 19 जानेवारी 2024 रोजी मडगाव एक्सप्रेसनं ते मुंबईला परतत होते तेव्हा या प्रवासात ही घटना घडली. 30 ते 40 महाविद्यालयीन तरुणांचा एक ग्रुप त्यांच्याच डब्यातून प्रवास करत होता. 


हा ग्रुप मोठ-मोठ्याने गाणी म्हणत होता. आसिफ यांच्यासोबत त्यांच्या दोन लहान मुलीही होत्या. माझ्या मुलींना त्रास होतोय, जोरजोरात गाणी म्हणू नका अशी विनंती आसिफ यांनी वारंवार या तरुणांना केली. तेव्हा त्यातील एक तरुण पुढे आला व त्याने आसिफ यांना त्यांची जात विचारली. आसिफ यांनी मुस्लिम असल्याचं सांगताच त्या तरुणांनी त्यांच्यावर 'जय श्री राम' म्हणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरूवात केली.


आसिफ यांनी तसं करण्यास नकार दिला तेव्हा त्या तरुणांनी त्यांना शिवीगाळ केली. शेख कुटुंबाने याची तक्रार लागलीच रेल्वे पोलिसांकडे केली. रेल्वे पोलिसांनी सहा तरुण आणि एका तरुणीला ताब्यात घेतलं. तेव्हा त्यातील एकजण पळून गेला. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवला नाही, उलट आम्हालाच धमकावलं. याशिवाय एका तरुणानं माझ्या मुलीच्या तोंडावर चहा फेकला. तसेच 'जय श्रीराम' म्हणा अन्यथा पाकिस्तानला निघून जा अशी धमकीही या तरुणांनी दिली होती. राजकीय दबावापोटी याचा तपास कणकवली पोलिसांकडून वर्ग करण्यात आला आहे असा आरोपही या याचिकेतून करण्यात आलाय.


नितेश राणेंचा राजकीय दबाव


भाजप आमदार नितेश राणेच्या सांगण्यावरून हा तपास कणकवली इथं वर्ग करण्यात आला. त्यानंतर आम्हाला धमकावण्यासाठी काहीजण आले होते. आम्ही नितेश राणेची माणसे आहोत, तुम्ही नितेश राणे यांच्याविरोधात काही केलंत तर तुम्हाला ठार मारु अशी धमकीही त्यांनी दिली. पोलीस आम्हाला जेव्हा कणकवली पोलीस ठाण्यात घेऊन गेले तेव्हा तिथं 200 ते 300 जणांचा जमाव उभा होता, ते 'जय श्रीराम'च्या घोषणा देत होते. तसेच तक्रार मागे घेण्यासाठी नितेश राणेंनी पोलिसांसमोरच आम्हाला धमकावलं, असा आरोपही कुटुंबानं याचिकेतून केला आहे.


ही बातमी वाचा: