अकोला: महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला स्वबळावर निवडणूक लढवावी असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलंय. तसेच महायुती सुरू असलेल्या शाब्दीक वादाच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल सुरू असून तीनही पक्षांच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती मिटकरी यांनी दिली. वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात वही आणि पुस्तकांची तुला करण्यात आली. त्यानंतर झालेल्या औपचारिक गप्पांमध्ये ते बोलत होते. 


अमोल मिटकरी म्हणाले की, महायुतीत जर आम्हाला 55 जागा मिळत असतील तर त्यात आम्ही समाधानी असणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडीतील तिन्ही महत्त्वाचे पक्ष सध्या 100 जागांवर दावा करत आहेत. महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला निवडणूक वेगळी लढावी लागेल.


आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर हे मोठं विधान करण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवार गट विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे. 


अमोल मिटकरींकडून अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि मुर्तीजापूर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. 


तीनही पक्षाचे नेते भेटणार


दरम्यान, सध्या महायुती सुरू असलेल्या शाब्दिक वादाच्या पार्श्वभूमीवर महायुतीत आता 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीचे नेते आणि तिन्ही पक्षाचे प्रवक्ते मूंबईत एकत्र भेटणार आहेत. सध्या तिन्ही पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावर होणार चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. 


दरम्यान, सोमवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. या टिकेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात फोनवरून संवाद झाल्याची माहिती आहे.


ही बातमी वाचा: