मुंबई: देशातील ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) नावाची जादू राज्याच्या राजकारणात आजही कायम आहे. गत 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी जुने सहकारी सोडून गेले, पक्षाला मोठी गळती लागली तरीही पावसात भिजून सभा गाजवणाऱ्या शरद पवारांनी निकालातून आपला करिश्मा दाखवून दिला होता. त्यानंतर, यंदाच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी (Loksabha Eelction) पक्षच फुटला, स्वत:चा पुतण्या सोडून गेला, पक्षही पळवून नेले, स्वत:चे अनेक आमदार परके झाले. मात्र, लोकसभा निवडणुकांसाठी पुन्हा जोमाने कामाला लागत शरद पवारांनी नवी फळी तयार केली. लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची मोट बांधून ती टिकवण्याचं काम शरद पवारांनी केलं. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली. याच काळात शरद पवारांन कसदार अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांना फोन केला होता. लोकसभा निवडणुकांपूर्वीचा हा किस्सा नाना पाटेकरांनी आता निकालानंतर उलगडला आहे.
राजनिती, प्रहार, 26/11, यशवंत, क्रांतीवीर यांसारख्या सिनेमातूंन प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेता नाना पाटेकर यांचा स्वभाव परखड. बॉलिवूड आणि सिनेसृष्टीत तापट म्हणून नानांची ओळख आहे. मात्र, वेलकमसारख्या विनोदी चित्रपटात काम केलेल्या नानाचा स्वभाव कधी राजकीय नेत्यांवर भाष्य करुन मजेशीर असल्याचाही पाहायला मिळाला. तर, नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन नाना संवेदनशील झाल्याचंही दिसून आलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना नाना पाटेकर राजकारणात एंट्री करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. पत्रकारांनी नानांना याबाबत प्रश्नही विचारले होते. त्यामुळे, नाना कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार इथपर्यंत सर्वकाही सुरू झालं होतं. याच दरम्यान, माध्यमांतील घाडमोडींचा अचूक वेध घेणार नाही ते शरद पवार कसले, असेच काहीसे घडले. नाना पाटेकर यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेनंतर शरद पवारांनी नाना पाटेकर यांना फोन करुन विचारणा केली होती. स्वत: नाना पाटेकर यांनी लल्लन टॉप या माध्यमांस दिलेल्या मुलाखतीतून या घटनेचा उलगडा केला.
''विविध राजकीय पक्षांच्या मला ऑफर होत्या. परंतु मी स्पष्टवक्ता असल्यामुळे माझ्यासारख्या माणसाचे राजकारणात टिकायचे नाही, हे मला माहिती आहे. उद्या जर पक्षप्रमुखाविषयी मी उलट सुलट बोललो तर त्यांना चालेल का?, त्यामुळे मी राजकारणात पडत नाही, तो माझा प्रांत नाही, असे नाना पाटेकर यांनी सांगितले. तसेच, शरद पवार यांच्या फोनचाही किस्सा उलगडला. लोकसभा निवडणुकीदरम्यान मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या बातम्या टीव्हीवर सुरू होत्या. त्या बातम्या ऐकून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला फोन केला. नाना आपण निवडणूक लढवणार आहात, अशा बातम्या पाहिल्याचं पवार साहेबांनी मला विचारले. त्यावर, या चर्चांत कोणतेही तथ्य नाही. मला जर राजकारणात यायचे असते तर आधी तुम्हालाच सांगितले असते, असे उत्तर मी पवारसाहेबांना दिल्याचा फोनवरील किस्सा नाना एका मुलाखतीत उलगडा.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश
लोकसभा निवडणूक काळात शांत राहिलेल्या नानांनी आता निवडणूक निकालानंतर हा किस्सा सांगितला. दरम्यान, लोकसभा निवडणुकी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवतीत यश मिळालं असून 10 पैकी 8 जागांवर त्यांचे खासदार निवडून आले आहेत. तर, महाविकास आघाडीच्या 30 खासदारांना विजय मिळाला असून सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे, राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचं संख्याबळ आहे. तर, महायुतीकडे लोकसभेच्या 17 जागा आहेत. त्यात, 9 जागांसह भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. शिवसेना शिंदे गट 7 आणि अजित पवारांकडे 1 खासदार आहे.
हेही वाचा
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन