Maharashtra News Updates 4 October 2022 : केंद्रात भाजपसोबत आल्यानंतर शिंदे गटाला मोदी सरकारकडून पहिलं गिफ्ट

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Oct 2022 10:14 PM
विजयादशमी- दसरा सणा निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा क्षण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पुर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी घेऊन येवो, त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 


मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, विजयादशमी म्हणजे वाईटावर विजय मिळविल्याचा आनंदोत्सव. कोविडच्या बिकट संकटावर मात केल्यानंतर खऱ्य़ा अर्थानं आपल्या सर्वांसाठी हा आरोग्याचा विजयोत्सवच आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आता आपल्याला पुढे जायचे आहे. बलशाली महाराष्ट्र उभा करायचा आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रातील प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालावी, अशी आकांक्षा आहे. या विकास पर्वातूनच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असा विश्वास आहे. या ध्यासपूर्तीसाठी आपण एकजुट करूया या आवाहनासह पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमी – दसरा सणाच्या मनापासून शुभेच्छा.!

विजया दशमीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा

विजयादशमीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीच्या पावनपर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावे, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, विजयादशमी हा आपल्या संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण आहे. लोकभावनेला अभिव्यक्त करण्यात आपल्या सणांचे खूप मोठे योगदान आहे. विजयादशमी हा सण समाजातील चांगुलपणाचा, मांगल्याचा तसेच दुष्ट प्रवृत्ती आणि अवगुणावर विजय आहे. या पावनपर्वानिमित्त समाजात चैतन्याला उधाण येते. राज्यातील जनतेला सुख-समृद्धी लाभावी तसेच यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभावी.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा          

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेचा संदेश देत समाजात घडवलेले परिवर्तन अतुलनीय आहे. तथागत गौतम बुध्दांचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यातून समाजसुधारणेचे खूप मोठे कार्य त्यांनी केले आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा, न्यायाचा आणि बंधुत्वाचा विचार सर्वांनी अंगीकारल्यास समाज प्रगतीच्या दिशेने अधिक गतीमान होईल.

केंद्रात भाजपसोबत आल्यानंतर शिंदे गटाला मोदी सरकारकडून पहिलं गिफ्ट

केंद्रात भाजपसोबत आल्यानंतर शिंदे गटाला मोदी सरकारकडून पहिलं गिफ्ट


संसदेच्या स्थायी समितीच्या बदलांमध्ये शिंदे गटाला महत्त्वाच्या समितीचे अध्यक्षपद


माहिती तंत्रज्ञान विषयावरील स्थायी समितीचे अध्यक्षपद बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे


शशी थरूर यांच्याकडे हे अध्यक्षपद होतं आणि ही कमिटी कायम चर्चेत असते त्यामुळे हे पद कुणाला मिळणार याची उत्सुकता होती..

मातोश्री, कलानगर जंक्शन ते शिवतीर्थ, दादरपर्यंत शिवसैनिकांना दिंडीसोबत पायी चालत जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली 

दसरा मेळाव्यानिमित्त मातोश्री, कलानगर जंक्शन ते शिवतीर्थ, दादरपर्यंत शिवसैनिकांना दिंडीसोबत पायी चालत जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली 


५ ऑक्टोबर रोजी दोन गटांचा मेळावा असल्यानं आणि कला नगर जंक्शन संवेदनशील ठिकाण असल्याचं कारण देत ठाकरे गटातील शिवसैनिकांना पायी चालत जाण्याची परवानगी नाकारली 


कलानगर जंक्शनवर होणारा शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटातील संभाव्य संघर्ष टळला?


२०१२ पासून दरवर्षी दसरा मेळाव्यानिमित्त वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ, अनेक रक्तदाते, डॉक्टर्स, विविध महिला बचत गट, उत्तर भारतीय मंडळं इत्यादी मातोश्री ते शिवतीर्थ पायी चालत, वाजत-गाजत जात असतात 


मात्र यावर्षी पोलिसांनी सध्याची राजकीय परिस्थिती बघता परवानगी नाकारली 


वरळी विधानसभेचे उपविभाग प्रमुख अरविंद भोसले यांना खेरवाडी पोलिस ठाण्याचे पत्र 


३० सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत हद्दीत जमावबंदीचे आदेश असल्याचा उल्लेख, उल्लंघन झाल्यास कारवाईची करण्याचे आदेश 


शिवसैनिक उद्या पहाटे शिवतीर्थावरील गणेश मंदिरात पूजा करणार, त्यानंतर सकाळी ११ वाजता शिवसेना भवनावरील तुळजाभवानी मातेची पूजा करणार, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण करत सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंत शिवतीर्थला प्रदक्षिणा मारणार 


शिवसेना भवनावरुन दुपारी ३ ते संध्याकाळी ५ पर्यंत स्वागत मिरवणूक पार पडणार

नागपुरातील दीक्षाभूमी आकर्षक विद्युत रोषणाई

Nagpur : उद्याच्या 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर तसेच मुख्य स्तूपावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा निर्बंध मुक्त वातावरणात साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध बांधव येणार आहेत. त्याच निमित्ताने दीक्षाभूमीला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा उद्या संध्याकाळी दीक्षाभूमी परिसरात होणार असून या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

मोठी बातमी! पीएफआयच्या रडारवर होते वरिष्ठ पोलीस अधिकारी,न्यायाधीश; एटीएसचा न्यायालयात मोठा खुलासा 

देशविरोधात कट रचल्याच्या आरोप असलेल्या पीएफआय संघटनेबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश पीएफआयच्या रडारवर होते अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय सदस्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी एटीएसने ही माहिती दिली आहे. तर पाचही आरोपींची न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


एटीएसकडून न्यायालयात माहिती...


या प्रकरणात आत्तापर्यंत 129 लोकं निष्पन्न झाले असून त्या सर्वांचा रोल वेग-वेगळा असून, त्याबाबत यांचे संबंध तपासायचे आहे. तर आरोपींकडून 10 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि एक हार्ड डिक्स मिळाली आहे.त्यातून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. काही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप आहे. त्यात कोणता आवाज कुणाचा आहे याची तपासणी करणं गरजेचं आहे. काही बँक स्टेटमेंट मिळाले आहे. ज्यात तामिळनाडूमधून ट्रांजेक्शन झाला असून, त्याची तपासणी करण्याची गरज आहे.

Dry Day Nagpur : पाच ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील दारुची दुकाने बंद

नागपूर : जिल्ह्यात पाच ऑक्टोबरपर्यंत नवरात्रौत्सव साजरा होत आहे. पाच ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा साजरा होणार आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबांधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.  विपीन इटनकर यांनी पाच ऑक्टोबर रोजी सर्व (दारुची दुकाने) बंद (Dry Day) ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुध्द नियमानुसार सक्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आदेशात नमूद आहे.

Nobel Prize 2022: तीन वैज्ञानिकांना भौतिकी विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; पाहा विजेत्यांची नाव

Nobel Prize 2022: एलेन एस्पेक्ट (Alain Aspect), जॉन एफ क्लॉजर (John F. Clauser) आणि अँटोन झिलिंगर (Anton Zeilinger) यांना यंदाचा भौतिकी विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 





राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस जामीन मंजूर

Anil Deshmukh Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस जामीन मंजूर झाला आहे. वय आणि खालावलेली तब्येत याचाही दाखला देत देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. अखेर हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. मनी लाँड्रिंग आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप देशमुख यांच्यावर आहे.

नवरात्रोत्सवा निमित्त महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नवरात्रोत्सवा निमित्त महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. कळसुबाई ही देवी खरे तर त्र्यंबकेश्वर पासून ते भिमाशंकर पर्यंतच्या आदिवासी, जमातीच्या समन्वयाचे प्रतिक समजले जाते. मात्र कळसुबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून भाविक याठिकाणी येतात. यावर्षीची गर्दी लक्षात घेता वन विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षात भाविकांना कोरोनामुळे दर्शन घेता आलं नाही. मात्र यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तर अनेकांची नवसपूर्ती दोन वर्ष न झाल्याने नवसपूर्ती साठी भाविक शिखरावर गर्दी करत आहेत. 

पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देत यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिक मुंबईकडे रवाना

Yavatmal News : पन्नास खोके एकदम ओके घोषणा देत उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. झरी तालुका शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागातील शिवसैनिक दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. दसरा मेळाव्यासाठी  शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. तेलंगणा आणि विदर्भ यांच्या सीमेवरील अति दुर्गम  झरी-जामणी तालुक्यातील शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत दसरा मेळाव्याकरिता मुंबईसाठी रवाना झाले. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून शिवसैनिक दसरा मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.

पुणे-बंगलोर महामार्गात बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू

पुणे-बंगलोर महामार्गावरील साताऱ्याच्या हद्दीतील खिंडवाडी या ठिकाणी एका बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गाचा विस्तार होत असताना त्या ठिकाणी वन्यजीव प्राण्यांना जाण्यासाठी एक मार्ग तयार करावा असे वन्यप्रेमी कडून वेळी सांगितलं जात होते.  याकडं दुर्लक्ष झाल्यामुळे आज पर्यंत किमान चार बिबट्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 

दीक्षाभूमी इथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात

Nagpur News : दीक्षाभूमी येथे 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्याला पंचशील ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे. दीक्षाभूमीवर बौद्ध स्तूपाच्या मागील बाजू असलेल्या मैदानावर ोध्वजाचं ध्वजारोहण भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर बुद्ध वंदना ही करण्यात आली. पंचशील ध्वजाच्या पाच रंगांमध्ये तथागत गौतम बुद्धाच्या विचार व्यक्त होत आहे. त्यामुळेच या ध्वजाच्या ध्वजारोहणानंतर खऱ्या अर्थाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली. दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी न्हाऊन निघाली आहे. कोरोनानंतर होणाऱ्या या कार्यक्रमाला देशभरातील सर्वच राज्यातून बौद्ध अनुयायी दर्शनासाठी येत असून लाखो अनुयायी यंदा येतील असा असा दावाही समितीकडून करण्यात आला आहे.

खासदार संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, ईडी कोठडी 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवली

Sanjay Raut Jail : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. त्यांची ईडी कोठडी 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. 10 ऑक्टोबरला राऊत यांच्या जामिनावरही सुनावणी होईलं. त्यामुळे दसरा मेळाव्याला शिवसेनेची तोफ तुरुंगातच असेल.

लोहाऱ्याजवळ बस आणि स्वीफ्ट डिझायरचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

Latur Accident : लोहाऱ्याजवळ बस आणि स्वीफ्ट डिझायरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये पाच जणांच्या मृत्यू झाला आहे. तर एक जबर जखमी झाला आहे. लातूर उदगीर रस्त्यावरील लोहारा गावाजवळ एस टी बस आणि स्वीफ्ट डिझायर गाडीची भिषण धडक झाली. यात स्वीफ्ट डिझायर मधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून एकाजण गंभीर जखमी आहे. उदगीर चाकूर ही बस उदगीर आगाराची असून गाडीचे चाक तुटून पडले होते. तर कारचा चक्काचूर झाला आहे. यावरून अपघात किती भीषण होता याचा अंदाज बांधता येत होता. कारमधील प्रवासी हे तुळजापूर येथून दर्शन घेऊन येत होते अशी माहिती आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी उदगीरच्या सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले आहेत. गंभीर जखमींना तत्काळ लातूर येथे हलविण्यात आले आहे.


मृतांची नावे 



1) अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीरनगर,उदगीर)
2) अमोल जीवनराव देवक्तते  (रा. रावनकोला )
3) कोमल व्यंकट कोदरे (रा. दोरणाळ ता मुखेड)
4) यशोमती जयवंत देशमुख (रा. यवतमाळ) 
5) नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर) 


तर जखमी असलेल्या प्रियांकाला तत्काळ लातूरला हलवण्यात आलं आहे. 

सांगोला तालुक्यात वाळू माफियांची दहशत, वादातून एकाचे घर पेटवलं, अद्याप गुन्हा दाखल नाही

Sangola News:  सांगोला तालुक्यात वाळू माफियांची दहशत वाढल्याचे पाहायला मिळत आहे. थेट घर पेटवण्यापर्यंत वाळू माफियांची मजल गेली आहे. सांगोला तालुक्यातील माण नदीतील अवैध वाळू उपशावरुन झालेल्या वादातून पोपटे वस्ती सांगोल्यातील धनाजी जानकर यांच्या घरात पेट्रोलचे बोळे टाकून घर पेटवले आहे. यामध्ये त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि कागदपत्रांसह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. सदर घटना घडून दोन दिवस झाले तरी अद्याप सांगोला पोलिसांनी वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल केला नाही. सोलापूर जिल्ह्यातील महसूल आणि पोलीस प्रशासन अशा वाळू माफियांवर कधी कारवाई करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकविरा देवीच्या दर्शनासाठी राणा दाम्पत्यांची पदयात्रा सुरू

दरवर्षीप्रमाणं नवदुर्गा महोत्सवामध्ये नवमीच्या दिवशी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा आणि त्यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ता तसंच भाविक भक्तसोबत अंबादेवी आणि एकवीरा देवी यांच्या दर्शनासाठी गंगासावित्री निवासावरून अंबादेवी संस्थान पर्यंत पदयात्रा काढून देवीचे दर्शन घेतात. यावेळी राणा दांपत्य मंदिरात भव्य महाआरती करतात. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते. यावर्षी देखील राणा दाम्पत्यांची पदयात्रा सुरू झाली आहे. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि त्यांचे कार्यकर्ते अंबादेवी, एकविरा देवीच्या दर्शनासाठी पायी जाऊन दर्शन घेतील सोबतच यावेळी महाआरती ते करतील.

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदे एकमेकांचे कपडे फाडतील, मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील : प्रकाश महाजन

Prakash Mahajan on Dasara Melava : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नाहीत तर तिथं नाटकं पाहायला मिळतील असे वक्तव्य मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केलं आहे. दसरा मेळाव्यात ठाकरे शिंदे एकमेकांचे कपडे फाडतील. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अंगावर पडलेले डाग धुवून काढण्याचं काम या मेळाव्यातून होणार असल्याचे महाजन म्हणाले. उद्या (5 ऑक्टोबर) शिंदे गट आणि ठाकरे यांचे वेगवेगळे दसरा मेळावे होणार आहेत. या मेळाव्यावरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अवैध रेती उपसा महाराष्ट्राला लागलेली कीड, राज्यव्यापी धोरण ठरावण्यावर काम सुरु : विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil  : अवैध रेती उपसा महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. रेती उपशाचे राज्यव्यापी धोरण ठरावण्यावर काम सुरु असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. अवैध रेती उपशाचे तुम्ही व्हिडीओ पाठवा तातडीने संबंधित अधिकारी निलंबित केला जाईल असेही विखे पाटील म्हणाले. राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेपेक्षा सध्या सुरु असणाऱ्या काँग्रेस छोडोकडे लक्ष द्यावं असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अस्तित्व राहणे मुश्किल असल्यानं त्यावर काय बोलू असे विखे पाटीसल म्हणाले. पंढरपूर विकास आराखड्याच्या बैठकी इथेच घ्याव्यात आणि यासाठी एक स्वतंत्र अधिकारी देण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.

 

 

Thane : दसरा मेळाव्यासाठी शिंदे समर्थकांची जबाबदारी प्रताप सरनाईकांकडे! कार्यकर्त्यांसाठी दोन लाख जेवणाची पाकिटं तयार

Thane : उद्याच्या दसरा मेळव्यासाठी बीकेसी येथे येणाऱ्या सर्व शिवसैनिकांची खाण्याची जबाबदारी प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांच्याकडून ठाण्यातील प्रसिद्ध आणि उच्चभ्रू प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानाला दोन ते अडीच लाख जेवणाच्या पाकिटांची ऑर्डर देण्यात आली आहे. या पाकिटामध्ये धपाटे, ठेपला, कचोरी, गुलाबजाम असे पदार्थ आहेत.

अजितदादा तुम्ही पुढचे 15 वर्षे निवांत राहा, शहाजीबापू  पाटलांची टोलेबाजी

Shahajibapu Patil:   अजितदादांना पहाटे जाऊन शपथ घ्यायची सवय लागली आहे. त्यामुळं दादांना वाटतंय पहाटे जाऊन शपथ घेतल्यावर सरकार पडेल. पण दादा तुम्ही पुढचे 15 वर्षे निवांत राहा असे म्हणत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू  पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केली. अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरायची पवार फॅमिलीची जुनी सवय असल्याचेही पवार पाटील म्हणाले. शिवतीर्थावर काय शिवसेनेचा मेळावा आहे वाटले का? तिथे तर राष्ट्रवादीचाच मेळावा असेल. स्टेजवर फक्त आमचे उद्धवसाहेब मार्गदर्शन करतील. पण, गर्दी ही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गोळा केलेली असेल असेही पाटील म्हणाले. मात्र खरे वाघाच्या अवलादी असणारे शिवसैनिक बिकेसी वर असतील असेही ते म्हणाले. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


अजूनही सिद्धेश कदम  ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत


शिवसेनेत (Shivsena)  फूट पडल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले.  मात्र असे असले तरी पक्षांतर्गत कलह सुरूच आहे.  रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे देखील शिंदे गटात गेले आहेत. मात्र  रामदास कदम (Ramdas Kadam)  यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम  ठाकरे गटाच्या युवासेनेच्या (Yuva Sena)  कोअर कमिटी कार्यकारणीत आहे. त्यामुळे त्यांना कार्यकरणीत अजूनही स्थान कसे काय?  सवाल उपस्थित होत आहे.  शिवसेना ठाकरे गटाची काल शिवसेना भवनात दसरा मेळावा (Dasara Melava) पूर्व तयारीसाठी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत कसे ? असा प्रश्नं विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित  केला. 


आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट 


राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. राज्यात अन्य ठिकाणी मात्र पावसानं उघडीप दिली आहे. सध्या परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातवरण तयार झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


कुस्तीचा सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा मृत्यू


कुस्तीचा (Wrestling) सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा (Wrestler) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील (Kolhapur) तालमीत हा काल (3 ऑक्टोबर) प्रकार घडला. मारुती सुरवसे असं या पैलवानाचं नाव आहे. मारुची मूळचा पंढरपूर (Pandharpur) जिल्ह्यातील वाखरीमधील आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.