मुंबई : महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरुन राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दावोसला जाण्यापूर्वी सर्वच जिल्ह्यातील पालकमंत्रीपदांची नावे जाहीर केली. मात्र, शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर नाराजी उघड करताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक व रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदांच्या नावांना स्थगिती दिली आहे. पण, यंदाच्या प्रजासत्ताकदिनी ज्यांची नावे पालकमंत्रिपदासाठी जाहीर करण्यात आली, तेच मंत्री ध्वजारोहन करतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, शिवसेना-राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. त्यातच, गेल्या दिवसांपासून साताऱ्यातील आपल्या मूळ गावी गेलेल्या एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी आज मुंबईचा रस्ता धरला असून आपल्या नाराज आमदारांची ते भेट घेणार आहेत. दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील सर्वच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. तर, मंत्री भरत गोगावले (Bharat gogawale) यांनी थेट नाव घेऊन सुनील तटकरेंना लक्ष्य केलंय.
आदिती तटकरे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध करत रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. भरत गोगावले यांची जोपर्यंत पालकमंत्री म्हणून घोषणा होत नाही, तोपर्यंत संघटनेचे काम करणार नाही, असा पवित्राच भरत गोगावले समर्थकांनी घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत, आम्ही हे सहन करणार नाही. सह-पालकमंत्रिपद आम्हाला चालणार नाही, असे शिवसेना शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, एकनाथ शिंदे आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांच्या मुक्तागिरी बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून गोगावले यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे.
सुनिल तटकरेंकडून तिघांना पाडण्यासाठी प्रयत्न
दरम्यान, माझे कार्यकर्ते नाराज झाले असून ते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईत आले आहेत. आम्ही तटकरेंच्या निवडणुकीसाठी जिवाचं रान केलं, तन-मन-धनाने आम्ही निवडणुकीसाठी प्रयत्न केले. महाराष्ट्रात कुठेही सीट आली नाही, पण केवळ महाराष्ट्रात रायगडचा किल्ला राखला ते आम्हा तिघांमुळेच, असे म्हणत भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर थेट टीका केली असून जिल्ह्यातील तीन आमदारांना पाडण्यासाठी सुनिल तटकरेंनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप भरत गोगावले यांनी केला आहे.
हेही वाचा
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी