मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन आरोपांच्या अटकेसाठी पुढाकार घेतलेल्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी बीड (Beed) जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि परळीत होत असलेल्या अवैध धंद्यावरूनही बीडमधील दोन्ही मंत्र्‍यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. तसेच, संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हेही खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता, दीड वर्षांपूर्वी परळीत झालेल्या एका खुनाचा दाखला देत धस यांनी प्रश्न उभे केले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी आका आणि इतर सहकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता, असा गौप्यस्फोटही धस यांनी केला. तर, संतोष देशमुख हत्याप्रकरणात मी जे आरोप केले त्याचे पुरावे एसआयटीनं पुढे आणले आहेत, आकाचा संबंध आहे हे स्पष्ट होत असल्याचंही समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन ते म्हणाले. 


अवादा कंपनीच्या शिंदेंना पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि मारत आणलं होतं, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. या सीसीटीव्हीमध्ये आका, चाटे, घुले हे आहेत हे स्पष्ट दिसतंय. याप्रकरणात पीआय पाटील याला सहआरोपी केलं पाहिजे, महाजन बडतर्फ केलं पाहिजे, गर्जेंना बडतर्फ केलं पाहिजे, किंवा गडचिरोलीला पाठवलं पाहिजे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलीय. संतोष देशमुख हत्याप्रकरणात आत्तापर्यंत ७-८ झालेत, आता नववा देखील टाकला पाहिजे. तो मी नव्हेच म्हणणारा, हा मी आहेच हे तुम्हाला दिसलं ना, मी जे बोललो त्याला पुष्टी मिळाली आहे. अजून बरेच आरोपी आहे, बंदोबस्त व्हावा अशी मागणी आहे, रितसर नावं देऊ आणि एसआयटी तुम्हाला कळवेल, असेही धस यांनी म्हटले. यावेळी, परळीतील दीड वर्षांपूर्वीच्या खुनाच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केलंय. 


दीड वर्षांपूर्वी खून, अद्याप तपास नाही


महादेव दत्तात्रय मुंडे, गाव कन्हेरवाडी याचा खून झालाय. 22 ऑक्टोबर 2023 रोजी या मुंडे नावाच्या व्यक्तीचा परळी वैजनाथच्या तहसीलसमोर खून झालाय. परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पीआय होते, त्यांनी या घटनेचा छडा लावला. त्यामधील आरोपही शोधून काढले. मात्र, आका आणि आणखी कोणीतरी सांगितले की, आरोपी अटक करायचे नाही. त्यांऐवजी राजाभाऊ फड आणि इतर आरोपी अटक करायचे, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या हत्याप्रकरणातील सहाचे 6 आरोपी हे आकाच्या इर्द गिर्दी भटकताना दिसतात, असे म्हणत सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडवर निशाणा साधला आहे.  


22 ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत या खुनाचा तपास लागला नाही, विशेष म्हणजे आरोपी हे परळीतच हिंडतात. सतीश फडचे हे मेव्हणे आहेत, ते पूर्वी पंकजा मुंडेंकडे होता. आता, तो धनंजय मुंडे कडे गेलाय, त्याच्या मेव्हण्याचा हा मृत्यू झालाय. मात्र, अद्याप या हत्येचा तपास लागलेला नाही, असा गौप्यस्फोट धस यांनी केला. दरम्यान, पीआय सानप प्रामाणिक अधिकारी होते त्यांनी तपास लावला, मात्र त्यांच्यावर दबाव टाकला आता त्यांची बदली झाली आहे. चेतना कळसेपासून ते आत्ताच्या संतोष देशमुखांपर्यंत खुनाच्या घटनेत तपास झालेला नाही. 



तुम्ही श्रेय घेऊ नका - धस


पीक विमा घोटाळ्यातील समितीनं 350 कोटींचा घोटाळा दाखवला आहे. मात्र, यामध्ये 5 हजार कोटींचा घोटाळा निघेल, ही योजना बंद झाली नाही पाहिजे, शेतकऱ्यांच्या फायद्याची ही योजना आहे. पण, यातील दलाल आणि चुकीच्या पद्धतीने पैसे उकळणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. 1 रुपया पिक विमा योजना चांगली, मात्र त्याचा लॅक्युना शोधला आणि त्याचा गैरफायदा काहींनी घेतला. याप्रकरणी सर्वांची चौकशी व्हावी. 1 रुपयांत पीक विमा हा धनंजय मुंडे यांचा उपक्रम नव्हता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा हा कार्यक्रम होता. आमचं सरकार आल्यावर ही योजना सुरू झाली आहे, तुम्ही त्याची स्तुती करु नका, तुमच्याच लोकांनी पीक विमा भरला आहे, असे म्हणत धनंजय मुंडेंनाही धस यांनी लक्ष्य केलं. 


हेही वाचा


ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?