Maharashtra News Updates 29 September 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
टेंभी नाक्याच्या देवीची आजची आरती कोण करणार?
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रश्मी उद्धव ठाकरे टेंभी नाक्यावरच्या देवीची आरती करायला जाणार आहेत. यावेळी शिंदे गट आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी एकमेकांसमोर येऊ शकतात. कारण मीनाक्षी शिंदे यांची आज आरतीची वेळ नियोजित आहे. अशात संध्याकाळी रश्मी ठाकरे पोहचल्यानंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या सूरत आणि भावनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध योजनांचा शुभारंभ करणार आहेत. सकाळी 8.30 वाजता दिल्लीहून रवाना होतील. संध्याकाळी 7 वाजता 36 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे
तिरुपती देवस्थानकडून आज अंबाबाईसाठी मानाचा शालू येणार
तिरुपती देवस्थानकडून आज अंबाबाईसाठी मानाचा शालू येणार आहे. मिलिंद नार्वेकर हे आज अंबाबाईला तिरुपतीचा शालू घेऊन येणार आहेत. या शालूला खूप महत्त्व असून नवरात्रीनंतर लिलावात लाखो रुपयांची बोली लागते.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात विविध कार्यक्रमात पदाधिकारी मेळाव्यासह व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता नेवासा येथे देवगड देवस्थान दर्शन करून श्रीरामपूर तालुक्यात दौरा करणार आहेत.
भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संमेलन
भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संमेलन आज नागपुरात होणार आहे. या एक दिवसीय संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करणार असून समारोपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत. देशातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांचे हे संमेलन आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी 6 वाजता अमरावतीचे बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार हे बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. त्यानंतर नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातून जाणारी आगामी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या मार्गाची पाहणी आज करणार आहेत
सनदी अधिकारी अभिमन्यू काळे यांची पुन्हा आयुक्तपदी नियुक्ती
सनदी अधिकारी अभिमन्यू काळे यांची पुन्हा अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड काळात योग्य परिस्थिती हाताळली नाही म्हणून मंत्र्यांच्या तक्रारीनंतर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मंत्री मंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी आक्षेप घेतल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू काळे यांची बदली केली होती. सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा काळे यांची त्याच विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
श्रीगोंदा येथे रस्त्यावर कांदा ओतून राष्ट्रवादीकडून रस्ता रोको
अहमदनगर : कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी लिंपणगाव येथील शेतकरी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुक्यातील ढोकराई येथे कांदा ओतून रास्ता रोको करण्यात आला आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधव पुरता अडचणीत आलाय. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी लिंपणगाव येथील शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली ढोकराई येथे नगर - दौंड रोड रस्त्यावर कांदा ओतून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मोठी बातमी! औरंगाबादमधील पीएफआय कार्यालय पोलिसांकडून सील
Aurangabad News: केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता स्थानिक पोलिसांकडून सुद्धा या संघटनेवर कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद पोलिसांकडून पीएफआय कार्यालय सिल करण्यात आले आहे. सील केलेल्या नोटीसवर औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांची सही आहे. कार्यालयाच्या तीनही गेटवर सील लावण्यात आले आहे.
Beed Rain Update: बीडमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे केज तालुक्यातील पापनाशी नदीला पूर, अठरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
बीडमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे केज तालुक्यातल्या पापनाशी नदीला मोठा पूर आला होता यावर्षी पावसाळ्यात पहिल्यांदाच ही नदी दुधडी भरून वाहिल्याने अठरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे..या नदीवर वाघे बाभळगाव या ठिकाणी एक मध्यम प्रकल्पापासून तोदेखील पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी चा पाण्याचा प्रश्न सुटला आहे..
रश्मी ठाकरे या टेंभी नाका इथल्या देवीच्या दर्शनासाठी येतील तेव्हा कोणताही वाद होणार नाही, शिंदे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांची ग्वाही
Thane News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. यावेळी कोणत्याही प्रकारचे राजकारण आम्हाला करायचे नाही, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्यापासून ही परंपरा ठाकरे घराण्याने सुरु ठेवली आहे, तीच परंपरा रश्मी ठाकरे देखील पुढे नेत आहेत, असे शिंदे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. ज्यावेळी रश्मी ठाकरे येथील त्यावेळी कोणताही वाद होणार नाही, असेही केदार दिघे म्हणाले आहेत.