Maharashtra News Updates 27 October 2022 : शिंदे-फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्यास अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Oct 2022 06:41 PM
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उस्मानाबाद बंदचे आवाहन

आमदार कैलास पाटील यांचं पाच दिवसापासून उपोषण सुरु आहे. अद्याप प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने उद्या उस्मानाबाद बंद चे आवाहन करण्यात आले आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास स्थनासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर नागपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी या शासकीय निवास स्थनासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले...


एकनाथ शिंदे हे गुजरातचे मुख्यमंत्री अशा पद्धतीचा फलक लावत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं...
 
आंदोलन सुरू होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले..


युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले...


प्रकल्प पळवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नसून गुजरात चे मुख्यमंत्री आहे अशा पद्धतीच्या घोषणा देत फलक लावण्याचा प्रयत्न केले असता पोलिसांनी लागलीच ते फलक फाडून टाकत आंदोलकांना ताब्यात घेतले...

उध्दव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील अमरण उपोषणाला

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही 2020 चा पीक विमा बजाज अलाईन्स कंपनी देत नसल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील अमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांची सकाळी वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लाकाळ यांनी माध्यमांशी बोलताना आमदार कैलास पाटील यांचे पाच किलो वजन कमी झाले असून त्याच्या शरीरातील किटनेस कमी झाले आहे. त्यामुळे यांची प्रकृती बिघडत असल्याचे सांगितले. हे आंदोलन आक्रमक करण्यासाठी रस्ता रोको, मातीत गाढुन घेने, त्याचबरोबर शुक्रवारी सकाळी कांही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर चढले. तर पाडोळी परिसरात कांही शेतकऱ्यांनी नदीत उतरून नदीच्या पाण्यात उतरून पीक विम्याबाबत घोषणाबाजी केली. त्यामुळे प्रशासन सतर्क होऊन जिल्हाधिकारी यांनी आमदार कैलास पाटील यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, संपर्क नेते शंकरराव बोरकर आदी उपस्थित होते.

ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत यांचं आंदोलन

यावर्षी हिंगोली जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस काळ झाला आहे, त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची संपूर्ण पीक या पावसामुळे उध्वस्त झाले आहेत  त्यामुळे जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो शेतकऱ्यांचा मोर्चा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला होता हिंगोली शहरातून निघालेल्या या मोर्चामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले होते   ओला दुष्काळ जाहिर करा या आणि अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता

शिंदे-फडणवीस यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्यास अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँच युनिट -12 ने एकास अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रदीप भालेकर असून त्याला 30 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत  होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग घेणार निर्णय

राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.


मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प गुरजारतला, सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प बडोद्यात

फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प गुरजारतला, सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प बडोद्यात होणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे. 

मिरची पिकाचा पिक विम्यात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार;  विजयकुमार गावीत 

Nandurbar News Update : राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. मात्र मिरची पिकाला पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे मिरची पिकाला विमा कवच देण्यासाठी कृषी मंत्री, मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून मिरची पिकाचा पिक विम्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावीत यांनी दिली. नंदुरबार शहरातील मिरची व्यापारासाठी ठोस उपाय योजना करण्यात येणार असल्याचे आश्वास गावीत यांनी दिले.   

पालघरमध्ये वनीकरण विभागाच्या कामात 78 कोटींचा घोटाळा 

Palghar News Update : पालघर जिल्ह्यात वनीकरण विभागाच्या कामात 78 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. जव्हार सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जव्हार,  वाडा , मोखाडा या तालुक्यात काम न करताच याच विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 78 कोटी रुपये हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . 2016 ते 2018 या कालावधीत जव्हार वनपरिक्षेत्रात मृदा संधारण , दगडी बांध उभारणे,  तुटक समतोल चर खणणे अशी विविध कामे केल्याची खोटी कागदपत्रे सादर करून तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल 78 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते इमरान पठाण यांनी ही माहिती माहितीच्या अधिकारात उघड केली असून संबंधित घोटाळ्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी डीडीद्वारे पैसे काढून घेतल्याचं इमरान पठाण यांनी सांगितलं. अखेर या संदर्भात जव्हार पोलिस ठाण्यात 420 सह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आर्थिक व्यवहार मोठा असल्याने हा तपास पालघर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्याचे सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी फिर्याद दिल्यानंतर याच विभागातील 10 तत्कालीन  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोपी म्हणून नावं देण्यात आली आहेत. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत कोणालाही अटक झाली नसली तरी आर्थिक गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.

Azam Khan : चिथावणीखोर भाषण भोवलं, सपचे आमदार आझम खान यांना 3 वर्षाचा तुरुंगवास

सपचे आमदार आझम खान यांना तीन वर्षाचा तुरुंगवास सुनावण्यात आलं आहे. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

खानापूर न्यायालयात रामदास कदम यांची हजेरी
समितीच्या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी रामदास कदम आणि नितीन बानुगडे पाटील यांनी खानापूर कोर्टात हजेरी लावली. बेळगाव येथे झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या  अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 26 ऑक्टोबर 2006 रोजी खानापूर शहरातील ताराराणी हायस्कूलच्या मैदानावर युवा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत राज्य सरकारच्या वतीने पोलिसांनी महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि वक्ते नितीन बानुगडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज दोन्ही नेत्यांनी खानापूर न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावली. उभयतांच्या जामीनात न्यायालयाने वाढ केली असून पुढील सुनावणी 30 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. या दोघांच्या वतीने बेळगावचे वकील शामसुंदर पत्तार आणि हेमराज बेंचनावर यांनी काम पाहिले. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मुरलीधर पाटील, यशवंत बिरजे, आबासाहेब दळवी, विवेक गिरी, रूकमाना     झुंजवाडकर, नारायण कापोलकर आदी उपस्थित होते
पाणी पातळी वाढल्याने  बोरवेल ओव्हरफ्लो, हिंगोली जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला 

Hingoli News Update : हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अनेक छोटे मोठे तलाव भरले आहेत. त्याचबरोबर सिद्धेश्वर ईसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळी देखील वाढली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 118 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे बोरावेल ओसंडून वाहत आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील शेतकरी त्र्यंबकराव लोंढे यांच्या शेतातील बोरवेल देखील ओव्हरफ्लो झाला आहे. बोरवेलमधून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भविष्यातील पाणी प्रश्न मिटला  आहे.  

पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मानधन मिळणार; BCCI सचिव जय शहा यांची मोठी घोषणा

सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
Farmers Suicide :  सततच्या नापिकीला कंटाळून तसेच मित्र मंडळीकडून व पत संस्था, बँक आणि सोसायटीतून घेतलेले कर्ज कसे परतफेड करायचे या विवंचनेतून 55 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.  गावातीलच ग्रामपंचायतजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तर्री मिन्सी येथे घडली आहे. राजेंद्र वासुदेव शांतलवार असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली आहे.

 
नापिकी आणि कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून भंडाऱ्यात शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं
Bhandara News : सततच्या नापिकीला कंटाळून तसेच मित्र मंडळीकडून व पत संस्था, बँक आणि सोसायटीतून घेतलेले कर्ज कसे परतफेड करायचे या विवंचनेतून 55 वर्षीय शेतकऱ्याने गावातीलच ग्रामपंचायतजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तर्री मिन्सी येथे घडली आहे. राजेंद्र वासुदेव शांतलवार असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली आहे.

 
पंढरपूरात ऊस दराचं आंदोलन पेटलं, पुणे-पंढरपूर रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडलं

Sugarcane News : पंढरपूरात ऊस दराच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. काल रात्री पुणे-पंढरपूर रस्त्यावरील वाखरी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर अज्ञात लोकांनी फोडले आहेत. काही दिवसांपूर्वी पंढपुरात ऊस दर संघर्ष समितीने मेळावा घेतला होता. यामध्ये उसाला 3100 रुपये भाव मिळावा आणि पहिली उचल 2500 रुपयांची मिळावी या अशी मागणी करण्यात आलेली होती. तोपर्यंत कोणीही ऊस वाहतूक करू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर ठिकठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या गाडयांना अडवून गांधींगिरी पद्धतीने गुलाब देऊन ऊस वाहतूक थांबवण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र काल रात्री या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गाडीवरून आलेल्या तीन तर चार अज्ञातानी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

जालना-अमरावती एसटी बसला बुलढाण्यातील खामगावजवळ अपघात, 15 प्रवासी जखमी

Buldhana News : जालना-अमरावती एसटी बसला बुलढाण्यातील खामगावजवळ अपघात झाला. रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस रस्त्याच्या कडेला घसरली. या अपघातात बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जालना-अमरावती एसटी बसला अपघात, 15 प्रवासी जखमी

Accident News : जालना-अमरावती एसटी बसला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जवळ अपघात झाल्याची घटना घडली. रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव बस रस्त्याच्या कडेला घसरली.बसमधील 15 प्रवासी जखमी. जखमींवर खामगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबरनाथहून कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प

नांदेडमध्ये ऐन दिवाळीच्या दिवशी भामट्यांनी शेतकऱ्यांना लुटले, हदगाव बस्थानकातील लुटीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद

Nanded News : ऐन दिवाळीच्या दिवशी दोन भामट्यांनी भर बाजारपेठेत शेतकऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील एसटी बस्थानकात ही घटना घडली असून सदर सर्व घटना मात्र सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली आहे. हदगाव बस स्थानकात देवसरकर नावाचे शेतकरी दिवाळीची खरेदी करून गावी परतत असताना दोन भामट्यांनी त्यांना गाठून, आपण अधिकारी आहोत असा बनाव करत त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या, दहा हजार रुपये लुटत मोटारसायकलवरुन धूम ठोकली. या घटनेच्या झटापटीत देवसरकर यांच्या हाताला इज्जा पोहचली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली आहे.

सप्तशृंगी देवीचे मंदिर आजपासून दर्शनासाठी 24 खुले राहणार

Nashik News : सप्तशृंगी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. साडेतीन शक्तीपिठापैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेले नाशिकमधील वणीचे सप्तशृंगी देवीचे मंदिर आजपासून 13 नोव्हेंबरपर्यंत भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे. दिवाळीच्या सुट्टीत भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या देवी भक्तांसाठी संस्थानकडून विशेष सुविधा देखील पुरविण्यात येणार आहे.

देवगड तालुक्यातील प्राचीन कुणकेश्वर मंदिरात दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्राचीन कुणकेश्वर मंदिरात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी 11 हजार पणत्याचे दिवे लावून श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसर तेजोमय करण्यात आला. कुणकेश्वर ग्रामस्थांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या असंख्य भाविकांनी देखील हा दीपोत्सव डोळ्यातील दीप प्रज्वलित करण्याचा आनंद लुटला. दिवाळी पाडवा आणि त्याच दिवशी भाऊबीज असून देखील दीपोत्सव सोहळ्यास भाविकांनी अलोट गर्दी केली. कुणकेश्वर मंदिर परिसरात पालखीसह अनेक धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले.

Nanded News : ऐन दिवाळीच्या दिवशी भामट्यांनी शेतकऱ्यांना लुटलं, हदगाव बस्थानकातील लुटीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद

Nanded News : ऐन दिवाळीच्या दिवशी दोन भामटयांनी भर बाजारपेठेत शेतकऱ्याला लुटल्याची घटना घडलीय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील एसटी बस्थानकात ही घटना घडली असून सदर सर्व घटना मात्र सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झालीय.


हदगाव बस स्थानकात देवसरकर नावाचे शेतकरी दिवाळीची खरेदी करून गावी परतत असताना दोन भामट्यांनी त्यांना गाठून, आपण अधिकारी आहोत असा बनाव करत त्यांच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्या,दहा हजार रुपये लुटत मोटारसायकल वरून धूम ठोकलीय. या घटनेच्या झटापटीत देवसरकर यांच्या हाताला इज्जा पोहचली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झालीय.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.


रामदास कदम खानापूर न्यायालयात हजर होणार 
रामदास कदम यांची बेळगावच्या पार्श्वभूमीवर आज सुनावणी होणार आहे. 2004 मध्ये बेळगावच्या मराठी महापौरला तीथल्या बेळगांवच्या लोकांनी काळे फासले होते.. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांना तीथे पाठवले होते. रामदास कदम यांनी खानापूर येथे जाहीर सभा घेतली  या सभेत भडकावू भाषण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात मागिल महिन्यात रामदास कदम यांनी 10 लाखांचा जामीनही घेतला होता.. त्यानंतर पुन्हां बेळगावच्या खानापूर न्यायालयाने रामदास कदम यांना न्यायालयात आज सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले आहे..जर हजर राहिले नाहीत तर अटक वॉरंट निघू शकेल.. यासाठी रामदास कदम फ्लाइट ने बेळगांव च्या दिशेने रवाना झाले आहेत.


पुण्यात वाडेश्वर कट्टा 
पुण्यातील वाडेश्वर कट्टा हा प्रसिद्ध आहे तिथे अनेक नेते मंडळी मोकळ्या गप्पा मारत असतात. उद्या होणारा वाडेश्वर कट्टा हा खास असणार आहे कारण सर्वपक्षीय आमदार खासदार एकाच मंचावर येऊन दिवाळीचा फराळ एकमेकांना वाटतील..


आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर 
आदित्य ठाकरे आज पुण्यात दिवाळी निमित्ताने कार्यकर्त्यांशी भेटणार आहेत. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील भेटणार अशी माहिती आहे. पुण्यानंतर आदित्य ठाकरे नाशिक जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे  सिन्नर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पहाणी करणार आहेत.


शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा 
आटपाडी, सांगोला आणि तासगांव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा आज आटपाडी मधील कृषितंत्र विद्यालयाच्या प्रागणात  पार पडणार आहे. या मेळाव्यास शरद पवार  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवाय राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. भारत पाटणकर.के.जे.जॉय,  हिमांशु कुलकर्णी  अब्राहम सॅम्युएल या मान्यवरांचीही मेळाव्यास उपस्थिती पार पडणार आहे.


आजम खान यांच्याविरोधात कोर्टात सुनावणी 
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्याविरोधात आज कोर्टात सुनावणी होणार आहे.  रामपूरच्या एमपी-एमएलए कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाषण करताना आजम खान यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुपारी 12 वाजता कोर्टात सुनावणी होणार आहे. 


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह श्रीनगर दौऱ्यावर 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.  इंफेंट्री-डेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. 


अमित शाह हरियाणा दौऱ्यावर 
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री,अमित शाह येत्या 27 आणि 28 ऑक्टोबर 2022 रोजी हरियाणा येथील सूरजकुंड येथे होणाऱ्या विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या 'चिंतन शिबिराचे' अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या चिंतन शिबिराला दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी संबोधित करतील.  सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपाल आणि प्रशासकांना या दोन दिवसीय चिंतन शिबिरात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.राज्यांचे गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे महासंचालकही या चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत. 'चिंतन शिबिरा'मध्ये सहा सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे.  परिषदेच्या पहिल्या दिवशी होमगार्ड, नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स),अग्निसुरक्षा( फायर प्रोटेक्शन),शत्रूंच्या मालमत्ता (एनिमी प्रॉपर्टी) अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
 
अंगरक्षकांना सिल्वर ट्रम्पेट
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांना सिल्वर ट्रम्पेट आणि ट्रम्पेट बॅनर प्रदान करणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जवळपास दीड तास हा कार्यक्रम होणार आहे. 
 
भारताचा दुसरा सामना 
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाचा आज नेदरलँडविरोधात सामना होणार आहे. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला असेल. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत सेमी फायनलचं तिकिट निश्चित करण्याच्या इराद्यानं आणखी एक पाऊल टाकेल. या सामन्यात हार्दिक पांड्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.