Amol Mitkari on Jitendra Awhad : अजित पवार जर बारामती विधानसभा (Baramati Vidhansabha) मतदारसंघातून पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलं. अजित पवार निवडून आले तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रोज सकाळी 8 वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं असा टोला देखील मिटकरी यांनी लगावला. अजित पवार मुख्यमंत्री होतील, कारण आमच्या 35 जागा निवडून येतील. स्ट्राईक रेटवर आम्ही मुख्यमंत्री पद घेऊ असंही मिटकरी म्हणाले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य 


संजय शिरसाठ यांना जसं वाटतं की मुख्यमंत्री त्यांचा होईल तसंच आमचं देखील म्हणणं आहे की अजित पवार मुख्यमंत्री होतील. शेवटी अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.  अजित पवार किंग मेकर ठरतील. उद्या दुपारी 1 पर्यंत सांगतो असेही मिटकरी म्हणाले. 


25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील : मिटकरी


राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले. त्यांनतर आता उद्या ( शनिवारी 23) तारखेला निकाल जाहीर होणार आहे. निकालाआधी विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक मोठा दावा केला आहे. राज्यात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही. एक हाती सरकार कोणाचे येणार नाही. दोन चार जागांच्या फरकाने महायुतीला निसटता विजय मिळले. फार मोठा विजय मिळणार नाही, तर निसटते सरकार स्थापन होईल असे अमोल मिटकरी म्हणाले. तसेच येणाऱ्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला होता. 


एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला 20 ते 25 जागा मिळण्याची शक्यता 


दरम्यान, बुधुवारी मतदान झाल्यानंतर विविध एक्झिट पोल वर्तवण्यात आले होते. यामध्ये राज्यात सर्वात मोठा पक्ष हा भाजपचा असणार आहे. महायुतीमध्ये भाजपनंतर शिवसेना शिंदे गटाला आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा मिळतील असा अंदाज आहे. एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला 20 ते 25 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 35 जागा मिळतील असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. मात्र, खरं चित्र हे उद्याच समजणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे जितेंद्र आव्हाडांचं थोबाड फोडणार का? अजित पवारांवर केलेल्या टीकेमुळं अमोल मिटकरी आक्रमक