Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असतानाच सत्ता कोणाची येणार? याबाबत दावे प्रति दावे केले जात आहेत. एक्झिट पोलमध्ये सुद्धा असलेल्या संभ्रमावस्थेवरून राज्यामध्ये किती निकराची झुंज आहे यावरून दिसून येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सरकार स्थापनेसाठी असलेला अल्प कालावधी लक्षात घेत निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे समविचारी पक्षांना तसेच निवडून येणाऱ्या अपक्षांना गळ घालण्यास महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे उद्याच्या निकालानंतर काय स्थिती असेल याची चर्चा सर्वाधिक राज्याच्या राजकारणामध्ये रंगली आहे. 






बॅनरवर विकासाचा दादा, अजितदादा असाही उल्लेख करण्यात आला


दरम्यान, पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचा बॅनर झळकला. या बॅनरवर विकासाचा दादा, अजितदादा असाही उल्लेख करण्यात आला होता. हा बॅनर पक्षाचे नेते आणि पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे यांच्याकडून पुण्यामध्ये लावण्यात आला होता. मात्र बॅनर लावण्यात आल्यानंतर लगेच हा बॅनर हटवण्यात आल्याने त्याची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली. दुसरीकडे, एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल दाखवण्यात आला असला, तरी अजित पवार गटाची परिस्थिती समाधानकारक नसल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये सर्वात कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एक्झिट पोलमधील अंदाजाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काहीशी निराशा आहे. दुसरीकडे, पक्षाच्या नेत्यांनी एक्झिट पोल बाजूला करत चांगली कामगिरी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या