Maharashtra News Updates 24 December 2022 : जेजुरीत सोमवारपासून भाविकांसाठी मास्क सक्ती, मंदिर प्रशासनाचा निर्णय
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जर तुम्ही जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव बघता आता मंदिर प्रशासनाने आता सोमवारपासून भाविकांसाठी मास्क सक्ती केलेली आहे. मंदिर प्रशासनाने आजच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार पासून भाविकांना मंदिरात यायचे असेल तर मात्र मास्क बंधनकारक असणार आहे.
उल्हासनगरात एका महिलेने एसटी बसमध्ये पुत्ररत्नाला जन्म दिला. यानंतर बाळ बाळंतिणीला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय.
उल्हासनगरात एसटी बसमध्ये महिलेची प्रसूती, महिलेने एसटी बसमध्ये दिला पुत्ररत्नाला जन्म, बाळ बाळंतीण मध्यवर्ती रुग्णालयात दाखल, एसटी चालक आणि 108 ॲम्बुलन्सच्या डॉक्टरांचं कौतुक
राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात चार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
भादवी 153, 501, 504 अन्वये गुन्हा दाखल
कल्याणमधील बाजारपेठ आणि कोळसेवाडी, डोंबिवलीतील रामनगर आणि मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखळ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हा
बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाने केली होती गुन्हा दाखल करण्याची मागणी
अकोल्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते विजय मालोकारांचा उद्या भाजपात प्रवेश. अकोल्यातील पक्ष कार्यालयात करणार पक्षप्रवेश. विजय मालोकार शिवसेना प्रणीत 'महाराष्ट्र एसटी कामगार सेने'चे प्रदेश कार्याध्यक्ष. मालोकार अकोल्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही राहिलेयेत. तर 1995 मध्ये एसटी महामंडळाचे संचालकपदही भूषवले. अकोला पूर्व मतदारसंघात 2004 मध्ये अपक्ष म्हणून 40 हजार मते घेतलीत. तर 2009 मध्ये जनसुराज्यच्या तिकिटावर घेतली होते 30 हजार मतं. पाच दिवसांपुर्वीच दिला होता शिवसेनेच्या ठाकरे गटाचा राजीनामा.
नाशिक जिल्ह्यात बिबट्याने पुन्हा एकदा लहान मुलास लक्ष्य केले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावातील आश्रम शाळेतील एका विद्यार्थ्यास बिबट्याने पळवल्याची घटना घडली आहे. सायंकाळी सात वाजेची घटना असून नाशिकचे वनविभाग घटनास्थळी पोहोचत आहे.
नाशिक जिल्ह्यात बिबट्याने पुन्हा एकदा लहान मुलास लक्ष्य केले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावातील आश्रम शाळेतील एका विद्यार्थ्यास बिबट्याने पळवल्याची घटना घडली आहे. सायंकाळी सात वाजेची घटना असून नाशिकचे वनविभाग घटनास्थळी पोहोचत आहे.
भिवंडी शहरातून दररोज अवजड मालाची वाहतूक करणारी वाहने वाडामार्गे एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावरून गुजरातला जात असताना कंटेनर वर 98 फुटाचा बॉयलर अडकून पडला होता . वळण घेण्यासाठी अडचण येत असल्याने तब्बल सहा तास हा कंटेनर अडकला होता त्यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
काही वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलाचे अतोनात नुकसान होत असून, महापालिका आणि वाहतूक पोलीस या दोन्ही यंत्रणा याबाबत मौन बाळगून आहेत. जेएनपीटी आणि औद्योगिक भागातून अशी लोडेड वाहने शहरात न येता अंजूर फाटामार्गे थेट गुजरात आणि अन्य राज्यांत जाऊ शकतात, पण वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी शॉर्टकटचा हा मार्ग पत्करतात आणि एवढ्या अवजड वाहनांनंतरही ते येतात आणि उड्डाणपुलावर अडकून पडातात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चा सामना नागरिकांना करावा लागतोय. आणि वाहतूक पोलिसांचा याकडे दुर्लक्ष होत आहे . शहरातील आरसीसी रस्ता आणि हलक्या वाहनांसाठी असलेल्या पुलाचे मोठे नुकसान होत आहे, महापालिका प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही तर उड्डाणपुलावर एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारत सरकारने ५० टक्के अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवत कामाला सुरुवात केली असून लवकरच देशातील तीर्थक्षेत्रांसाठी चांगल्या दर्जाची वीज अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच अक्षय ऊर्जा क्षेत्रात सौर ऊर्जा बाबत १२ लाख नवे रोजगार निर्माण होतील असा दावा केंद्रीय अक्षय ऊर्जा व रासायनिक खते निर्मिती राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केला . आज विठ्ठल दर्शनासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते . मात्र सध्या सुरु असणाऱ्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाबाबत बोलणे टाळताना याचा निर्णय सर्वोच्य न्यायालय करेल अशी भूमिका घेतली .
Maharashtra Corona Update : राज्यात आजपर्यंत एकूण 79,87,928 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, मुंबईत आज 35 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17% एवढे झाले आहे.
आज राज्यात 38 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज एक कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे.
राज्यात मागच्या 50 वर्षात एकही पशुवैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरु झालं नाही असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हंटलं होत याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, खडसे साहेबही मागील काळात मंत्री होते त्यांचीही काही जबाबदारी होती पण ठीक आहे , आगामी काळात खासगी तत्त्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात मूळपशुवैद्यकीय विद्यापीठांच्या नियमात बदल करून विनाअनुदानित तत्वावर पशुवैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्याचा विचार असल्याचे विखे पाटील म्हणाले...राज्यात यापूर्वी कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ठराविक महाविद्यालये होती मात्र कृषी विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्यानंतर खासगी तत्त्वावर राज्यात कृषी महाविद्यालय सुरू झाली त्याच धर्तीवर राज्यातील पशुसंवर्धनांमधील कायद्यामध्ये बदल केला जाणार असून त्यानंतर खासगी तत्वावर पशुसंवर्धन महाविद्यालयांना कुणी परवानगी मागितली तर ती देण्याचा विचार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
भिवंडी ग्रामीण मधील गोदाम पट्ट्यासह शहरही भागातील लूम कारखान्यांना आगी लागण्याचे सत्र सुरु असून आज पुन्हा टिशू पेपरच्या गोदामाला भीषण आग लागून अग्नितांडव घडले आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील दापोडा गावातील कृष्णा कॉम्प्लेक्स गोदाम संकुलात अरोनिया या कंपनीचे टिशू पेपरच्या गोदामात घडली असून भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र या आगीच्या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे . ही भीषण आज साधारण आज 12 वाजल्याच्या सुमारास लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु होते अखेर ही या आगीवर तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली असून सध्या कुलिंग चे काम सुरू आहे .या भीषण आगीत आतापर्यत लाखो रुपयांचे टिशू पेपरचे रोल जळून खाक झाले आहे. मात्र आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
Rahul Gandhi LIVE : 'भारत जोडो यात्रेचं लक्ष्य माणूस जोडण्याचं आहे, काही लोकं 24 तास फक्त द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. पण हा देश एकसंध आहे...' राहुल गांधी यांचं लाल किल्ल्यावरुन भाषण
ठाणे कोपरी रेल्वे स्टेशन परिसरातील जवळ लागली आग..
फूड प्लाझा हॉटेल, कोपरी, ठाणे (पु.) येथे फूड प्लाझा हॉटेलच्या छतावरती कचऱ्याला आग लागली आहे.
सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह उपस्थित होते.
सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी हॉटेलच्या छतावरती कचऱ्याला लागलेली आग पूर्णपणे विझविण्यात आली आहे.
संजय राऊत यांना दिवस निघाल्यापासून खोके दिसत असतात. मात्र मागील तीन महिने ते आरामासाठी कारागृहात गेले होते, ते कोणत्या पुण्य कर्मासाठी गेले होते, याचं उत्तर त्यांनी द्यावं असे मत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.. पत्राचाळ प्रकरणात त्यांना किती खोके मिळाले हे सुद्धा संजय राऊत यांनी सांगावे असे ही शंभूराज देसाई म्हणाले... आम्हाला खोके खोके म्हणण्यापेक्षा संजय राऊत ज्यांच्यां नेतृत्वात काम करतात तिथे फ्रीजमध्ये भरून काय पाठवल जातं हे सगळ्यांना माहीत आहे. आम्हाला त्याचा पुनरुच्चार करायला लावू नका असेही शंभूराजे देसाई म्हणाले. दरम्यान, दिशा सलीयन प्रकरणात सीबीआयने क्लीन चिट दिली असतांना लक्ष विचलित करण्यासाठी पुन्हा गृह विभागाकडून एसआयटी चौकशीचे आदेश का दिले गेले असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यावर या याप्रकरणी नवीन माहिती माहिती पुढे आली असून त्याची चौकशी करणे राज्यसरकारचे अधिकार आहे. त्यासाठीच राज्यसरकारने एसआयटीच गठन केली असून त्यांना भीती वाटत नसेल तर त्यांनी एसआयटीची चौकशीला पुढे जावे.. त्यात भीती वाटाण्यासारखं काहीच नाही असेही शंभुराजे देसाई म्हणाले..
चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना ३ दिवसांची सीबीआय कोठडी
बजाजनगर परिसरात खाजगी कोचिंग क्लासेस करून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांचे रस्त्यावर राजरोसपणे वादविवाद होत असल्याने बजाजनगर परिसरातील नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे रात्री च्या वेळेस कोचिंग क्लासेस सुटल्यानंतर रोडरोमिओचे महाभाग ही रस्त्यावर धूम स्टाईल ने वावरत असल्याने कोचिंग क्लासेस करून घरी परतणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून परिसरातील रोडवर पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतुन केली जात आहे
शेतजमिनीवर बांधकाम करण्यासाठी बिनशेत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीचा आणि शिक्क्यांचा वापर करणाऱ्या मनसेच्या महिला रायगड जिल्हाध्यक्षा आदिती सोनार विरोधात खान्देश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पनवेलच्या विहिघर परिसरा हा प्रकार घडला असून शेतजमिनीवर रहिवासी बांधकाम करण्यात आले होते. त्यासाठी शेतजमीन बिनशेत केल्याचे आदेश असल्याचे भासवले जात होते. त्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीनंतर चौकशी केली असता शेतजमिनीला बिनशेती करण्यासाठी देण्यात आलेल्या आदेश पत्रावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही व शिक्का असल्याचे आढळून आलेय.
20 लाखांच्या कोकेनसह एक नायजेरियन गजाआड करण्यात आलाय. तर एक जण फरार झालाय. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-5 च्या पथकाने सापळा रचून तीन नायजेरियन नागरिकांना अटक केली. त्यांच्याकडून एमडी पावडर, कोकेन, मोबाईल असा 20 लाख 11 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्या विरोधात वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Kalyan News: कोरोना काळानंतर यावर्षी सर्वच सण उत्साहात आणि निर्बंधमुक्त साजरे केले गेले. आता वेध लागलेत ते 31st चे. नवीन वर्ष सुद्धा तितक्याच दणक्यात सेलिब्रेट केलं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी देखील आपली तयारी सुरू केली. हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊस, मोठे हॉल याठिकाणी सुद्धा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. महिला तरुणीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात. अनेकदा हे सर्व सुरू असताना अनुचित प्रकार घडत असतात किंवा घडू शकतात. यासाठी कल्याण झोन 3 पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची दोन पथकं स्थापन केली असून ही पथकं 31 डिसेंबरच्या रात्री विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेवर भर देणार आहे. गर्दीच्या ठिकाणी ही पथकं गस्त घालणार आहेत. त्याचप्रमाणे कोणीही अडचणीत आल्यास त्याच्या परियन्त मदत पोहचण्यासाठी कल्याण झोन 3 पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांही 112 नंबर वर फोन करण्याचं आवाहन करत रिक्षा आणि शहरातील अनेक ठिकाणी जवळपास 10 हजार पत्रक लावली आहे. या क्रमांकावर फोन करताच अवघ्या 5 ते 7 मिनिटात स्टेशन किंवा इतर पोलीस यंत्रणा यांच्यापर्यंत पोहचत मदत दिली जाईल.
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात कदमवाकवस्ती येथे ट्रक आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना आज शनिवारी ( ता. 24) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली असून अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
संभाव्य कोरोनाचा धोका व लागू होणारी नियमावलीच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. आज दुपारी 3 वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व पार्लर असोसिएशनच्या पदाधिकार्यांची ऑनलाईन बैठक होणार आहेमागील कोरोना व लाॅकडाऊन मधील सलून व ब्युटी पार्लर व संबंधित क्षेत्रातील सर्वाधिक नुकसान व वाईट परिणाम पाहता सलून व ब्युटी पार्लर व्यवसायिक आता अलर्टवर आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी दिली आहे
Pune Crime news : पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत थरारक प्रकार समोर (Superstion) आला आहे. दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चितेजवळ फोटो, लिंबू, सुया आढळले आहेत. या प्रकरणी जादूटोणा करणाऱ्या दोन (Pune police) तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
Beed News: बीडच्या परळी शहरामध्ये एका सूर्याच्या दुकानातून अज्ञात महिलांनी दीड लाख रुपयांच्या सोन्याची चोरी केली होती. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून परळी पोलिसांनी एका महिलेला मुद्देमालासह अटक केली आहे.
Pune News : कोरोनाचा संभाव्य धोका आणि लागू होणाऱ्या नियमावलीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सलून व पार्लर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची आज दुपारी तीन वाजता ऑनलाईन बैठक होणार आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी ही माहिती दिली आहे. मागील कोरोनाची लाट आणि लॉकडाऊनमधील सलून व ब्युटी पार्लर तसंच संबंधित क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झालं होतं. त्यामुळे सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिक आता अलर्टवर आहेत.
Jaykumar Gore Accident : "आमदार जयकुमार गोरे यांना सकाळी सहा वाजता त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संपूर्ण टीमने तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. सुदैवाने त्यांना मोठी दुखापत नाही ते शुद्धीवर आहेत आणि बोलत देखील आहेत. त्यांचे पल्स आणि बीपी व्यवस्थित आहे. त्यांच्या छातीला थोडासा मार लागला आहे," अशी माहिती रुबी रुग्णालयातील डॉ. कपिल झिरपे यांनी दिली.
Mumbai Temperature Drops : मुंबईतील किमान तापमानात घट
सांताक्रूजच्या वेधशाळेमध्ये किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं
कुलाब्यातही किमान तापमानात घट होत 18.8 अंश सेल्सिअसवर पारा
मागील आठवड्यात मुंबईतील किमान पारा सरासरी 24 अंशांवर होता
Solapur News : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात मास्क सक्ती
दर्शनासाठी स्वामी भक्तांनी मास्क घालूनच मंदिरात दर्शनास येण्याचं मंदिर समितीचं भक्तांना आवाहन
वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर समितीचा निर्णय
नाताळ आणि वर्षाअखेरनिमित्त सुट्टी असल्याने अनेक भाविक दर्शनाला येतात
त्यामुळे भाविकांना खबरदारी घेण्याचे आवाहन, मंदिर समितीकडून स्वतःहून मास्कच वाटप
मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती
सिद्धिविनायक मंदिर न्यास मंडळ बरखास्त करा, अशी मागणी मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सरकारकडे केली आहे. आदेश बांदेकर यांच्यासह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा नागपुरात येऊ असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात हिंदूचे सरकार आहे याची सुद्धा आठवण त्यांनी करुन दिली. अधिवेशनात या विषयावर चर्चा का होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सिद्धिविनायक मंदिर न्यास मंडळ बरखास्त करा, अशी मागणी मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सरकारकडे केली आहे. आदेश बांदेकर यांच्यासह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा नागपुरात येऊ असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात हिंदूचे सरकार आहे याची सुद्धा आठवण त्यांनी करुन दिली. अधिवेशनात या विषयावर चर्चा का होत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Raigad News : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या रांगा
वीकेण्ड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची गर्दी
पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक वाहनांची रांग ...
सुमारे 500मीटरपेक्षा अधिक वाहनांची रांग ...
Mumbai News: माजी मंत्री सुरेश जैन यांना न्युमोनियाची लागण झाल्यानं त्यांना मुंबई येथील ब्रीज कँडी रुग्णालयात उपचार करण्यासाठी हलविण्यात आल्याची आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून देण्यात आली आहे.
Christmas 2022: नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर निघणारी ख्रिसमस कार्निवल मिरवणूक वसईत ही पाहायला मिळते. वसईच्या या कार्निव्हल मध्ये उंट, घोडे, रथ यांच्या बरोबरच कोरोना काळात नागरिकांना सेवा देणाऱ्या सफाई कामगार, डॉक्टर आणि पोलीस यांना ही या देखाव्याच्या माध्यमातूनसन्मान करण्यात आला आहे.
माणिकपूर येथील रसिक रंजन नाट्य मंडळा तर्फे यंदा ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. गोव्यासारखी कार्निवल फेस्टिवल वसईत ही पाहायाला मिळते. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात सर्वधर्म समभाव हा एकात्मतेचा संदेश या कार्निवल मिरवणूकीतून देण्यात आला होता. यात महाराष्ट्र आणि वसईच्या संस्कृती परंपरेचं जतन, पर्यावरण आदी सामिजिक प्रश्न सोबत घेवून हा कार्निवल निघाला होता. उंट घोडे आदी ऐश्वर्यपूर्ण दिमाखात तीन राजे आणि त्यांचा लवाजमा या मिरवणुकीत दिसत होता. आम्ही सर्व एक आहोत असा संदेश देतानाच कोरोनाच्या काळात नागरिकांना सेवा देणारे डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि पोलीस यांचा देखील या देखाव्यात सन्मान करण्यात आला. ट्रॅफिकचे रूळ पाळा, सफाईवर लक्ष द्या, कोरोनामध्ये डॉक्टरांनी केलेला कामाला सलाम असा संदेश देण्यात आला. घोड्याच्या रथावर बसून, बच्चे कंपनीचा आवडता सांताक्लॉज चॉकलेट वाटत होता. यावेळी स्थानिक रहिवाशांनी कार्निवल बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात येणार आहेत. त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. तसेच खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीमध्ये पोहचणार आहे. या यात्रेत अभिनेते कमल हसन सहभागी होणार आहेत. त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवाला संबोधित करणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे.
ईशा अंबानी जुळ्या बाळासह भारतात येणार
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात येणार आहेत. त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे. सकाळी साडेआठ वाजता हे दोघेही व्हीआयपी गेट नंबर आठवर दाखल होतील. कतार एअरलाईन्सच्या स्पेशल विमानानं लॉस अँजलिसवरुन हे मुंबईत येतील. विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत असेल. बाळांच्या स्वागतासाठी इशा अंबानीच्या ‘करुणा सिंधू’ निवासस्थानावर देशभरातील एक हजार साधूसंत येणार आहेत. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहेत. तसेच, अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून पाच अनाथाश्रम सुरु केले जाणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील. बाळांसाठी Hermes, Dior या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचं फर्निचर आणि नर्सरी ‘करुणा सिंधू’ आणि ‘अँटेलिया’मध्ये तयार करण्यात आली आहे. बाळांसाठी dolce gabbana , Gucci , Loro piana या ब्रँडचे कपडे खास तयार करण्यात आलेत. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करण्यात आली आहे. बाळांची देखभाल करण्यासाठी अमेरिकेहून आठ स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या नॅनी येणार आहेत.
भारत जोडो यात्रा दिल्लीमध्ये
राहुल गांधींच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा आज दिल्लीमध्ये प्रवेश करणार आहे. सायंकाळी भारत जोडो यात्रा लाल किल्ल्यावर पोहचणार आहे. दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रामध्ये अभिनेते कमल हसन सहभागी होणार आहेत.
ओम बिर्ला पुणे दौऱ्यावर
पुणे- लोकसभेतील स्पीकर ओम बिर्ला पुणे दौऱ्यावर. येरवडा भागातील अग्रवाल समाजाच्या कार्यक्रमास हजेरी लावणार, सकाळी 9.45 वाजता. तर एम आय टी संस्थेतील कार्यक्रमासही उपस्थित राहणार आहेत.
मुंबई- ख्रिसमच्या पार्श्वभूमीवर दादर कार्निवलचं उद्घाटन शर्मिला ठाकरेंच्या हस्ते होणार आहे, सकाळी 10 वाजता. रात्री 10 पर्यंत हा कार्निव्हल सर्वसामान्यांसाठी खुला असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार एकाच मंचावर
अमरावती- राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन अमरावतीच्या वतीने राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. सामाजिक क्षेत्रातील कामगिरीसाठी सरिता कौशिक यांना पुरस्कार मिळणार आहे. तसेच, कलाक्षेत्रात साधना सरगम, उद्योगक्षेत्रात अहमदनगरच्या श्रध्दा ढवन, क्रिडा क्षेत्रात सातारा येथील अक्षता ढेकळे आणि प्रशासकीय क्षेत्रात अमरावती येथील प्रिती देशमुख यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
विरोधीपक्ष नेते अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात असण्याची शक्यता.
हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन
सांगली- हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. राज्यात लव्ह जिहाद, धर्मातरविरोधी कायदा करण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने या हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात हिंदुत्ववादी संघटनांसह राजकीय पक्षही सहभागी होणार आहेत.राम मंदिर चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होईल. पंचमुखी मारुती रोड, हरभट रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून स्टेशन चौकात ४ मुलींच्या भाषणाने मोर्चाची सांगता होईल.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रकला स्पर्धा
भंडारा- हिंदवी प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. चार गटात होणाऱ्या या स्पर्धेत भंडारा शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील सुमारे ३ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डी वॉर्ड’ कार्यक्षेत्रात ताडदेव महापालिका शाळा, बने कम्पाऊंड, साने गुरूजी मार्ग, ताडदेव येथे शनिवार दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरामध्ये महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी, लसीकरण आणि दंत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरासाठी सुमारे 1 हजार बालके उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती सुशीबेन शहा यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवाला संबोधित करणार -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानची स्थापना राजकोट येथे 1948 मध्ये गुरुदेव शास्त्रीजी महाराज श्री धर्मजीवनदासजी स्वामी यांनी केली. संस्थानच्या कार्यक्षेत्राचा विस्तार झाला असून सध्या जगभरात 40 पेक्षा जास्त शाखा आहेत. संस्थानामार्फत 25,000 हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा पुरवल्या जातात.
अमित शाह गुजरात दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री अमित शाह आज गुजरातच्या दौऱ्यावर असतील. सकाळी साडेदहा वाजता ते विविध पिल्वई, मेहसाणा येथील श्री गोवर्धन नाथ मंदिरात दर्शन घेतली. त्यानंतर विविध कामाची पायाभरणी करतील. दुपारी एक वाजता महुडी जैन मंदिराला भेट देणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -