Maharashtra News Updates 23 January 2023 : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jan 2023 06:44 PM
अमरावतीमधील परतवाडा येथे दोन देशी कट्टे आणि 8 जिवंत काडतूस जप्त

अमरावतीमधील परतवाडा येथे दोन देशी कट्टे आणि 8 जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेनी दोन देशी कट्टे आणि दोन काडतुस जप्त केली होती.  21 जानेवारी रोजी परतवाडा येथे गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींकडून दोन देशी कट्टे आणि दोन जिवंत काडतुस जप्त केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली होती. आज पुन्हा परतवाडा-धारणी रोडवर गस्त करत असताना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. अब्दुल बशीर अब्दुल कलीम आणि अब्दुल आवेज अ. कदीर ( दोघे राहणार पठाण चौक, अमरावती ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुस, दोन मोबाईल, एक दुचाकी असा एक लाख 34 हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे. 

नागपुरातील पोलिस आयुक्त कार्यालयात आग

Nagpur CP office : नागपुरातील पोलिस आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावरील लेखा विभागात आग लागली असल्याची माहिती आहे. या नव्या इमारतीचे काही महिन्यांपूर्वीच लोकार्पण झाले होते. या संदर्भात पोलिस विभागाकडून सध्या अधिक माहिती मिळू शकली नाही.

Bhandara News : दारूच्या नशेत भाच्याने केली मामाची हत्या

Bhandara News  : दारूच्या नशेत भाच्याने मामाची हत्या केल्याची खळबळजनक घटना भंडाऱ्यातील कारधा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अजीमाबाद येथे घडली आहे अजिमाबाद गावाच्या शेतशिवारात वीट भट्टीचा उद्योग आहे. या वीट भट्टीच्या कामासाठी छत्तीसगड राज्यातील कामगार कामावर आहेत. मृतक आणि आरोपी हे दोघेही मामा भाचे आहेत. राजू मनहारे (33) असे मृतकाचे नाव आहे. तर, सुनीलकुमार छत्तु गितलहरे (18) दोघेही रा. सलोनी, जिल्हा बलोदाबाजार राज्य छत्तिसगड तेथील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, कारधा ठाणेदार राजेशकुमार थोरात पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले असून आरोपी भाच्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Shyam Manav : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ

Shyam Manav : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांना येत असलेल्या धमकीच्या पार्शवभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धीरेंद्र कृष्ण महाराजांवरील आरोपानंतर श्याम मानव यांना धमकीचे फोन येत होते. त्यापार्श्वभूमीवर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहेे.   

ईडीच्या माध्यमातून देशातलं राजकीय नेतृत्व संपवण्याचा घाट घातला जातोय : प्रकाश आंबेडकर

Maharashtra Politics: शिवसेना आणि वंचितच्या युतीची उद्धव ठाकरेंकडून घोषणा

अंबरनाथमध्ये शौचालयांचे दरवाजे जातायत चोरीला!
अंबरनाथ पूर्वेतील अनेक सार्वजनिक शौचालयांमध्ये दरवाजे नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत स्थानिकांना विचारलं असता पालिकेने दोन वेळा दरवाजे बसवले, मात्र हे दरवाजे वारंवार कोणीतरी चोरून नेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र आता दरवाजे नसल्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत असून नागरिकांना चक्क छत्र्या घेऊन शौचालयात जाण्याची वेळ आली आहे. अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर परिसरातील मधली आळी आणि कैलास नगर परिसरातील शौचालयांचे दरवाजे अशाच पद्धतीने चोरीला गेले आहेत. महिला आणि पुरुष अशा दोन्ही शौचालयांमधले दरवाजे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर इथे दरवाजे बसवावेत अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जातेय.
Beed News: नारायण गडावर मुक्कामी आलेल्या एसटी बस मधून दोनशे लिटर डिझेलची चोरी

Beed News: बीडच्या नारायण गडावर मुक्कामी असलेल्या पैठण आगारातील एका एसटी बस मधून तब्बल दोनशे लिटर डिझेलची अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.. तीर्थक्षेत्र असलेल्या नारायण गडावर बीड सह इतर जिल्ह्यातून देखील बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये पैठण आगारातून मुक्कामी आलेल्या एसटी बस मधून रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी या दोनशे लिटर डिझेलची चोरी केली आहे. याप्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
Dhule News: धुळे जिल्ह्यात वातावरणातील गारठा कायम, रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होण्यास सुरुवात

Dhule News: एकीकडे राज्यात तापमानात वाढ होत असताना नागरिकांना दिलासा मिळत आहे मात्र दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात अजूनही थंडीचा कडाका कायम असून धुळे जिल्ह्यातील तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आत असल्याने वातावरणातील गारठा कमी झालेला नाही यातच जिल्ह्यात धुक्याची चादर अजूनही कायम असल्याने याचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर होत आहे जिल्ह्यातील बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे तसेच गहू हरभरा मका या पिकांना देखील या वातावरणाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, वातावरणातील गारठा आणि धुके यामुळे हवेची गुणवत्ता देखील खराब झाली असून धुळ्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 174 इतका नोंदवला गेला आहे. पुढील काही दिवस तापमान 10°c आत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Pune News: कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पुण्यात भाजप नेत्यांची बैठक

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप नेत्यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावलीय.  या बैठकीत भाजपची या पोटनिवडणूकीसाठीची रणनीती आखण्यात येईल. या बैठकीला भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांसह ही पोटनिवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांनाही आमंत्रित करण्यात आलय.  अकरा वाजता ही बैठक होणार आहे.

बीएमसीमधील कथित घोटाळ्याचा संदीप देशपांडे आज पुराव्यांसह गौप्यस्फोट करणार

Sandeep Deshpande Press Conference : कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. पण पहिल्यांदाचा मनसे पुराव्यांसहित हा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज सकाळी अकरा वाजता मनसेचे नेते संदीप देशपांडे हे विद्याधर हॅालमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी स्क्रीन लावण्यात येणार आहे आणि या स्क्रीनवर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले जाणार आहेत. आता नेमका संदीप देशपांडे यांचा निशाणा कोणावर असणार आहे? या पुराव्यांमध्ये नेमकं काय असणार आहे आणि या पुराव्यानंतर आरोप झालेल्या लोकांवर कारवाई होणार का? हे पाहावं लागेल.


 



नंदुरबारच्या नवापूर शहरात चार घरात चोरी; सराईत चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य, शहरात भीतीचे वातावरण
Nandurbar News : नंदुरबारच्या नवापूर शहरात थंडीचे प्रमाण वाढले की चोरीच्या घटना देखील वाढतात. नवापूर शहरातील वेडूभाई गोविंदभाई नगर या ठिकाणी दोन घरात घरफोडी करण्यात आली. त्यानंतर आदर्श नगरातील दोन घरात घरफोडी झालेली आहे. अशा चार बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट करुन सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरफोडी झाल्याने चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत. आदर्श नगर, वेडूभाई गोविंदभाई नगरात झालेल्या चोरीने नवापूर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 21 जानेवारी रोजी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान वेडूभाई गोविंदभाई नगरात दोन घरांची घरफोडी करण्यात आली आहे.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सातारा पोलिसांसह सातारकरांकडून स्वच्छता मोहीम

Satara Fort Cleaning : सातारा पोलिसांकडून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक किल्ल्याची स्वच्छता मोहीम सुरु केली असून या मोहिमेत आता सातारकरही पुढे सरसावले आहेत. आठवड्यातून एक दिवस एक किल्ला घेऊन सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांसह पोलिसांची मोठी टीम गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी किल्ल्यावर जाऊन तिथला कचरा उचलण्याचे काम करणार आहे. शिवाय त्या किल्ल्याची सर्व माहितीही पोलीस आणि आलेल्या सातारकरांना दिली जात आहे. पहिल्या आठवड्यात त्यांनी अजिंक्यतारा किल्ल्याची साफसफाई केली तर आता दुसरा किल्ले वसंतगडावर ही मोहिम राबवली. यात शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सातारकरांनीही मोठा सहभाग नोंदवला. 

Ahmadnagar News: हिंदू राष्ट्र जागृती सभेत सरकारकडे करण्यात आल्या वेगवेगळ्या मागण्या

Ahmadnagar News: देशात लव्ह जिहाद विरोधी कायदा झाला पाहिजे, लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीला 30 दिवसाच्या आत शिक्षा झाली पाहिजे. महाराष्ट्रात गो हत्या बंदी कायदा झाला पाहिजे. गडकिल्ल्यावरील अतिक्रमण काढली पाहिजे. महाराष्ट्रातील मदरसे बंद झाले पाहिजे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार न करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक दर्जा काढून घेतला पाहिजे आणि भारतात कठोर जनसंख्या नियंत्रण कायदा झाला पाहिजे अशा हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या वेळी करण्यात आल्या. अहमदनगरच्या जॉगिंग पार्क येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र-जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव, सुदर्शन वृत्त वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट आणि रागेश्री देशपांडे या उपस्थित होत्या. सोबतच यावेळी 'हलाल जिहाद'ला जोरदार विरोध करत हलाल प्रॉडक्ट्सवर बहिष्कार घालण्याचे आवहन यावेळी उपस्थित वक्त्यांनी केलं.

मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपलास फाट्याजवळ भरधाव ट्रकची पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक, दोन जण जखमी

Mumbai-Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपलास फाट्याजवळ एका भरधाव ट्रकने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी जखमी झाले आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर पिंपलास फाट्याजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने महामार्गावर झेब्रा क्रॉसिंगचे काम सुरु होते. हे पाहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या अनेक वाहनांनी आपल्या वाहनाची गती मंद केली. परंतु तेवढ्यात मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने पाच ते सहा चार चाकी वाहनांना जोरदार धडक देऊन पसार झाला आहे. या अपघातात एका ओला वाहनातील दोन जण जखमी झाल्याची घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झालेली नाही. सध्या घटनास्थळी पोलीस पोहोचले असून या संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत.

बाळासाहेबांची 97 वी जयंती, शिवसेना भवनाला आकर्षक रोषणाई तर विधीमंडळात आज बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण होणार

Balasaheb Thackeray Jayanti : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवसेना भवन चारही बाजूंनी रंगीबेरंगी रोषणाईने सजले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्ष आज प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करणार असल्याची घोषणा करण्यात येणार आहे. दुसरीकडे, बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त राज्य सरकार आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या (बाळासाहेबांची शिवसेना) वतीने त्यांच्या चित्राचे महाराष्ट्र विधिमंडळात अनावरण करण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राज्य सरकारकडून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि नातू निहार ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने पाठवलेले निमंत्रण उद्धव ठाकरे स्वीकारतात की नाही हे पाहावे लागेल.

Balasaheb Thackeray : हिंदुत्वाचा ज्वलंत श्वास... असा आहे बाळासाहेबांचा जीवनप्रवास

Balasaheb Thackeray Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना' या वृत्तपत्राची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाच्या हिताच्या आणि अधिकाराच्या गोष्टी मांडल्या.











 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून त्या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचं आज अनावरण करण्यात येणार आहे. तसेच आज दुपारी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणाही करण्यात येणार आहे. आज उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचा शेवटचा दिवस आहे. 


बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, विधान भवनात तैलचित्राचे अनावरण


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्या निमित्ताने त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी ठाकरे आणि शिंदे गटातील नेते दिवसभरात येऊन अभिवादन करताना पाहायला मिळतील. आज विधान भवनातील  सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. चित्रकार चंद्रकला कदम यांनी हे तैलचित्र साकारलं आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधानभवनात बसवण्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार निर्णय घेतल्याचं नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात जाहीर केलं होतं. 


शासकीय आमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकात पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे निमंत्रित आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे सुद्धा स्पष्ट केलंय की या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच आमंत्रित केललं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र व्यासपीठावर नेमकं कोण कोण असणार हे अद्याप कळालेलं नाही. 


शिवसेना आणि वंचितच्या युतीची घोषणा 


शिवसेनेतील ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज होणार आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची आज दुपारी 1 वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. आपली युती ही शिवसेनेसोबत असेल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसंदर्भात नंतर पाहून घेऊ अशी भूमिका वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. 


उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचा शेवटचा दिवस


आज उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदाची मुदत संपुष्टात येत आहे. यामुळे 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का? हाच मोठा प्रश्न ठाकरे गटच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेना पक्षावर ताबा मिळविण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यामुळे पक्षप्रमुख पदाचा वाद निवडणूक आयोगात गेला आहे. मूळ शिवसेनेच्या घटनेनुसार 23 जानेवारी 2018 रोजी पक्षांतर्गत निवडणुका झाल्या. या निवडणुकीत उद्धव यांच्याकडे 5 वर्षे पक्षप्रमुखपद देण्यात आले होते. ही मुदत 23 जानेवारी 2023 रोजी पूर्ण होत आहे. एकीकडे मुदत पुर्ण होत असताना शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगात आहे. या वादावर 30 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आजपासून 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. 


राज ठाकरेंच्या आयुष्यावर नाटक 


बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर नाटक येतंय. 'बाळासाहेबांचा राज' या दोन अंकी नाटकाचा शुभारंभ आज मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात दुपारी 4.30 वाजता होणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नातं या नाटकाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्या विशेष सहकार्याने हे नाटक सादर केलं जाणार आहे .


राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रीय बाल पुरस्कार, बीडच्या रोहन बहिरचा समावेश 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान मोदी 24 जानेवारीला या पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधतील.  बीडच्या राजुरी येथील 15 वर्षाच्या रोहन रामचंद्र बहिर याला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप असून राजुरी येथील नदीत वाहून जाणाऱ्या एका महिलेचे प्राण रोहनने वाचवले होते. रोहनने दाखवलेल्या धाडसाबद्दल एबीपी माझाने देखील त्याचा पुरस्कार देऊन सन्मान केला होता. 


'आयएनएस वागीर' नौदलात दाखल 


सायलेंट किलर म्हणून ओळख प्राप्त असेलली प्रोजेक्ट -75 ची फ्रेंच स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 'आयएनएस वागीर' ही पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होत आहे. भारतीय बनावटीची माझगाव डॉक येथे बांधण्यात आलेली 'आयएनएस वागीर' ही कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी आहे.


अंदमान आणि निकोबार बेटांतील 21 बेटांना परमवीर विजेत्यांची नावं 


पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांतील 21 सर्वात निनावी बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांचे नाव देणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर बांधण्यात येणाऱ्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे अनावरणही करतील. मेजर सोमनाथ शर्मा, सूबेदार और मानद कप्तान करम सिंह, एम.एम., सेकंड लेफ्टिनेंट राम राघोबा राणे, नायक जदुनाथ सिंह, कंपनी हवलदार मेजर पीरू सिंह, कैप्टन जी.एस. सलारिया, लेफ्टिनेंट कर्नल (तत्कालीन मेजर) धन सिंह थापा, सूबेदार जोगिंदर सिंह, मेजर शैतान सिंह, सीक्यूएमएच. अब्दुल हमीद, लेफ्टिनेंट कर्नल अर्देशिर बुर्जोरजी तारापोर, लांस नायक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंह, सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सूबेदार बाना सिंह, कप्तान विक्रम बत्रा, लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे, सूबेदार मेजर (तत्कालीन राइफलमैन) संजय कुमार और सूबेदार मेजर सेवानिवृत्त (मानद कप्तान) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांच्या नावे आता ही बेटं ओळखली जाणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.