Maharashtra News Updates 17 November 2022 : राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राहुल गांधी भविष्यात कदाचित पंतप्रधान होतील पण त्यांना उद्याची सभा कायम लक्षात राहील, उद्याची सभा मनसे उधळणार मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह मुंबई नाशिकचे मनसे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने रवाना
संभाजीनगर ला मुक्काम करून उद्या जाणार शेगावला, काहीही झाले तरी शेगाव गाठणार, मनसे नेत्यांचा निर्धार, राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्त्याचा निषेध करण्यासाठी मनसैनिक मार्गस्थ, भारत जोडो यात्रा दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या वक्त्याव विरोधात मनसे आक्रमक
राहुल गांधी यांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदाचा कार्यभार Hemraj Bagul यांनी आज मंत्रालयात स्वीकारला. विभागाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या उपस्थितीत संचालक (वृत्त व जनसंपर्क) गणेश रामदासी यांच्याकडून बागुल यांनी पदभार स्वीकारला. याप्रसंगी उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर, उपसंचालक (प्रदर्शने) सीमा रनाळकर आदींनी पुष्पगुच्छ देवून बागुल यांचे स्वागत केले. महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि औरंगाबाद-लातूर विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही बागुल यांच्याकडे देण्यात आला आहे. बागुल यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयात प्रकाशने, महान्यूज, वृत्त आदी शाखांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी बागुल यांनी पत्रकारितेत योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध पुरस्कारांनी बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार
आजारपणातून सावरल्यानंतर शरद पवार यांचा शरद पवार यांचा पहिलाच दौरा
शरद पवार यांची आजारी असताना देखील शिर्डी येथील अधिवेशनाला हजारी त्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल
दीक्षांत समारंभास शरद पवार, राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एकाच मंचावर पाहिला मिळणार
मराठवाडा विद्यापीठाकडून शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डी. लीट प्रदान करण्यात येणार
शीतल उगले-तेली यांची सोलापूर मनपा आयुक्त पदी नियुक्ती, पी शिवशंकर यांची बदली
राज्यात मुंबई, भिवंडी आणि मालेगावात गोवर आजाराचा उद्रेक
राज्यात गोवरमुळे आतापर्यंत ८ रुग्णांचा मृत्यू, सर्व मृत्यू मुंबई शहरातील
राज्यात ५०३ जणांना गोवरची लागण, तर संशयित रुग्णांची संख्या ६ हजार ४२१ वर
राज्य सरकारचा लसीकरणावर अधिक भर देण्याच्या सूचना, घरोघरी जात सर्व्हेक्षण होणार
जागतिक आरोग्य संघटनेकडून आधीच इशारा, कोव्हिडमुळे इतर आजार डोकं वर काढणार. ज्यात गोवर, हृदयरोग, मधुमेहसारख्या आजारांचा समावेश
कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ करिता न सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम १५४(1ड) मध्ये सुधारणा करण्यात येईल. कोविडमुळे लागू केलेल्या टाळेबंदी तसेच प्रादुर्भावाच्या भितीमुळे अनेक लहानमोठे उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था, विकासाची कामे, कारखाने, बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे, दैंनंदिन रोजगार बंद होता. यामुळे सर्वसाधारण अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे बहुतांशी मालमत्ताधारक, संस्था, लोकप्रतिनिधींकडून मालमत्ता कर माफ करणे किंवा सवलत देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे निवेदने दिली होती. यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने सदर भांडवली मुल्य सुधारित करण्यास 2022-23 करिता सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत दिल्याने महानगरपालिकेची अंदाजे 1116.90 कोटी रुपये इतकी महसूल हानी होणार आहे.
Maharashtra Cabinet: नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या विद्यापीठाच्या वारंगा येथील स्थायी कॅम्पसमधील शैक्षणिक संकुल मुलामुलींचे वसतीगृह ॲमेनिटी ब्लॉक व प्रशासकीय संकुल या इमारतींमध्ये हिटींग,व्हेटीलेशन व एअर कंडीशन यंत्रणा लावण्यात येणार आहेत.
पुणे येथे जेएसपीएम विद्यापीठ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता देण्यास निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
हे विद्यापीठ २०२३-२४ पासून सुरु होईल. तसेच याबाबतीत विधिमंडळासमोर विधेयक सादर करण्यात येईल.
हे प्रस्तावित विद्यापीठ हवेली तालुक्यातील हवेल येथे असेल.
राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र-कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीत केल्याप्रमाणे होणार आहे. यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
विद्यापीठ अनुदान आयोगाने कुलगुरू आणि प्र-कुलगुरू यांच्या निवडीची पध्दत, अर्हता इत्यादीसंदर्भात १८ जुलै २०१८ च्या अधिसूचनेन्वये सुधारणा केलेल्या आहेत. या सुधारणा आणि त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अधिनियम, 1989, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, अधिनियम, 1997 व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते.
या अध्यादेशाव्दारे प्रामुख्याने पुढील सुधारणा करण्यात येणार आहेत. कुलगुरू पदावर नियुक्तीसाठी प्राध्यापक पदावरील किमान १० इतका अनुभव विहित करण्यात आला आहे, कुलगुरू पदाची निवड करण्यासाठी “शोध व निवड समिती” मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे, कुलगुरूंनी केलेली शिफारस विचारात घेऊन प्र-कुलगुरूची नियुक्ती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून करण्यात येणार आहे.
नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यास व त्याप्रमाणे वेळापत्रकात बदल करून अध्यादेश प्रख्यापित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या सुधारणेनुसार राज्यामध्ये नवीन महाविद्यालये किंवा परिसंस्था, नवीन अभ्यासक्रम, विषय, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी अधिनियमात असलेल्या वेळापत्रकात बदल करण्यात येतील.
अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली ३१ अशासकीय अनुदानित कला संस्था आहेत. या कला संस्थांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध लाभ ५ ऑक्टोबर, २०१७ पासून लागू करण्यास देखील आज मान्यता देण्यात आली.
हे लाभ पुढील प्रमाणे राहतील- अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १) महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ मधील सर्वसाधारण तरतुदी ( भविष्यात करण्यात येणाऱ्या सुधारणांसह) लागू करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती योजना लागू करणे, अध्यापकीय पदांना द्विस्तरीय / त्रिस्तरीय वेतन संरचना लागू करणे, अध्यापकांनी विनाअनुदानीत कला संस्थेमध्ये केलेली सेवा उच्च वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणाच्या तरतुदी लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांपर्यंत प्रसुती रजा मंजूर करणे, "कॅन्सर" "पक्षाघात" झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजाविषयक तरतुदी लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती लागू करणे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अनुज्ञेय करणे, अशासकीय अनुदानित कला संस्थामधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय करणे.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, जळगांव, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर ,बुलढाणा, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्हा परिषदांतील ५४७ सेवानिवृत्त व ३४७ कार्यरत कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार असून यासाठी २४.०४ कोटी रुपये इतक्या आवर्ती खर्चास व थकबाकीपोटी येणाऱ्या ५०.०१ कोटी रुपये इतक्या अनावर्ती खर्चास आज मान्यता देण्यात आली.
पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. पाणी पुरवठा योजना तयार केल्यानंतर योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येते. अशा योजनेवरील कार्यरत रोजंदारी कर्मचारी यांना जिल्हा परिषदेकडून वेतन देण्यात येते. विविध कारणास्तव या रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी जिल्हा परिषदांना आर्थिक अडचणी येत आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना पुरेसे व वेळेवर वेतन अदा न झाल्याने पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे चालविण्यास मर्यादा येत आहेत.
रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांकडून विविध न्यायालयामध्ये उपस्थित प्रकरणामध्ये दिलेले आदेश, कालेलकर आयोगाच्या शिफारशी, पाणी पुरवठा योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदांना येणाऱ्या अडचणी विचारात घेवून शासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे दायित्व उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून सदरील कर्मचारी कार्यरत असेपर्यंतच पद निर्मिती करण्याचे ठरविले असून त्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी (सीआरटी/CRT-Converted Regular Temporary Establishment) आस्थापनेवर सामावून घेण्यात येईल.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी १०७.९९ कोटी खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व सरदारवाडी गावातील सुमारे ५०० हेक्टर जमिनीला फायदा होणार आहे. हा प्रकल्प कोकण पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत उर्वरित महाराष्ट्र या प्रदेशात असून या प्रकल्पाचा एकूण पाणी साठा ८.२२ दलघमी असा आहे.
Maharashtra Cabinet: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे मुख्य न्यायमुर्ती यांचे अतिरिक्त सचिव अशी २ पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
रु.43690-1080-49090-1230-56470 या वेतनश्रेणीवर ही पदे भरण्यात येतील. यासाठी ३७ लाख ८४ हजार ९४४ इतका वार्षिक खर्च येईल.
ओडिसा राज्यातून आलेला दोन कोटी 33 लाख रुपयांचा गांजा नागपूरमध्ये पकडल्यानंतर याच गांजाचं आता बीड कनेक्शन उघड झालं असून या प्रकरणात आष्टी पोलिसांनी आष्टी तालुक्यातून दोघांना अटक करून नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. नागपूर पोलिसांनी एका वाहनातून एक हजार पाचशे किलोच्या 71 गांजाच्या गोण्या जप्त केल्यानंतर पोलीस चौकशीमध्ये बीडच गांजा कनेक्शन उघड झालं आहे. ओडिसा राज्यातून आलेल्या दोन कोटी 33 लाख रुपयांच्या गांजावर नागपूर पोलिसांनी कारवाई केली होती यावेळी या गांजाची वाहतूक करणाऱ्या चालकांकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्याने हा गांजा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या सुभाष पांडुळे आणि अंबादास झांजे यांच्याकडून विकत घेतल्याची माहिती नागपूर पोलिसांना दिली.. आणि आता याच गांजाचं बीड कनेक्शन उघड झाल्यानंतर आष्टी पोलिसांनी सुभाष पांडुळे आणि अंबादास झांजे या दोघांना अटक करून नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
आता सर्वसामान्य शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतील. यासंदर्भात महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणेमुळे कृषि उत्पन्न बाजार समितीवर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व तसेच कामकाजात प्रत्यक्ष सहभाग वाढणार आहे. या अधिनियमाच्या 13 (1)(अ) या कलमामध्ये सुधारणा करुन कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या सुधारणेमुळे कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समितीवरील निर्वाचित सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविता येईल.
Nagpur : नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात (Maharashtra National Law University) सुविधा उपलब्ध करण्यासाठी 25 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. निधी मधून या विद्यापीठाच्या वारंगा येथील स्थायी कॅम्पसमधील शैक्षणिक संकुल, मुलामुलींचे वसतीगृह, ॲमेनिटी ब्लॉक व प्रशासकीय संकुल या इमारतींमध्ये हिटींग, व्हेटीलेशन व एअर कंडीशन यंत्रणा लावणे आदी काम करण्यात येणार आहेत.
केडीएमसीची बनावट परवानगी बनवत रेरा चे बांधकाम प्रमाणपत्र मिळवल्या प्रकरणी ६५ बिल्डर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .या प्रकरणाचा तपास एस आय टी कडून सुरू असून कागदपत्र बनवणाऱ्या पाच जणांना अटक करण्यासह संबधित ४० बिल्डरचे बँक खाते गोठवत या प्रकरणातील बिल्डर व त्यांच्या सहकाऱ्याविरोधात फार्स आवळण्यात आला आहे .आता केडीएमसीने देखील या इमारती शोधून इमारती पाडण्याचे सत्र सुरू केलं आहे .या प्रकरणातील कल्याण पूर्वेतील बेकायदा इमारतीवर केडीएमसीने हातोडा चालवला आहे..
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन महापालिका हद्दीतील काही बिल्डरांनी महापालिकेची बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून ही खोटी परवानगी रेरा प्राधिकरणास सादर केली. रेराकडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या प्रकरणाचा पर्दाफाश वास्तूविशारद संदीप पाटील यांनी केला. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. महापालिकेने महापालिका आणि रेराची फसवणूक केल्या प्रकरणी 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या बिल्डरांच्या बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असताना त्यात दिरंगाई केली जात होती. अखेरीस काल कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकळी येथील तळ अधिक चार मजली बेकायदा इमारत पाडण्यात आली. या इमारतीचा बिल्डर शिवसागर गुरुचरण यादव याने महापालिकेची खोटी परवावगी मिळवून त्या आधारे रेरा प्राधिकरणासह महापलिकेची फसवणूक केली. पोलिस बंदोबस्तात ही इमारत पोकलेन आणि ब्रेकरच्या सहाय्याने इमारत पाडण्यात आली. अन्य 64 बेकायदा इमारतीवर महापालिकेचे प्रभाग अधिकारी कधी कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यानी दिरंगाई केल्यास त्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार अशी तंबी आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान बिल्डरांकडून रेरा आणि महापालिकेच्या फसवणूक प्रकरणातील अन्य बेकायदा इमारतीचा ठाव ठिकाणी मिळून येत नसल्याची सबब अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सिलगुरी येथील एका कार्यक्रमात भोवळ आली. रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने भोवळ आल्याचे म्हटले जाते.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह 4 आरोपींची दुहेरी हत्याकांडातून निर्दोष सुटका करण्यात आली आहे. वर्ष 2009 मध्ये जे. जे. सिग्नलजवळ झालेल्या शूटआऊट प्रकरणी कोर्टाने हे आदेश दिले आहेत. छोटा शकील टोळीतील असिफ दाढी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडकची 29 जुलै 2009 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलचे दर पुन्हा घसरले असून काही महिन्यापूर्वी 85 हजार रुपये प्रति टन असलेले स्टील आता 60 हजार रुपये प्रति टनावर आले. आरबीआयच्या पतधोरणा नुसार इंटरेस्ट रेट वाढल्याने स्टील मधील मागणी कमी झाली असून त्यातील गुंतवणूक देखील मंदावली आहे.
Maharashtra Mumbai News : आरोग्य विभागासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकार महाराष्ट्र वैद्यकीय सेवा महामंडळाची स्थापना करण्याच्या विचार करत आहे. कदाचित आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय महामंडळ औषधांची खरेदी स्वतः करणार आहे. थेट कंपन्यांकडून औषधांची खरेदी केली जाणार असल्यानं औषधांच्या किमती कमी होणार आहेत.
Agitation : औरंगाबादमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद पडले आहेत. राज्यव्यापी ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलनास शेतकऱ्यांचा पाठींबा मिळाला आहे. कन्नड तालुक्यातील बोरगाव फाटा येथे ऊसाने भरलेल्या वाहनांची हवा आंदोलकांनी काढली आहे. आंदोलनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावर येत ठाकरे कुटुंबाने बाळासाहेब यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. यावेळी ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं.
Beed News : बीडच्या केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील ज्योतीराम मिसाळ या नवविवाहित तरुणाचा ट्रॅक्टर आणि टेम्पोचे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे..ज्योतीराम मिसाळ हा पत्नी आणि आई-वडिलांसोबत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ऊस तोडणी साठी गेला होता. ऊस घेऊन जात असताना ज्योतीराम यांच्या ट्रॅक्टरला एका टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली त्यामध्ये ज्योतीराम ट्रॅक्टरमधून खाली पडला आणि यातच टेम्पोच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दोन महिन्यापूर्वीच ज्योतीराम याचा विवाह झाला होता घरची परिस्थिती हालाखीचे असल्याने तो ऊस तोडणीची उचल घेऊन ऊस तोडणीला गेला होता आणि आताच त्याचा दुर्दैव मृत्यू झाल्याने कोल्हेवाडी गावावर शोकळा पसरली आहे.
Narayan Rane Bungalow : कोर्टाच्या आदेशानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी त्यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यामधील अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवायला सुरुवात केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात हे बांधकाम हटवले जाईल. बंगल्यावर जो अनधिकृत भाग होता तो काढून नकाशाप्रमाणे नियमात बांधकाम ठेवले जाणार आहे. मुंबई महापालिकेने नारायण राणे यांच्या बंगल्याला नोटीस दिली होती त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होतं.
2019 मधील हा प्रकार असून चांदूरबाजार येथील गोपाल तिरमारे यांची पोलीस अधिक्षकांकडे 26 सप्टेंबर रोजी दिली तक्रार
तक्रारीत म्हटलं आहे की, बच्चू कडू यांनी सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी धारधार शस्त्र बाळगून तलवारीने केक कापून भितीचे वातावरण निर्माण करून कायद्याचे उल्लंघन केलंय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलीय.
याप्रकरणी अद्याप कुठेही गुन्हा दाखल झाला नसून आमदार बच्चू कडू कडून अजून यावर काही प्रतिक्रिया आली नाही.
Nandurbar Accident : 2021 च्या तुलनेत या वर्षात नंदुरबार जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी करण्यात यश आले असून जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 26 ने कमी झाल्याची माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली. जिल्ह्यात ज्या ठिकाणी वारंवार अपघात घडत होते त्या अपघातस्थळी बांधकाम आणि परिवहन विभागाच्या वतीने विविध उपायोजना करण्यात आले. तसेच रस्त्यांवर सुरक्षा फलक लावण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वर्षभरात मद्यपी वाहनधारकांच्या विरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांचा हा परिणाम असल्याचे समोर येत आहे. नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने आतापर्यंत 185 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांचे वाहन परवाने रद्द केले आहेत. ड्रंक अँड ड्राईव्हच्या विशेष मोहिमेमुळे अपघातातील मृत्युचे प्रमाण कमी करण्यात यश आल्याचे पोलीस अधीक्षक पी.आर .पाटील यांनी सांगितलं.
Rayat Kranti Sanghatana : दिवसेंदिवस ऊस दराच्या (sugarcane price) मुद्यावरुन वातावरण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शेतकरी संघटना आक्रमक होत आहे. रयत क्रांती संघटनेनं (Ryat Kranti Sanghatana) ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी रयत क्रांती सघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.
OBC Reservation : राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू होणार की नाही याचा फैसला आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत ही सुनावणी होणार आहे. मागच्या चार-पाच वेळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नव्हती अखेर आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली आहे.
Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन. आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला आणि अवघी मुंबई स्तब्ध झाली. महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तीमत्व अशी ओळख असलेल्या बाळासाहेबांचा जीवनप्रवासही अनेक वळणं घेणारा होता. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू होणार की नाही याचा फैसला आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत ही सुनावणी होणार आहे. मागच्या चार-पाच वेळी सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकली नव्हती अखेर आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांचे काय होणार याचे उत्तरही या सुनावणीत मिळणार आहे. सोबत बीएमसीच्या प्रभाग रचनेबाबत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टात जायला सांगितलं होतं, त्याबाबत हायकोर्टातही आजच सुनावणी होणार आहे. ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल आगामी 92 नगरपरिषदांना लागू होत नव्हता. मात्र या निकालावर राज्य सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं पाच आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय विशेष खंडपीठ गठित करणार असल्याचंही म्हटलं होतं.
ऊस दरावरुन रयत क्रांती संघटना आक्रमक, बेळगावच्या साखर आयुक्तालयाला ठोकलं टाळे
दिवसेंदिवस ऊस दराच्या (sugarcane price) मुद्यावरुन वातावरण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. विविध शेतकरी संघटना आक्रमक होत आहे. रयत क्रांती संघटनेनं (Ryat Kranti Sanghatana) ऊसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी रयत क्रांती सघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी बेळगावातील गणेशपूर रोडवरील साखर आयुक्तालयाला टाळे ठोकले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.
योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार
ऊस दराच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. पण या मागणीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ऊस दरप्रश्नी साखर कारखानदारांनी एकजूट केली असून, त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळं आक्रमक बनलेल्या रयत संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बेळगावात साखर आयुक्तालयास टाळे ठोकले. या आंदोलनामुळं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, कारखानदार आणि सरकारकडून योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. साखर आयुक्त कार्यालयात उपस्थित नसल्यानं रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयास टाळे ठोकले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार लोकार्पण
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कार्यान्वित करण्यात येणा-या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार श्रीमती वर्षा गायकवाड, आमदार सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याशिवाय महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांचीही उपस्थिती असणार आहे. दुपारी चार वाजता होणारा हा कार्यक्रम धारावी परिसरातील शीव – वांद्रे लिंक रोड नजीक असणा-या संत रोहिदास मार्गावरील ओएनजीसी इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक दोन व काळा किल्ला नजिक हा कार्यक्रम आयोजित होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -