मुंबई : कामगार, कष्टकरी अन् शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आणि सभागृहात लढणारा नेता आज काळाच्या पडद्याआड गेला. ज्येष्ठ माकप नेते सिताराम येचुरी (Sitaram Yechuri) यांचे निधन झाले, वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिनाभरापासून सिताराम येचुरी यांच्यावर उपचार सुरु होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, गेल्या अनेक दिवसांपासून ते अतिदक्षता विभागात होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सीताराम येचुरी यांचे निधन झाल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. राजकीय, सामाजिक आणि सिनेसृष्टीतूनही त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनीही त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत, कामगार, शेतकऱ्यांचा हक्काचा आवाज हरपल्याचे म्हटले आहे. 


खासदार शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, सिनेअभिनेते कमल हसन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. सीताराम येचुरी हे माझे मित्र होते, आपल्या देशाचे सखोल आकलन असलेले भारताच्या कल्पनेचे संरक्षक, अशा शब्दात राहुल गांधींनी त्यांचे वर्णन केले. तसेच, आम्ही केलेल्या दीर्घ चर्चांना आता मी मिस करतोय, या दुःखीप्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि अनुयायांप्रती माझ्या सहवेदना आहेत, असे ट्विट राहुल गांधींनी केलं आहे. राहुल गांधी व सिताराम येचुरी यांचे मित्रत्वाचे नाते होते. कमल हसन यांनीही ट्विट करुन दु:ख व्यक्त केलंय. भारतीय राजकारणातील दिग्गज कॉम्रेड सीताराम येचुरी यांचे निधन झाल्याचे ऐकून अतिशय दु:ख झाले. विद्यार्थी कार्यकर्ता ते राजकारणी असा त्यांचा प्रवास असून आपल्या भाषणातून त्यांनी राजकारणावर वेगळीच छाप सोडली आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि हितचिंतकांबाबत सहवेदना व्यक्त करतो, निरोप कॉम्रेड, असे कमल हसन यांनी म्हटलं. आहे. 






शरद पवारांकडून शोक व्यक्त


मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा शिलेदार आज काळाच्या पडद्याआड गेला. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांची प्राणज्योत मालवली. भारतातील डाव्या पक्षांतील एक महत्त्वाचा आवाज असे त्यांचे कतृत्व सदैव स्मरणात राहील. सीपीआय-एम पक्षाचे सलग दोन वेळा सरचिटणीस पद भूषवणे हे त्यांना त्यांच्या अनुभवामुळेचे शक्य झालं. डाव्या विचारसरणीची ही सर्वात मोठी हानी म्हणावी लागेल. श्रमिक, कामगार आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज युचेरी यांच्या जाण्याने हरपला. सीताराम येचुरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ट्विट शरद पवार यांनी केलं आहे.