Jalna: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत तर दुसरीकडे मराठा आरक्षण प्रश्नही तापत असताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली असून राहुल गांधी भ्रमिष्ट आहेत त्यांना समजत नाही आपण कुठे काय बोलायचं असं म्हणत त्यांनी राहुल गांधींना चांगलंच सुनावलंय. भाजप आणि मित्रपक्ष विधानसभेत 180 पेक्षा कमी जागा जिंकणार नाहीत हे माझ्याकडून लिहून घ्या असं रावसाहेब दानवे म्हणालेत.
भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या अमेरिकी लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्याबद्दल भाजपसह मित्र पक्षांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचा आरक्षणाविरोधीचा चेहरा उघड झाल्याचं म्हटलं होतं. यावरूनच आता रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
काँग्रेसची मनस्थिती पूर्वीपासूनच आरक्षणाला विरोध करणारी असल्याचं रावसाहेब दानवे म्हणाले. यावेळी 1961 ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी सर्व मुख्यमंत्र्यांना आरक्षण विरोध असल्याचे पत्र लिहिलं होतं. बाहेर देशात जाऊन आपल्या देशाबद्दल वक्तव्य करत देशाचे बदनामी करण्याचे त्यांना सवय झाली असल्याचं दानवे म्हणाले. राहुल गांधी भ्रमिष्ट झाले आहेत त्यांना समजत नाही आपण कुठे काय बोलायचं. परकीय भूमीवर जाऊन असं बोलायचं हे चुकीचं आहे. असेही दानवे म्हणाले.
चाळीस जागांवर मतभेद
विधानसभा निवडणुकांच्या जागांचे खेळ सध्या सुरू झाले असून आम्ही एकत्रित बसून यशस्वीरित्या बोलणी पार पाडत आहोत असे रावसाहेब दानवे म्हणाले. तीन पक्ष म्हटल्यावर कुठल्या ना कुठल्या जागेवर काय येतो तो टाय सोडवण्यासाठी आमच्या तिन्ही नेतृत्वात हा टाय सोडवण्याची क्षमता आहे. कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो असे रावसाहेब दानवे म्हणाले.
180 पेक्षा अधिक जागा भाजप आणि आमचा पक्ष जिंकणार
लोकसभा निवडणुकीचा आधार घेऊन ते बोलू लागले आहेत असं म्हणत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, भाजप आणि मित्रपक्ष 180 पेक्षा कमी जागा जिंकणार नाही हे माझ्याकडून लिहून घ्या.