Maharashtra News Updates : संदिप देशपांडे मारहाण प्रकरण : संशयित आरोपींचे फोटो पोलीसांना सापडले
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे 5 तारखेला बेळगावला येत आहेत, छ.शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण आहे त्यामुळे त्यांचे स्वागत आहे, पण कर्नाटकातील निवडणुका जवळ येत असल्याने येथील राजकीय पक्ष समिती विरोधात मराठी लोकांना गोंजारण्यासाठी व आपल्या प्रचारासाठी महाराष्ट्र मधील नेत्यांना बोलवतात व आपल्याला पाहिजे तसे बरळून घेतात, पण यावेळी बेळगावला येताना अमोल कोल्हे यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मा.पवार साहेब हे सीमाप्रश्नी नेहमी आक्रमक व अग्रेसर असतात तेव्हा अमोल कोल्हेनी प्रत्येक ठिकाणी अभिनेत्याच्या वलयातून बाहेर पडून पक्षाच्या भूमिकेशी एकरूप झाले पाहिजे. तसेच त्यांनी स्वतः अनेकदा बेळगाव प्रश्नावर आवाज उठवला आहे पण आताच आलेल्या व्हिडिओत ते बेळगावला बेळगावी असे संबोधून आपल्या सीमाप्रश्नी योगदानावर पाणी तर फिरवत आहेतच शिवाय बेळगावच्या मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहेत तेव्हा अमोल कोल्हेनी बेळगावकरांच्या भावनांचा नक्की विचार करावा.
संदिप देशपांडे मारहाण प्रकरण : संशयित आरोपींचे फोटो पोलीसांना सापडले आहेत.
सीसीटिव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
राज्य परिवहन महामंडळाला राज्य शाशनाकडून 324 कोटी मिळणार .. 100 कोटी मार्च महिन्याच्या पगारासाठी देण्यात आले व 224 कोटी फेब्रुवारी महिन्याच्या सवलत मूल्य देण्यात आले
नांदेड - महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाच्या वतीने वेतन त्रुटी निवारण समितीच्या कृषी विभागाच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर न केल्याने धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात खुद्द जिल्हा कृषी अधीक्षक विद्या मानकर या देखील सहभागी झाल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला. सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वेतन त्रुटी बाबत घेतलेल्या अन्याकारक भूमिकेचा निषेध यावेळी करण्यात आला. सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक या आंदोलनात सहभागी झालेय.
उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील फॉलोवर लेन परिसरात गुरुवारी मध्यरात्री निरंजन यादव आणि अजय चव्हाण हे दोघे चालत जात होते. यावेळी त्यांना एकमेकांचा धक्का लागला. यावरून त्यांच्यात वाद होऊन अजय चव्हाण याने निरंजन याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत वर्मी फटका बसल्यानं निरंजन हा जागीच कोसळला, तर अजय पळून गेला. याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत निरंजनचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात अजय चव्हाणचं नाव निष्पन्न होताच अवघ्या तासाभरात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अजय चव्हाण याच्यावर यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये सद्या हापूस आंब्याच्या १२ हजार पेट्यांची आवक होवू लागली आहे. दरवर्षी पेक्षा या वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंब्याची आवक चांगली झाली आहे. १२ हजार पैकी ७ ते ८ हजार पेट्या कोकणातील तर ४ हजार पेट्या राज्या बाहेरून येत आहेत. सद्या दर पाहिला तर डझनाला २ ते ६ हजाराचा दर सुरू आहे. हापूस आंबा मार्केट मध्ये येवू लागला असल्याने निर्यातीला सुध्दा चालना मिळू लागली असून आवकीपैकी साधारण ४० टक्के आंबे गल्फ देशात निर्यात होवू लागली आहे.
परभणी शहर महानगरपालिकेचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.परभणी महापालिकेच्या सभागृहात मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी आज २०२३-२४ साठी ४२८ कोटी ६ लाख अर्थसंकल्प सादर केलाय.यात परभणी करांवर दोन नवीन प्रकारचा कराच्या बोजा पडणार आहे.नवीन आर्थिक वर्षात नवीन पाणी पुरवठा लाभकर,शिक्षण उपकर लागू करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांनी केला असुन यामुळे परभणी करांना मात्र सुविधेच्या मानाने जास्त कर भरावा लागणार आहे..
मुलुंड पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या 17 दुकानांवर आज मुंबई महानगरपालिकेने बुलडोझर चालविला. 30 ते 40 वर्ष जुनी दुकाने होती. पर्जन्य जलवाहिनीच्या वरती हे दुकाने असल्यामुळे पावसाळ्यात या परिसरात जलमय परिस्थिती निर्माण व्हायची, तसेच रस्ता हा अरुंद असल्यामुळे या परिसरात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस प्रवाशांची गर्दी देखील होत असे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील दुकाने हटविण्याचा निर्णय घेतला पालिकेच्या या निर्णयाविरोधात दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती परंतु उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाच्या बाजूने निर्णय दिल्याने अखेर मुंबई महानगरपालिकेने आज दुपारी पोलीस बंदोबस्तात ही सर्व दुकाने जमीन दोस्त केली.
महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा शनिवार दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. -ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
-कोपरी खाडी येथील प्रकल्पाचे लोकार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात होईल. कळवा खाडी प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवीन प्रसुतीगृह, वाचनालय, गावदेवी भूमिगत वाहनतळ आणि ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उद्यान यांचे लोकार्पण करून समारोप वागळे इस्टेट, रोड. नं. २२ येथे जाहीर कार्यक्रमाने होईल.
उद्घाटना विषयी अधिक माहिती
'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानातंर्गत शासनाच्या सहकार्याने ठाणे महापालिका व ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये वागळे इस्टेट येथील रोड नं. २२ चे सुशोभीकरण, ३९५ कोटींच्या रस्ता मजबुतीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन, कोपरी खाडी किनारा विकास प्रकल्प, कळवा खाडी किनारा विकास प्रकल्प, गावदेवी भूमिगत वाहनतळ, परिवहन सेवेत दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस व कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या सुसज्ज अशा विशेष प्रसुतीगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर, रुग्णालयातील वाचनालय, वृत्तपत्र वाचन केंद्र यांचेही उद्घाटन केले जाणार आहे.
जालना येथे समृद्धी महामार्गावर राजेवाडी गावाजवळ स्कार्पिओ उलटून झालेले अपघातामध्ये एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झालेत, अपघातातील जखमी वरती जालना शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ,दुपारी 3 च्या सुमारास नागपूर कडे वेगाने जाणाऱ्या या गाडीचे टायर फुटले, यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
बुलढाणा जिल्ह्यात आज बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. गटशिक्षणाधिकारी सिंदखेडराजा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या विविध कलमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेगाव येथून एका शाळेतून हा पेपर फुटला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून तक्रारीत नमूद प्रमाणे राजेगाव हा भाग साखरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने सदर गुन्हा साखरखेडा पोलिसांकडे वर्ग करणार असल्याची माहिती सिंदखेड राजा पोलीस निरीक्षक केशव वाघ यांनी दिली आहे. बारावीचा पेपर राजेगाव येथील एका परीक्षा केंद्रावरून फुटला असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.. त्यामुळे आता पोलीस कारवाईत काय तथ्य समोर येतात ते पाहावं लागणार आहे..
आज बारावी बोर्ड परीक्षेचा गणित विषयाचा पेपर होता या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पान सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून वायरल झाली असल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाली.
या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठ ही सकाळी साडेदहा नंतर प्रसिद्ध झाली आहेत मंडळने घेतलेल्या निर्णयानुसार सकाळच्या सत्रात साडेदहा वाजेपर्यंत दुपारी दुपारी अडीच वाजेपर्यंत परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
यावेळी नंतर कोणत्या विद्यार्थ्यांना परिषदांना प्रवेश दिला जात नाही..
त्यामुळे सदर गणित विषयाचा पेपर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा राज्यात कुठेही आढळून आलेलं नाही..
तसेच संबंधित घटनेबाबत सिदखेडराजा पोलीस स्टेशनला अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस पुढील तपास करत असून त्यामुळे *गणित या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही याची विद्यार्थी शिक्षक पालक व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आला आहे.
शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांच्या डोंबिवलीत मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे एका रुग्णालयातुन दुसऱ्या रूग्णालयात शिफ्ट करून रुग्णवाहिकेतून नेताना रुग्णवाहिका मध्येच बंद पडल्याने त्यांना वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात नेता आले नाही. म्हणून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केलाय.देसाई हे १९९५ ते २००० साली ते परळ लालबाग विधानसभा मदारसंघातील आमदार होते.गेली २२ वर्ष ते डोंबिवलीत राहत होते.त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हा त्रास आणखी वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्याची गरज होती. मात्र ज्या खाजगीर त्यांच्यावर उपचार सुरू होते तिथे व्हेंटिलेटर ची सुविधा नव्हती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयास शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यासाठी रुग्णवाहिका बोलावली, मात्र ही रुग्णवाहिका त्यांना घेऊन जात असताना ती मध्येच बंद पडली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी या रुग्णवाहिकेला धक्का मारत अर्धा किलोमीटर पर्यंत पुढे नेलं. त्यानंतर दुसरी एक रुग्णवाहिका बोलवून त्यांना दुसऱ्या खाजगी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या रुग्णवाहिक विरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचं देसाई यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
विधानपरिषदेत पक्षनिहाय आकडेवारीत भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी भाजप नेते प्रसाद लाड यांची निवड करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
खासदार संजय राऊत हे शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर असताना राऊत यांनी अंबाबाई तालीम संस्थेच्या श्री संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे आणि सिद्धार्थ भोकरे यांनी राऊत यांचे स्वागत चांदीची गदा भेट देऊन केली. आपल्या बेधडक वक्तव्यांनी प्रसिद्ध असणाऱ्या संजय राऊत यांचे स्वागत या चांदीच्या गदाने केल्याने याची बरीच चर्चा होतेय.. स्वागत त्यानंतर संजय राऊत यांनी अंबाबाई तालीम संस्थेने दिलेले या भेटीबद्दल आभार मानत आपले आणि या संस्थेचे अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध असल्याचे म्हटले.
३० हजार शिक्षकांच्या भरत्या पुढील दोन महिन्यात होणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची सभागृहात माहिती
भरतीबाबतची तयारी ही सुरू असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाणार
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन मध्ये वारंवार एटीएम कार्ड टाकूनही पैसे निघत नसल्याने एका माथेफिरूने या एटीएम मशिनची स्क्रीन दगडाने फोडण्याची घटना काल रात्री घडली आहे. या माथेफिरूने अनेकदा या मशीन मध्ये कार्ड टाकल पण मशीन मध्ये रोकड उपलब्ध नसल्याने त्यातून पैसे येत नसल्याच्या रागातून या माथेफिरूने चक्क एटीएम मशिनची स्क्रीन दगडाने फोडली व पसार झाला.यावेळी येथील सीसीटिव्ही बंद असल्याने नेमका हा माथेफिरू कोण..?ते समजू शकलं नाही. मात्र बँकेकडून मलकापूर पोलिसात या संबंधी तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Accident: शिर्डी नाशिक महामार्गावर चार वाहनांचा रात्री अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मात्र नुकसान झालं आहे. इको , इन्नोव्हा , ब्रेझा, होंडा एक्सेंट या चार वाहनांचा एकमेकांना धडकून अपघात झाला आहे.
Satara News: पुणे कोल्हापूर महामार्गावर कराड दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. कराड उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. वाहनांच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत. कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने त्या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ आहे पोलीसांकडून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Wardha News: वर्ध्याच्या सिंदी रेल्वे नजीक गौळ भोसा येथील शेतात विहिरीचे काम सुरू असताना विहीर खचली. यात दोन मजूरांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालाय. दबलेल्या मजुरांमध्ये 40 वर्षीय अमोल दशरथ टेंभरे व 28 वर्षाच्या पंकज प्रभाकर खडतकर याचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत दबलेल्या मजुरांना काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे महसूल विभागाने एस डी आर एफ च्या चमुला पाचारण केले होते. गुरुवारी सकाळपासून मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू करण्यात आले. तब्बल 50 फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये 20 फूट मलबा ढासळला होता. घटनेला 24 तास लोटले, शेतातील विहिरीमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास पहिला मृतदेह काढण्यात यश आले. तर सायंकाळी 4 वाजता दुसरा मृतदेह बाहेर काढण्यात आला
Beed News: नुकत्याच झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आई-वडिलांसोबत ऊसतोडनीच काम करणाऱ्या बीडच्या चिखली येथील नागेश लाड याने घवघवीत यश संपादन केल असून चिखली गावात त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. नागेश लाड हा राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करत असताना आई-वडिलांसोबत उसतोडणीच देखील काम करायचा आणि या परीक्षेमध्ये मोठी मेहनत घेऊन त्यांना यश संपादन केल्यानंतर गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली होती तर सर्व स्तरातून नागेशाच कौतुक केले जात आहे
Yavatmal News: यवतमाळच्या घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्रीक्षेत्र इंझाळा येथील श्रीनृसिंह सरस्वती संस्थानच्या आश्रामध्ये 85 वर्षीय श्रीराम महाराज यांच्या वयोवृद्धपणाचा गैरफायदा घेत संस्थांमध्ये तब्बल 43 लाखांची अफरातफर करण्यात आली आहे. 43 ग्राम सोन्यासह इतर मौल्यवान वस्तू सुमारे चार ट्रकमध्ये भरून चोरून नेल्याचा प्रकार पुढे आलाय आहेत. या प्रकरणी नागपुरातील सात जणांविरुद्ध घाटंजी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
Sangli News: मिरजेत कत्तलीसाठी आणलेल्या 54 वासरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघाना ताब्यात घेतले आहे. मिरज शहरातील जवाहर चौक येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संशय आल्याने एका ट्रक चालकाकडे चौकशी केली. या माल वाहतूक गाडीतून कत्तलीसाठी काही वासरे आणल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मोमीन गल्ली येथील एका घरात छापा टाकला असता या ठिकाणी 54 वासरे लपवून ठेण्यात आली होती. पोलिसांनी 54 वासरांसहित एक ट्रक आणि दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
Nandurbar News: जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पिकाच्या काढणीला वेग झाला असून, गव्हाची काढणी सुरू झाली असून नवीन गहू बाजार समिती दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.नंदूरबार बाजार समितीत नव्या गव्हाची आवक सुरवात झाली असून दररोज सरासरी 800 ते 1000 क्विंटल गहू बाजारात येत आहे. सध्या बाजार समितीत येणारी गव्हाची आवक कमी असून गुढीपाडव्यानंतर गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात होईल सध्याआवक कमी असल्याने गव्हाला 2100 ते 3000रुपये प्रतवारीनुसार दर मिळत आहे . मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात गव्हाची आवक वाढणार असल्याचा अंदाज आहे.
Mumbai News: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याच्या आवक वाढले आहे.या आठवड्यात दररोज 11 हजारांपेक्षा अधिक पेट्या दाखल होत आहेत.त्यातील साडेसात हजार पेट्या कोकणातील असून रत्नागिरी जिल्ह्यातील 20 टक्के पेट्यांचा समावेश आहे.रत्नागिरीतील आंब्यांची आवक 15 मार्च नंतर वाढेल असा अंदाज आहे.सध्या दोन हजार रुपयांपासून 6000 रुपयांपर्यंत पाच डझनच्या पेटीचा दर आहे.
पार्श्वभूमी
3rd March Headlines : राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक होणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग मांडला या संदर्भात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस
राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आज यावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. या चर्चा करताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेक आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. शेतकऱ्यांच प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरती विरोधक आक्रमक राहाणार आहेत.
संजय राऊतांविरोधात हक्कभंग प्रकरण
विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक होणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग मांडला या संदर्भात चर्चा होणार आहे. समितीचे अध्यक्ष राहुल कूल यांच्या उपस्थितती होणार बैठक.
यवतमाळमध्ये हिंदू जनगर्जना सभा रॅली
लव जिहाद धर्मांतर, गोहत्याबंदी कायदा यासाठी हिंदू जनगर्जना सभा रॅली नेर येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. याला कालीचरण महाराज, बाबूसिंग महाराज पोहरादेवी सहभागी होणार आहेत.
हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. राजकीय हेतून ईडीमार्फत अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा अर्जात उल्लेख. अटकपूर्व जामीन अर्जाला, ईडीचा विरोध. नाविद, अबीद आणि साजिद या हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांनी केलाय अटकपूर्व जामीनासाठी अर्ज.
ठाकरे गटाचा मेळावा
ठाकरे गटाच्या मेळाव्याला संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, लक्ष्मण हक्के, सुनील प्रभू उपस्थित रहाणार आहेत. सकाळी 11 वाजता, विष्णुदास भावे नाट्यगृह येथे हा मेळावा होणार आहे. मेळाव्यानंतर संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे.
ठाकरे गटात पक्ष प्रवेश
संजय राऊत यांच्या उपस्थित संध्याकाळी पाच वाजता सातारा येथील काही कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता साताऱ्यातील शाहू कलामंदिर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
सुधीर मुनगंटीवार आज सोलापूर दौऱ्यावर
सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी 9.45 वाजता विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेणार आहेत. सकाळी 10 वाजता संत साधू महाराज सेवा समिती मठाला भेट देतील. सकाळी 10.30 वाजता आर्य वैश्य समाज आयोजित परमात्मा श्री विठ्ठल रुक्मिणी आणि वेदांत केसरी ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज सोनपेठकर यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर परभणी दौऱ्यावर
महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज जिल्ह्यात आहेत. सकाळी 11 वाजता महिला समस्यांबाबत सुनावणी घेतील. दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
अमरावतीत ठाकरे गटाच्या शिवसेनेचा शिवगर्जना अभियान मेळावा
अचलपूर आणि बडनेरा याठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा शिवगर्जना अभियान मेळावा आयोजित करण्यात आलाय. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे मार्गदर्शन करणार आहेत.
भंडाऱ्यात काँग्रेसचे आंदोलन
गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ झाली असून या महागाईच्या आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज भंडाऱ्यात भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या घरावर काँग्रेसकडून, दुपारी 1 वाजता थाली बजाव आंदोलन केलं जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -