Maharashtra News Updates 01 March 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Mar 2023 11:39 PM
Thane News : ठाणे:  मुख्यमंत्र्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या राजूल पटेल यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Thane News : ठाकरे गटाच्या 'शिवगर्जना' मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेवर टीका करणाऱ्या राजुल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुल पटेल यांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत ठाण्याचे माजी नगरसेवक, शिंदे यांचे कट्टर समर्थक विकास रेपाळें यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी राजुल पटेल यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणे आणि आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना चक्क 'सोन्याचा धनुष्यबाण' भेट!

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर आता शिंदेंना चक्क सोन्याचा धनुष्यबाण भेट देण्यात आलाय. अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा आणि युवती सेना राज्य कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा बनसोडे यांनी हा एक तोळे वजनाचा अस्सल सोन्याचा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिला. हा सोन्याचा धनुष्यबाण पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काही काळ अचंबित झाले.

ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाची मोठी कारवाई
नकली परराज्यातील मद्या विरुध्द कारवाई करण्यासाठी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने खानवेल-उथवा रोडवरुन परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन निरीक्षक, श्री. आनंदा कांबळे व त्यांच्या सहकान्यांनी उधवा पोलीस चौकीसमोर, खाणवेल उधवा पालघर येथे पाळत ठेवली असता टाटा कंपनीच्या टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात फॉर सेल इन युटी दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासीत प्रदेशामध्ये विक्रीकरीता असलेल्या व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे 330 बॉक्स व बियरचे 70 बॉक्स जप्त केले आहे. सुरेशकुमार दयाराम यादव,वाहनचालक शैलेश मोहन वर्मा यांस अटक करून परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरलेला टाटा कंपनीच्या टेम्पो वाहनासह तसेच एकूण 400 बॉक्स, लाकडी भुशाच्या 200 गोण्या, दोन मोबाईल व एक वाहनासह  किंमत रु ४८,५६,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 
हिंदुत्ववादी संघटनाकडून अहमदनगर शहरात मुक मोर्चा

बजरंग दलाचे संयोजक  कुणाल भंडारी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा निषेध म्हणून शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला...माळीवाडा बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दिल्लीगेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला...हजारोंच्या संख्येने महिला पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते...कुणाल भंडारी यांच्यावर शहरातील रामवाडी परिसरात धारदार शास्त्राने वार करण्यात आले होते...त्यानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...याप्रकरणी तोफखाना पोलिसात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...मात्र, रामवाडी परिसरात हिंदू कुटुंबावर झालेली दगडफेक, कुणाल भंडारी यांच्यावरील हल्ला, जिल्ह्यात वाढत असलेल्या गोहत्या या सर्व घटनांचा निषेधार्थ हा मूक मोर्चा काढण्यात आला...यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बांधकाम करताना विहीर खचल्याने मजुर दबले ढिगाऱ्याखाली
वर्ध्याच्या सिंदी रेल्वे नजीक गौळ भोसा शेतात विहिरीचे काम सुरू असताना दोन मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना घडली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविन्यात येत आहे. दबलेल्या मजुरांमध्ये 40 वर्षीय अमोल दशरथ टेंभरे व 28 वर्षाच्या पंकज प्रभाकर खडतकर याचा समावेश आहे. अद्याप दबलेल्या मजुरांना काढणे शक्य झाले नाही, त्यामुळे महसूल विभागाने एन डी आर एफ च्या चमुला पाचारण केले आहे. सिंदी रेल्वे येथील शेतकरी सर्जेराव वरभे यांच्या शेतामध्ये विहिरीचे काम सुरू होते. यावेळी पाच मजूर कामावर कार्यरत होते. विहिरीत उतरलेल्या अमोल टेंभरे व पंकज खडतकर हे दोन मजुर विहिरीचा भाग खचल्याने खाली कोसळले. यात त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा पडला आहे.  ढिगाऱ्याखाली दबल्याने मजुरांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. सायंकाळ पर्यत रेस्क्यू करण्याचे काम सुरू होते. पण सायंकाळी शेतात अंधार झाल्याने काम थांबले आहे. एस डी आर एफ चमू बोलावून मजूर काढण्यात येईल असे सांगण्यात आलेय.
भिवंडी बस डेपो येथील बस चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न; 40 ते 50 फूट होर्डिंग वर चढल्याने एकच खडबड
भिवंडी शहरातील बस डेपो येथील एसटी महामंडळाचा चालक आत्महत्या करण्यासाठी 40 ते 50 वरील बॅनर होर्डिंग वर चढल्याने बस डेपोत एकच खळबळ उडाली. आनंद बाबासाहेब रणदिवे वय 45 असे एसटी महामंडळ बस चालकाचे नाव आहे. रणदिवे यांनी सांगितले की एसटी महामंडळ भिवंडी यांच्या जाचाला कंटाळून ते आत्महत्या करण्याकरता बनर होर्डिंग वर चढले होते त्यांनी हेही सांगितलं भिवंडी ते ठाणे तीन फेरी व आठ तास ड्युटी करावी परंतु अधिकारी चार फेरी व बारा तास ड्युटी करून घेत असल्याने त्यांच्या या त्रासाला कंटाळून त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलला आहे. रणदिवे यांच्या या निर्णयाने परिसरात एकच खळबळ उडाली.
Palghar News : राज्य उत्पादन शुल्क, विभागाची मोठी कारवाई; 400 बॉक्स अवैध दारू जप्त

Palghar News :  पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात विक्रीस बंदी असलेला पन्नास लाखांचा देशी, विदेशी मद्य साठा आणि मुद्देमाल जप्त केला आहे. दादरा-नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीकरीता असलेला भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचे 330 बॉक्स आणि बियरचे 70 बॉक्स असे एकूण दारूचे  400 बॉक्स , तसेच लाकडी भुशाच्या 200 गोण्या, दोन मोबाईल आणि एक मोठा टेम्पो असा अंदाजे 50 लाख  रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. लाकडी भुशाच्या आडून  ही दारूची तस्करी करण्याचा प्रयत्न राज्य उत्पादन शुल्क विभागाने हणून पाडला असून या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

नाशिक - रुग्णानेच परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली
रुग्णानेच रुग्णालयाच्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात घडलीय. मंगळवारी सायंकाळी साफसफाई करण्यासाठी वॉर्डमध्ये उभ्या असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना परिचारिकेने बाहेर काढले होते त्याचबरोबर रुग्णाला एका ठिकाणी बसण्यास सांगितल्याचा राग आल्याने रुग्णाने परिचारिकेला आणि साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केलीय. यात कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ  बुधवारी सकाळी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन करत जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आश्वासन मिळताच काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. 
कॉपीमुक्त अभियानाचा यवतमाळ जिल्ह्यात उडाला फज्जा: पुन्हा त्याच कातखेडा परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवताना झुंबड
 10 आणि 12वीची परीक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान राबविले जात आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली. मात्र या कॉपी मुक्त  अभियानाचा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काटखेडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात फज्जा उडविला जात आहे. या ठिकाणी आज सुरू असलेल्या 12 वी च्या फिजिक्स पेपर दरम्यान कॉप्याचा बाहेरून पुरवठा केल्या जात होता. काही विद्यार्थ्यांना वर्ग खोलीच्या खिडकीतून कॉपी पुरवण्या साठी अक्षरशः झुंबड दिसून येत होती. शाळेच्या मागील बाजूने तर भिंतीवर उभे राहून कॉपी दिली जात आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणात हा सर्व प्रकार खुलेआम सुरू असताना परीक्षा केंद्रावरील शिक्षक नेमके काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या खुलेआम कॉपी प्रकरणाने शिक्षण विभागातील काही महाभाग च्या आणि शाळा प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. 

 

27 फेब्रुवारी पुसद उपजिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी धाड टाकून पोतभट कॉपी जप्त केली होती. यावेळी 9 जनावरांना कारवाई जिल्हाधिकारी यांनी अमरावती बोर्डाकडे प्रस्तवित केली होती. यानंतर ही या केंद्रावर बिनधास्त पने कॉपी सुरू असल्याचा प्रकार आज पुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे हुशार विद्यार्थ्यांना मात्र गोंधळाचा सामना करावा लागत आहे.
‘होळी’ च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये - महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन
होळी सणाच्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये, अन्यथा अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांना दंड तसेच कैदेची शिक्षा होवू शकते, असे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.  

 

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ च्या तरतुदीनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / तोडण्यास कारणीभूत होणे हा कलम २१ अन्वये अपराध आहे. अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी कमीत कमी रुपये १,०००/- पासून रुपये ५,०००/- पर्यंत दंड तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते.

 

अनधिकृत वृक्षतोड करणे हा गुन्हा आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ‘होळी’ च्या कालावधीत कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महानगरपालिका विभाग कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांस व स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे, असेही महानगरपालिका प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
अमरावतीत प्रहारचं शेतकरी मुक्काम आंदोलन..
रोही, डुक्कर, हरीण यांचा बंदोबस्त करण्याची प्रमुख मागणी घेत आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते आणि शेतकरी आजपासून अमरावती येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर मुक्काम आंदोलन सुरू केले आहे.. यावेळी प्रहारच्या पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली.. केवळ एक फोटो काढला म्हणून पोलीस आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी वाद झाला.. 

 

खर तर रोही, डुक्कर, हरीण, माकडांचा त्रास प्रत्येक शेतकऱ्यांना आहे. आधी यांचा त्रास फार कमी प्रमाणात होतं परंतु या वन्यप्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतीला तारेचे पक्के कुंपण घालणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. शेतकऱ्यांची तशी आर्थिक   स्थिती सुद्धा नाही.. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. असाच वन्यप्राण्यांचा मुक्त संचार जर शेतात होत राहिला तर पुढे अजूनही शेतकरी शेती करणे सोडून देईल त्यामुळे या प्राण्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी प्रहार आता रस्त्यावर उतरणार आहे आणि जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत वन विभाग कार्यालय समोर आमचा मुक्काम राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली...
बीडमध्ये नाम फाऊंडेशन आणि शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील 11 गावांमध्ये जलसंधारणाच्या कामाला सुरुवात

Beed News : बीडमध्ये नाम फाऊंडेशन आणि शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील 11 गावांमध्ये जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नदी खोलीकरण रुंदीकरण आणि बंधाऱ्याचे पुनर्जीवन नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यापूर्वीही नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात जलसंधारणाचे अनेक काम करण्यात आले आहेत तर आता पुन्हा एकदा गेवराई तालुक्यातून या जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नदीच खोलीकरण आणि रुंदीकरण झाल्यान शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे

यवतमाळमध्ये आम आदमी पार्टीकडून कापसाची होळी, दरवाढीच्या मागणीसाठी आपचं आंदोलन

Yavatmal News : कापसाला अजूनही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरीच साठवून ठेवला आहे. त्यामुळे कापूस दरवाढीच्या मागणीसाठी आम आदमी पक्षाने यवतमाळच्या बसस्थानक चौकात कापसाची होळी करून आंदोलन केले. माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि भाई अमन यांच्या नेतृत्वात संविधान चौकामध्ये हे आंदोलन करण्यात आले. कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार रुपये भाव अपेक्षित असताना आठ हजारावर दर स्थिरावले आहेत. उत्पादन खर्च बघता शेतकऱ्यांना हे दर न परवडणारे आहे, यात सरकारची लबाडी असून शेतकरी नागवला जात असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला.

संस्था अध्यक्षांच्या मानसिक छळाला कंटाळून यवतमाळमधील बाबाजी दाते महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे आंदोलन

Yavatmal News : यवतमाळ शहरातील बाबाजी दाते महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी संस्था अध्यक्षाच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच धरणे आंदोलन सुरु केले. प्राध्यापकांच्या स्थाननिश्चिती वर्षानुवर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. संस्थेचा वाद धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांच्याकडे प्रविष्ट आहे. मात्र तरीसुद्धा संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते बेकायदेशीरपणे महाविद्यालयाच्या प्रशासनात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप या प्राध्यापकांनी केला आहे. तसेच प्राचार्य आणि प्राध्यापकांना निलंबित करण्याच्या नोटीसही अध्यक्षांकडून देऊन मानसिक त्रास दिला जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या. शिवाय संस्था अध्यक्षांविरोधात पोलिसात तक्रारही दिली. मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे प्राध्यापक संतप्त झाले आणि शेवटी या प्राध्यापकांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरु केले. प्राध्यापकांच्या या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे.

वाशिममध्ये रानडुकराच्या हल्ल्यात 28 वर्षीय युवकाचा मृत्यू

Washim News : वाशिम जिल्ह्यातील तराळा गावा मध्ये शेताची रखवाली करण्यासाठी गेलेल्या गणेश बायस्कर या 28 वर्षीय युवकाची रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना सकाळी उघड झाली आहे. गणेश आपल्या 9 एकर शेतात हरभरा पीक काढणीनंतर रात्री जागलीकरता गेला होता. सकाळी 4 ते 5 वाजेच्या दरम्यान रानडुकराच्या कळपाने हल्ला केल्याचं प्राथमिक उघड झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून तपास सुरु केला आहे.

बुलढाण्यात लग्न वऱ्हाडावर मधमाशांचा हल्ला, नवरदेवासह 250 वऱ्हाडी हल्ल्यात जखमी

Buldhana News : बुलढाण्यात लग्न वऱ्हाडावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात नवरदेवासह 250 वऱ्हाडी जखमी झाले. त्यांच्यावर जवळपासच्या विविध रुग्णालयात उपचार सुरु असून सर्व वऱ्हाडी सुखरुप आहेत. काल (28 फेब्रुवारी) सायंकाळी जिल्ह्यातील दुसरबिड इथे सायंकाळी एका लग्न समारंभाच्या वेळी नवरदेव घोड्यावरुन लग्नस्थळी जात होता. यावेळी डीजेच्या आवाजाने झाडावरील आगमोहोळच्या मधमाशांनी या लग्नातील वऱ्हाडी मंडळीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे भांबावलेला नवरदेव घोड्यासह धावत सुटला तर वऱ्हाडी मंडळी, बँडवाले, लग्न समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करणारा फोटोग्राफरसह सर्वच आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा इकडेतिकडे पळत सुटले. यावेळी जवळपास 250 वऱ्हाड्यांना मधमाशांनी चावा घेतला. तर नवरदेवाला तात्काळ जवळच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार करुन सोडलं. यानंतर रात्री आठ वाजता हे लग्न मोजक्याच वऱ्हाड्यांच्या उपस्थिती उरकण्यात आलं. सर्व वऱ्हाड्यांवर उपचार करण्यात आले असून सर्व धोक्याबाहेर आहेत.

कोथिंबिरीला भाव मिळत नसल्याने नांगर फिरवला, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याचा निर्णय

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील जवळा बुद्रुक येथील शेतकरी नामदेव इंगोले यांनी त्यांच्या एक एकर शेतामध्ये दीड महिन्यापूर्वी कोथिंबीरीची लागवड केली होती. अपेक्षा होती की उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोथिंबीरला चांगला भाव मिळेल. परंतु तसे काही झाले नाही. बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये कोथिंबीरचे भाव घसरले आहेत. शेतकरी नामदेव इंगोले यांना कोथिंबीर काढणी सुद्धा परवडत नाही. त्यामुळे त्यांनी चक्क एक एकर शेतातील कोथिंबीर पिकावर नांगर फिरवला आहे.

हिंगोलीत आजपासून सकाळी 7 वाजता शाळा भरणार, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा निर्णय

Hingoli News : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या सकाळच्या सत्रात भरणार असून सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत या शाळा सुरु राहणार आहेत. बारा वाजता सर्व शाळा सोडण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत.  सकाळच्या सत्रात जरी या शाळा भरवल्या जात असतील तरीही आठ तासिका घेण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये यामुळे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

खंडूजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांना आडवं करुन पुढे जायचे आहे. जिंकेपर्यंत लढायचे आहे : आंबादास दानवे

Navi Mumbai : गद्दार खंडूजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांना आडवं करुन पुढे जायचे आहे. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढत राहायचे आहे, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी केले आहे.नवी मुंबईत बेलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिवगर्जना मेळावा पार पडला. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, भास्कर जाधव आणि खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत यांची नावं घेणंच बंद करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या भाषणावेळी मोहित कंबोज यांचा उच्चार येताच कार्यकर्त्यांनी मोहित कंडोम असा उल्लेख करत उपरोधिक टीका केली.

यवतमाळच्या वणीतील गोकुळ नगरात घराला आणि बंड्याला आग, एकाचे घर तर एकाचा बंडा आगीत भस्मसात
Yavatmal News : यवतमाळच्या वणीतील गोकुळ नगर परिसरातील एकाच्या घराला आणि एकाच्या बंड्याला आग लागून दोन ते तीन लाखांचे नुकसान झाल्याची घटना काल (28 फेब्रुवारी) सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. वणी शहरातील गोकुळ नगर परिसरातील जानराव वाघडकर यांच्या मालकीचा कुटार ठेऊन असलेला बंडा आणि भीमराव आत्राम यांच्या मालकीचे असलेले घर अचानक लागलेल्या आगीत भस्म झाले. आगीत घरातील घरगुती वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. बंड्यातील कुटार तसेच बंड्यातील संपूर्ण लाकडी साहित्य जळाले असून घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच, अग्निशमन विभागाची टीम आणि वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. 
लहान भावानेच केली गतीमंद मोठ्या भावाची हत्या, यवतमाळमधील विडुळ परिसरातील घटना
Yavatmal Crime : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विडुळ इथे लहान भावाने गतीमंद असलेल्या मोठ्या भावाच्या डोक्यावर वार करुन त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गणेश माधव हातमोडे (वय 45 वर्षे) असे मृत गतीमंद असलेल्या भावाचे नाव आहे. उमरखेड तालुक्यातील विडुळजवळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उमरखेड पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावरुन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरता रुग्णालयात पाठवण्यात आला. गतीमंद मोठ्या भावाची लहान भावाने हत्या का केली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या प्रकरणाचा पुढील तपास उमरखेड पोलीस करत आहे. 
ठाण्यातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची हत्या, फेरीवाल्यांच्या भांडणातून खून झाल्याचा संशय

Thane Crime : ठाण्यातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख रवी परदेशी यांची हत्या झाली आहे. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. ज्युपिटर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फेरीवाल्यांच्या भांडणातून खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे नगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो... 


विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यापालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतील. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक राहणार आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात आक्रमक राहणार आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री आज उत्तर देतील. यावेळी राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होण्याची शक्यता आहे. 







 






मुंबई काँग्रेसतर्फे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) विरोधात आंदोलन 
 
मुंबई – मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. अदानी समुहाने जो आर्थिक घोटाळा आणि भ्रष्टाचार केलेला आहे त्यामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजने त्यांना मदत केलेली आहे, त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार आहे, सकळी 11 वाजता. 


नवाब मलिकांच्या जामीनावर आज कोर्टात सुनावणी


नवाब मलिकांच्या जामीनावर आजही कोर्टात सुनावणी सुरू राहील. मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. त्याचसोबत मलिकांवर तपासयंत्रणेनं केलेल्या आरोपांत तथ्य नसल्याचंही त्यांच्या वकिलांनी हायकोर्टात सांगितलंय.


सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस


सलग तिसऱ्या आठवड्यात मंगळवारपासून सुनाणीला सुरूवात झालीये. ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यावर शिंदेंकडून नीरज कौल यांनी युक्तीवादास सुरूवात केली. पक्षांरबंदी कायदा आणि राज्यपालांच्या भूमिकेवरून कोर्टात घमासान. तर राज्यपालांनी त्या परिस्थितीत जे निर्णय घेतले ते त्यांचं कर्तव्य होतं असा दावा नीरज कौल यांनी केला. तसेच बोम्मई केसनुसार तो राज्यपालांचा अधिकार आहे असा दावा कौल यांनी केलाय. 


आजपासून या नियमांमध्ये बदल होणार 



  • ग्राहकांना एटीएममधून 2 हजाराच्या नोटा मिळणार नाही.

  • आरबीआयने एमसीएलआर दर वाढवल्याने त्याचा परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार.

  • घरगुती सिलेंडर, सीएनजी, पीएनजी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 

  • रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता. 

  • ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सना नियमांचे पालन करावे लागणार


आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बुधवारी 1 मार्चपासून सुरू


बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये असलेल्या 25 टक्के आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठीची नोंदणी प्रक्रिया बुधवारी 1 मार्चपासून सुरू होणार आहे. यासाठीची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली असून प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची यादी आणि कार्यवाही ही देण्यात आली आहे. लॉटरीसाठी अर्ज विचारात घेतला जावा यासाठी अनेक पालक एकापेक्ष अधिक अर्ज भारतात मात्र एका विद्यार्थ्यांचे एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे प्राथमिक संचालनालयाने स्पष्ट केले आहे. 


हिंगोली जिल्हात उन्हाची तीव्रता लक्षात घेता परिषद शाळेच्या वेळेत बदल 


उन्हाची तीव्रता लक्षात घेता आज पासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल केलाय. सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू असणार जिल्हा परिषद शाळा.


कुणाल भंडारी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नगर शहरात निषेध मोर्चा 


अहमदनगर – बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांच्यावर काल झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नगर शहरातून निषेध मोर्चा निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे तर दिल्ली गेटपर्यंत मोर्चा जाणार आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सखल हिंदू समाजच्या वतीने हा मोर्चा होणार आहे, दुपारी 3 वाजता.


जळगाव जामोद येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची सभा 


बुलढाणा – जळगाव जामोद येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेची सभा होणार आहे. या सभेसाठी उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, शुभांगी पाटील संबोधित करणार आहेत, संध्याकाळी 6 वाजता


सचिन तेंडुलकरची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत 
 
मुंबई – सॅव्हलॉन कंपनीकडून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत योगदान देण्यात येत आहे. अशात सचिन तेंडुलकर याला ब्रॅंड ॲम्बॅसिडॉर नेमण्यात आलं आहे. यासंदर्भात सचिन एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत देणार आहे, सकाळी 11 वाजता. 


भारत-ऑस्ट्रेलिया सामना  


टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.