Maharashtra News Updates: Sangli: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करताना पोलिसांसोबत हूज्जत घातल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने कडू यांच्यासह अन्य चार आरोपींना निर्दोष मुक्त केले. आमदार कडून यांची निर्दोष मुक्तता केली असली तरी त्यांना अडीच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये नोव्हेंबर 2015 ला आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला तीन टक्के निधी खर्च न करण्यात आल्यामुळे त्यांनी आंदोलन केले होते. यावेळी कडू यांच्यासह आंदोलक थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शिरले होते. यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यासोबत कडू यांनी हुज्जत घातली होती. तसेच त्यांनी अर्वाच्य भाषेत पोलिसांना शिवीगाळ केली, असा आरोप करत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
उस्मानाबाद शहराचे धाराशिव आणि औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्याचे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याप्रमाणे आज उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा आणि औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असे करण्यासाठी राज्य सरकारने राजपत्र नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यामुळे आजपासून शहराप्रमाणेच या दोन्ही जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील सावळेश्वर पैठण येथे एका शोभेची दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. सावळेश्वर पैठण या ठिकाणी शोभेची दारू बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात अचानक स्फोट झाल्यानंतर या ठिकाणी असलेला कच्चामाल आणि तयार केलेले फटाके पूर्णपणे जळून खाक झाले असून कारखान्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिस करत आहेत
उद्धव ठाकरे खोक्यांचा व्यवहार करतानाची कॅसेट क्लिप आपल्याकडे आहेत असा आरोप करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेंडणेकर यांनी उत्तर दिलय. राणे फुटले तेव्हा त्यांच्या क्लिप नव्हत्या का? राणे यांना दोन वेळा पाडलं. एका महिलेने पाडलं तेंव्हा क्लिप नव्हत्या का? असा सवाल करत किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
Beed News : शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा विजेचा पुरवठा करण्यात यावा यासाठी बीडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड येथे असलेल्या महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे. महावितरणकडून सध्या थकीत वीज बिलामुळे अनेक शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. तर, दुसरीकडे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा करण्यात यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.
जत तालुक्याच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि अधिवेशनाच्या पाश्वभूमीवर जत तालुका उपविभागीय कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. जत तालुक्याचे तातडीने विभाजन करावे, तोपर्यंत संख येथील अप्पर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे निर्माण करावीत, तसेच सर्व सोयींनी सुसज्ज अशी संख येथे प्रशासकीय इमारत करावी, संख येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, जत शहरात स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करावा, जत तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची रिक्त पदे प्राधान्याने तातडीने भरावीत, म्हैसाळ योजनेतून पूर्व भागातील गावासाठी लाभधारक असणारी उर्वरित निविदा प्रक्रिया राबवावी, म्हैसाळ पंप गृह विभाग क्रमांक 2 हे कार्यालय जत येथे स्थलांतरित करावे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
Baramati News: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळण मार्गावर द्राक्षांनी भरलेली पिकअप पलटली. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. पीक अप उलटल्याने द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. हा पीक अप इंदापूरहून सोलापूरच्या दिशेनं निघाला होता. इंदापूर बाह्यवळणावर हॉटेल देशपांडे व्हेज जवळ घडली घटना. पिकअप उलटल्यानंतर वाहने शेजारील दुसऱ्या रस्त्याने वळवली होती. पिकअप पडल्यानंतर त्यातील द्राक्षे पळवून नेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
Bhadra News: दहावी बोर्डाची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होत असून परीक्षेचे पूर्वापार केंद्र ऐनवेळी बदलविल्यानं विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळं जुने परीक्षा केंद्र द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थी पालकांसोबत थेट भंडारा जिल्हा परिषदेवर धडकले.
भंडाऱ्यातील कवडशी येथील शशांक माध्यमिक विद्यालय असून येथील विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा जवळच असलेल्या बेला येथील परीक्षा केंद्रावर होत होती. मात्र, यावर्षी बोर्डानं जुनं परीक्षा केंद्र रद्द करून 15 किलोमीटर अंतरावरील कोंडी गावात दिलं आहे. या केंद्रावर जाण्याच्या मार्ग हा जंगलव्याप्त आणि मार्गही अगदी खडतर आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहचायला जीव मुठीत घेवून जावे लागणार असून त्यात वेळही जाणार असल्याने ते केंद्र रद्द करून जुनेच परीक्षा केंद्र द्यावे, या मागणीला घेवून शाळेचे 38 विद्यार्थी आपल्या पालकांसह जिल्हा परिषदेवर धडकले. प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Maharashtra News: प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्याविरोधातील खटल्याची सत्र न्यायालयातील सुनावणी 13 मार्चपर्यंत तहकूब
बच्चू कडू आजच्या सुनावणीस गैरहजर
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याचं प्रकरण
मंत्रालयात केलेल्या आंदोलन प्रकरणातील खटल्यात आरोप निश्चिती अद्याप प्रलंबित
Maharashtra News: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Nagpur News: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात नाफेड केंद्रावर चना खरेदी नोंदणी आजपासून सुरू होणार होती. मात्र खरेदी-विक्री संघाच्या नियोजन शून्य कारभारामुळे या केंद्रावर प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने चणा खरेदी नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आता गुरुवार 2 मार्चपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असून यामुळे शेतकऱ्याचा मात्र चांगलाच संताप दिसून आला.
Crime News: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर गावातील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या अज्ञात तीन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवुन दिवसभरातील पेट्रोल डिझेल व ऑइलचे जमा झालेले 2 लाख 50 हजार 747 रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आलीय. विशेष म्हणजे साकुर जवळील घारगाव गावातील एका इसमाला धाक दाखवत त्याची दुचाकीसुद्धा याच चोरट्यांनी लांबवलीय.
Beed News : रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला किंवा हॉटेल समोर उभ्या असलेल्या वाहनांमधून इंधन चोरणारा एका सराईत गुन्हेगाराला केज पोलिसांनी अटक केली आहे. बाबुशा काळे असे आरोपीचे नाव असून गेल्या अनेक दिवसापासून हा आरोपी रस्त्याच्या कडेला किंवा हॉटेल समोर उभे असलेल्या वाहनातल्या मध्यरात्री इंधन चोरायचा त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते आणि मध्यरात्री तो कन्हेरवाडी परिसरात डिझेल चोरी करण्यासाठी आला असता पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.
Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईन आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल."
Beed News : बीडच्या केज तालुक्यामध्ये चंदनाची चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या तिघांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे तर त्यांच्याकडून चंदन चोरीसाठी वापरण्यात येणारे कुऱ्हाड वाकस गिरमिट यासह पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. वरपगाव रोडवर चंदनाची चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे तर त्यांच्याकडून तब्बल 12 किलो चंदन जप्त केल आहे.
Buldhana News : प्रवासादरम्यान घराजवळ बस थांबवली नाही, म्हणून महिलेची बस वाहकाला मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराजवळ बस का थांबवली नाही? म्हणून एका वकिलाच्या बायकोनं चालत्या बस मध्ये बस वाहकाला शिवीगाळ करून मारहाण केलीय. देऊळगावराजातील संजयनगर भागात ही घटना घडलीय. याप्रकरणी बस वाहकाच्या फिर्यादीवरून देऊळगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जाफ्राबाद-छत्रपती संभाजीनगर बसमध्ये ही घटना घडली. समद तडवी असं मारहाण झालेल्या बस वाहकाचं नाव आहे.या प्रकरणी देऊळगावराजा पोलीस अधीक तपास करत आहे.
राज्यामध्ये 800 किलो कांद्याचे 2 रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचे आपण पाहिले, त्याचप्रमाणे पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील शेतकऱ्याला ही 95 किलो वांग्याचे केवळ 66 रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये या वांग्याची विक्री करण्यात आली. नंतर या शेतकऱ्याने आपल्या 11 गुंठे शेतातील वांग्याचं पीकच उपटून टाकलं. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तीन महिने कष्ट करुन पिकवलेल्या पिकाच्या काढणीचा खर्च सुद्धा निघाला नाही. राज्यकर्त्यांनी एकमेकाची उणीधुणी काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल याकडे लक्ष द्यावं अस आता शेतकरी म्हणत आहेत.
Amravti News: नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू होतेय. हरभरा विकण्यासाठी धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांनी कालपासून रांगा लावल्यात. शेतकऱ्यांची गर्दी पाहून पोलिसांच्या बंदोबस्तात हरभरा विक्रीची नोंदणी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल का, हरभरा घेतल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे कधी मिळतील. असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
G20 Meet Aurangabad : आज आणि उद्या होणाऱ्या जी-20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज झालंय. कालपासूनच परिषदेसाठी परदेशी पाहुणे शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या देशातील 150 महिला सदस्यांची ही दोन दिवस परिषद असणार आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भागवत कराड, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. जी20 परिषदेसाठी छत्रपती संभाजीनगर स्वच्छ करण्यात आले होते. मात्र काही उपद्रवी नागरिकांनी त्यातही शहराचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला. अशा 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी आणि भितींवर थुंकल्याप्रकरणी ही गुन्ह्याची नोंद झाली आहे.
Maharashtra Budget Session: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतंय. असं असलं तरी मंत्रिमंडळाच्या विस्ताराअभावी मंत्र्यांकडे अतिरिक्त भार आहे. अशीच परिस्थिती गेल्यावेळीही होती. मूळ खात्यासह मंत्र्यांवर अतिरिक्त खात्याचंही कामकाज पाहण्याची जबाबदारी आलीय. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त खात्यांच्या जबाबदारीमुळे मंत्री सर्व खात्यांनी न्याय देऊ शकतील का, असा सवाल उपस्थित होतोय
Maharashtra Budget Session: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. तत्पूर्वीच म्हणजे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच आरोप-प्रत्योरोपांवरून राजकारण चांगलंच तापलंय. काल सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. शेतकऱ्यांच्या ताटात संकटांचा कडू घास पडलेला असताना, सरकारच्या चहापानाचा गोडवा घेणं, हा महाराष्ट्रद्रोह ठरेल असं म्हणत अजित पवार यांनी सरकारवर कडाडून टीका केली होती. या शिवाय अनेक मुद्यांवरुन अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला. अजित पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान, या अधिवेशनात सत्तासंघर्ष, शेतमालाचे पडलेले भाव, पत्रकार शशिकांत वारिसे, पोटनिवडणूक, यासह अनेक मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
BEST Bus : बेस्ट उपक्रमाने ‘बेस्ट चलो अॅप’ आणि ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’च्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने प्रवासभाडे देण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश देण्यात येणार आहे. ही सुविधा 1 मार्चपासून उपलब्ध होणार आहे. तसंच जे प्रवासी डिजीटल पर्यायांचा वापर करत नाहीत त्यांची गैरसोय होणार का? असा सवाल आता प्रवासी विचारु लागलेत. त्याचबरोबर जर प्रवाशांनी या अॅपचा वापर केला तर त्यांना सुट्टे पैशांची अडचण निर्णाण होणार नाही असंही बेस्टकडून सांगण्यात आलंय.
Costal Road Project : उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातला आणि मुंबईकरांसाठी प्रचंड उत्सुकतेचा असलेला कोस्टल रोड 1 नोव्हेंबरला खुला होणार आहे. सध्या कोस्टल रोडचं काम 70.48 टक्के पूर्ण झाल्याची माहिती इक्बालसिंह चहल यांनी दिलीय. मुंबईच्या समुद्रात किनाऱ्याला लागून काही ठिकाणी भराव टाकून तर कुठे बोगद्यातून तसेच ब्रिजवरून हा रस्ता जाणार आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांची अदलाबदल होणार आहे, अशा ठिकाणी कनेक्टर जंक्शनही उभी केली जात आहेत.
Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील डोंनगाव येथील एका पेट्रोल पंप चालकाची साडेतीन लाख रुपये असलेली पिशवी घेऊन पोबारा करु पाहणाऱ्या एका चोरट्याचा पोलिसांनी तब्बल 22 किलोमीटर पाठलाग करुन त्याला बेड्या ठोकल्या. ही घटना रविवारी रात्री साडे बारा दरम्यान घडली. पेट्रोल पंप चालक रात्री घरी जात असताना त्याच्या हातातील कॅश असलेली पिशवी एका चोरट्याने घेऊन पोबारा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी फिरत्या पथकाला माहिती दिली. यावरुन एक इसम वेगाने बाईकवर जाताना दिसला असता पोलिसांनी संशयाने त्याचा पाठलाग केला आणि त्याला बेड्या ठोकल्या असता तो त्याच पेट्रोल पंपाचा मॅनेजर असल्याच निष्पन्न झालं. पोलिसांनी पेट्रोल पंप चालकाच्या तक्रारीवरुन ज्ञानेश्वर नागरिक याला अटक केली असून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांची रक्कम आणि बाईक हस्तगत केली आहे.
Pandharpur News: पंढरपूर आटपाडी रोडवर शेरेवाडी येथे एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्सची वाट पाहत असणाऱ्या कुटुंबाला उडवून गाडी दुकानात घुसल्याने आज्जी आणि पाच वर्षाच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगोला तालुक्यातील शेरेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली असून गाडीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास हे भरधाव वेगाने गाडी थेट काळेल कुटुंब ज्याठिकाणी उभे होते त्यांच्या अंगावरून शेजारी असणाऱ्या दुकानात घुसली. यामुळे दुकानाची भिंत कोसळली आणि कार दुकानात जाऊन थांबली. यावेळी या मुलाची आज्जी द्रौपदा शिवाजी आटपाडकर यांचा गाडीखाली येऊन जागीच मृत्यू झाला. यातील लहान मुलगा उडून दुकानातील भिंतीखाली सापडल्याने यात सिद्धेश्वर काळेल या पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. या धडकेत मुलाचे वडील नामदेव काळेल आणि त्याची आई रुक्मिणी काळेल यादेखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांचेवर सांगोला येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत. हे काळेल कुटुंब रोजगारासाठी मुंबई येथे जाणार होते आणि रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हलसची वाट पाहत उभे असताना या भरधाव कारने धडक दिली.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. तर, जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ईशान्य भारतातील नागालँड आणि मेघालय राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीति या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प आहे.
नागालँड आणि मेघालयात मतदान
नागालॅंड आणि मेघालाय या दोन राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यात विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. मात्र दोन्ही राज्यात 59 – 59 जागी मतदान होणार आहे. नागालॅंडमध्ये विरोधकाने नाव मागे घेतल्याने भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. तर मेघालयात सोहियोंग विधानसभेसाठी युनाइटेड डेमोक्रेटिक पार्टी (यूडीपी) चा उमेदवार एच. डोनकुपर रॉय लिंगदोह यांचा मृत्यू झाल्याने तिथे मतदान होणार नाही.
जागतिक मराठी भाषा दिवस
- जागतिक मराठी भाषा दिवसनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- ठाकरे गटाकडून जागर मराठी भाषेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्यावतीने कार्यक्रम पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.
- नवी मुंबई मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही मुलाखत असणार आहे.
- मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त भव्य ग्रंथ दिंडी मिरवणुकीचे आयोजन
- नाशिक- मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ दिंडी. नाशिक मनपा, सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन साजरा करणार. कार्यक्रमाला 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे उपस्थित राहणार आहेत.
मुंबई
- पोलीस भरतीप्रमाणे महापारेषण कंपनीमध्ये तृतीयपंथीयांना नोकरीत आरक्षण देण्याच्या मागणीवर हायकोर्टात आज सुनावणी
- मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
- मुंबई सत्र न्यायालयात पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आरोप निश्चितीची प्रक्रिया होणार आहे. या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि प्रवीण राऊत देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर
जी 20 परिषद आज आणि उद्या असणार आहे.
वेगवेगळ्या देशातील 150 महिला सदस्यांची दोन दिवस परिषद आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भागवत कराड, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत
अमरावती
नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होणार आहे.
धुळे
शिवगर्जना संवाद दौऱ्याला माजी खासदार अनंत गीते, वरुण सरदेसाई उपस्थित राहणार.
पालघर
वसई - तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी अभिनेता शीझान खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी असणार आहे.. तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला खान आता न्यायालयीन कोठडीत आहे.
कोल्हापूर
धरणग्रस्त नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर आंदोलनात सहभागी होणार आहेत.
वाशिम
राज्यातील 29 हजार ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन आहे. संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्याची प्रमुख मागणी आहे
इतर महत्त्वाच्या घडामोडी
दिल्ली
मनीष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात 'आप' आज दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर निदर्शने करणार आहे.
बेळगाव
पंतप्रधान मोदी बेळगाव दौऱ्यावर आहे. विविध विकासकामांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. राणी कित्तूर चन्नमा चौक ते मालिनी सिटीपर्यंत मोदींचा रोड शो होणार आहे. रोड शो नंतर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा असणार.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -