Maharashtra News Updates : नौपाडात बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून दोन जण ठार, एक जण जखमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Feb 2023 08:44 PM
Thane Accident: नौपाडात बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून दोन जण ठार, एक जण जखमी

नौपाडा बी केबिन येथील संतोषी माता मंदिराच्या बाजूला असणाऱ्या सत्यनिलायम सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. जेसीबीने खालची माती काढण्याचे काम सुरू असतानाच बाजूला असलेल्या मातीचा भला मोठा ढिगारा कोसळून त्या खाली तीन कामगार अडकले.  त्यानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. काही वेळातच ढिगारा बाजूला केल्यावर त्याखाली अडकलेल्या दोन जणांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर एकजण गंभीर जखमी आढळला. त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिलीय. हबीब बाबू शेख वय (42) आणि रणजित हे दोघे मृत्यूमुखी पडलेत आणि गंभीर जखमीचे नाव निर्मलराब कुमार असं आहे.

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये वणव्यामुळे डोंगराला लागली आग; शेकडो झाडांचं नुकसान

Ahmednagar News : नगर तालुक्यातील इमामपूर घाटातील डोंगराला वणव्यामुळे आग लागल्याची घटना घडली या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. दुपारी एक वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. या आगीत इमामपूर घाटातील कवडा आणि धुमा डोंगरावरील शेकडो झाडांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि जेऊर येथील वनमित्रांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, या घटनेत वनसंपदेचं मोठं नुकसान झालं आहे.

MPSC : एमपीएसीचा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करणार : राज्य सरकारचा मोठा निर्णय

MPSC : एमपीएससीचा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांची जी अभ्यासक्रमाच्या बाबतीत मागणी होती ती आता मान्य झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. 



राहुल गांधी यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम, मानहानी प्रकरणातील याचिकेवरील सुनावणीला 16 मार्चपर्यंत स्थगिती

Rahul Gandhi: राहुल गांधी यांना हायकोर्टानं दिलेला दिलासा कायम. मानहानी प्रकरणात दिलासा मागत दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीला 16 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. गिरगाव दंडाधिकारी कोर्टातील खटल्यात तोपर्यंत सुनावणी न घेण्याचे निर्देश दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख "चौकीदार चोर है" असा केल्याबद्दल राहुल गांधींविरोधात मानहानीची तक्रार करण्यात आली होती. 

Nawab Malik: नवाब मलिकांच्या जामीनावरील आजची सुनावणी तहकूब

Nawab Malik: नवाब मलिकांच्या जामीनावरील आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.  उद्या दुपारी 12:45 वाजता पुन्हा सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आले आहे. 

APMC मार्केटमध्ये कांद्याची मोठी आवक, दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान

APMC Market : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने याचा परिणाम दरावर झाला आहे. नेहमी 100 ते 120 गाड्यांपर्यंत असणारी आवक आता 140 ते 150 गाड्यांवर गेली आहे. यामुळं कांद्याचे दर कमालीचे पडले असून किलोला 7 रुपयांचा दर झाला आहे. कांदा थेट 7 रुपयांवर आल्यानं याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या महिन्यात 15 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 7 ते 8 रूपयांवर आला आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यात कांद्याचे पीक शेतकरी घेत असल्यानं उन्हाळी कांद्याचे नवीन पिक आल्याने उत्पादन वाढले आहे. महाराष्ट्र बरोबर गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक राज्यातही कांद्याचे पिक घेतले जात आहे. त्यामुळे परराज्यात ही महाराष्ट्रातील कांद्याला मागणी नाही. दुसरीकडे निर्यात सुरू असली तरी उत्पादन प्रचंड असल्याने मार्केट मध्ये कांदा जास्त झाला आहे. या सगळ्यांचा परिणाम झाल्याने दर जमिनीवर आले आहेत.

 HSC Exam: बारावीच्या परीक्षेत दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट, कर्मचाऱ्याकडून दोन मोबाईल जप्त

 HSC Exam:  इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असुन  कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल डायरी दप्तर कॅल्क्युलेटर व इतर साहित्य परिषदेने वापरू नये अशा सूचना सुद्धा दिल्या आहेत त्यानंतरही सूचनांचे पालन केले जात नसेल तर कारवाई करण्याचे आदेश दिले होते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज  यवतमाळ  येथील वाघापुर रोडवरील पिपल्स  हायस्कुल आणि शिवाजी हायस्कुल या दोन परीक्षा केंद्राना आकस्मिक भेट दिली. परीक्षा केंद्रावर कुणीही मोबाईल वापरणार नाही याची कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी केंद्र प्रमुखांना दिलेत. शिवाजी हायस्कूल मध्ये शिपायाजवळ असलेला फोन त्यांनी जप्त केला.

Washim News: वाशीम जिल्ह्यात हळद काढणीला सुरुवात

Washim News: मागील वर्षी मे आणि जून महिन्यात पेरणी करण्यात आलेल्या वाशीम जिल्ह्यातील हळद काढणीला सुरुवात झाली आहे. अतिवृष्टी आणि वातावरणातील बदलामुळे हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

Yavatmal News:  विदर्भ केसरी शंकर-पटात मध्यप्रदेश, तेलंगणा, मराठवाड्यातील धावल्या जोड्या

Yavatmal News:  यवतमाळमध्ये 25 वर्षानंतर आयोजित केलेल्या शंकरपटात 200 बैलजोड्या शंकरपटात सहभागी झाल्या. शंकरपटातील धावणाच्या बैलजोड्या प्रत्येक सेकंदाला उत्कंठा वाढवणाऱ्या होत्या. दुचाकीच्या वेगापेक्षाही अतिशय चपळतेने रस्ता कापणाऱ्या या जोड्या लक्ष वेधून गेल्या. खासकरून लखन-अर्जुन जोडीने मैदान गाजविले.  निलू तिवारी यांची शंभू-गुरु जोडीने 6 सेकंद 36 पॉइंटमध्ये अंतर कापले. आकाश राऊत यांची राजा बादशाह जोडीने 6 सेकट 30 पॉइंटमध्ये अंतर पूर्ण केले. समीर पाटील यांची बजरंग-रनधीर जोडीने 6 सेकट 34 पॉइंटमध्ये अंतर गाठले. विदर्भ केसरी शंकर- पटाच्या  यवतमाळातील कृषी विज्ञान केंद्राच्या मैदानावर 200वर जोड्या धावल्या. रात्री उशिरापर्यंत शंकरपटामध्ये सहभागी होण्यासाठी बैलजोड्या येत होत्या.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आज पुण्यातील डेक्कनच्या नदीपात्रात होणारी सभा रद्द

Pune Bypoll election :   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पुण्यातील डेक्कनच्या नदीपात्रात होणारी सभा रद्द करण्यात आली आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभे ऐवजी रोड शोमधे सहभागी होणार आहे.  रोड शो नंतर देवेंद्र फडणवीस चिंचवड मतदारसंघात जाऊन दोन सभा घेणार आहे. यावरुन  मात्र महत्वाच्या कसबा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची या निवडणुकीत एकही सभा होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.

राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशीही ठाकरे गटाकडून युक्तिवाद

Supreme Court:  सर्वोच्च न्यायालयात या आठवड्यातील सुनावणीचा तिसरा दिवस आहे. दोन दिवस ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आजही ठाकरे गटाचा  युक्तिवाद सुरू आहे.

Beed News:  बीडच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून 60 कोटी रुपयांचा अधिकचा निधी मंजूर

Beed News:  बीडमध्ये विकास कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून शासनाकडे 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 60 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून 409 कोटी 8 लाख रुपयांचा नवीन विकास आराखडा जिल्हा नियोजन समितीकडून तयार करण्यात आला आहे. बीडसाठी अधिकचे साठ कोटी रुपये मंजूर झाल्याने आता विकास कामाला गती येणार आहे. चालू आर्थिक वर्ष वागामी वर्षातील नियोजन आराखड्यामध्ये 21 कोटी रुपयांची घट झाली असल्याने जिल्हा नियोजन समितीने अतिरिक्त रुपये दोनशे कोटी रुपयांची मागणी केली होती त्यापैकीच 60 कोटी रुपये आता मंजूर झाले आहेत

Vaibhav Naik: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ

Vaibhav Naik: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे... वैभव नाईक बांधकाम व्यवसायाशी निगडीत असल्याने लाचुचपत विभागाने  त्यांच्याकडून फ्लॅट खरेदी केलेल्या कणकवली बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे  वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

Aaditya Thackeray:   मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray:   मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय. बंडाच्या एक महिना आधीच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना बंडखोरीच्या विचारात आहात का? तुमच्या मनात काय आहे? असा सवाल केला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय.  लोकमत डिजिटल क्रेएटर्स अवॉर्ड वितरण समारंभात त्यांनी हे वक्तव्य केलंय..  

सांगली एलसीबीकडून गांजा तस्करी आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 120 किलो गांज्यासह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त
Sangli Crime : सांगली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यात गांजा तस्करी आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. यात चार जणांना अटक करत त्यांच्याकडून 120 किलो गांजासह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील कवठेपिरान इथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. काही संशयित मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने एका शेताजवळ सापळा रचून गांजा विक्री आणि तस्करी करण्यासाठी आलेले संशयित आदिल शहापुरे, सचिन चव्हाण ,मयूर कोळी आणि मतीन पठाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या दोघांकडे असणाऱ्या दोन चारचाकी वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये दोन पांढऱ्या बॅगा आढळून आल्या. या बॅगामध्ये 20 लाख किंमतीचा 120 किलो गांजा आढळून आला. गांजासह दोन चारचाकी वाहने असा तब्बल 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुंन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे.
उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आरोपींचा वाद सोडवायला गेलेल्या पोलिसाला मारहाण, दोघांना बेड्या
Ulhasnagar Crime : उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाला दोन गुंडांनी मारहाण केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मारहाणीचा हा प्रकार मोबाईल कॅमेरातही चित्रित करण्यात आला आहे आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर हे सुरक्षेसाठी मध्यवर्ती रुग्णालयात ड्युटीवर होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास आरोपी आकाश गायकवाड आणि गणेश कांबळे यांचे मध्यवर्ती रुग्णालयात वाद सुरु होते. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण कोकितकर यांनी या वादात हस्तक्षेप केला असता यांच्यावर दोनही आरोपींनी हात उगारला आणि त्यांचा शर्ट पकडला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
पत्नीचा खून करत पतीची आत्महत्या, नाशिकमधील चुंचाळे परिसरातील धक्कदायक घटना

Nashik Crime : पतीने पत्नीचा खून करत स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिक शहरातील चुंचाळे परिसरात घडली आहे. भुजंग तायडे आणि त्यांच्या पत्नी मनीषा तायडे यांच्यात सोमवारी (20 फेब्रुवारी) सायंकाळी वाद झाले आणि या वादातूनच भुजंग यांनी घरातच पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत तिची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर स्वतः किचनमध्ये जाऊन फॅनच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. तायडे दाम्पत्याला दोन मुले असून एक मुलगा सातवीत तर दुसरा मुलगा नववीत शिक्षण घेत आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पती भुजंग तायडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सध्या सुरु आहे, हत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Beed News:  बीडमध्ये अपघातात मृत्यू पावलेल्या वानरावर तरुणांनी केले अंत्यसंस्कार

Beed News:  बीडच्या गेवराई शहरांमध्ये असलेल्या बायपास रस्त्यावर अपघातात एका वानराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील काही तरुणांनी एकत्र येऊन या वानरावर अंत्यसंस्कार केले आहेत.  बायपास रस्त्यावर हे वानर रस्ता ओलांडत असताना अचानक एका वाहनाची धडक त्याला लागली आणि यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला त्यानंतर शहरातील तरुणांनी रस्त्याच्या कडेला या वाणरावर अंत्यसंस्कार केले

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करा, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश

Chandrapur News : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने हे आदेश दिले आहेत. जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे अपील दाखल केलं होतं. या प्रकरणात  जिल्हाधिकारी विनय गौडा यांना 16 फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र आयोगापुढे जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाहीत, त्यांच्या जागी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी हजर झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना अटक करुन 2 मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहे. पूर्वीच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाने कुसुंबी येथील आदिवासींच्या जमिनींवर ३६ वर्षांपासून अवैध कब्जा केल्याचा आरोप या पीडित आदिवासींचा आरोप आहे आणि या प्रकरणात गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरु आहे. मात्र आयोगाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Ulhasnagar News: उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पोलिसाला मारहाण

Ulhasnagar News: उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला दोन गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयात सुरु असलेल्या वादात मध्यस्थी केल्याने पोलिसाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नवाब मलिकांच्या जामिनावर आज हायकोर्टात सुनावणी

Nawab Malik:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मलिक एक वर्षापासून तुरुंगात असून वैद्यकीय आधारावर जामीन मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

Kolhapur News: भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर

Kolhapur News: भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर शक्तिप्रदर्शन करत सोमय्यांचं स्वागत केलं. 

Maharashtra Political Crisis:  राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशीही घमासान सुरू राहणार

Maharashtra Political Crisis:  राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशीही घमासान सुरू राहणार. दोन दिवस ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर आज शिंदे गटाकडून युक्तिवाद. न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष.

विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ; अकोला, नागपूरमध्ये कमाल तापमान 3 ते 4 अंश जास्त

Vidarbha Temperature : फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा जेमतेम सुरु झाला असला तरी विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. अकोल्यामध्ये तर पारा फेब्रुवारीमध्येच 40 अंश सेल्सिअसपर्यंत जातो की काय अशी परिस्थिती आहे. अकोल्यात 38.5 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली असून गेल्या दहा वर्षातील अकोल्यात फेब्रुवारी महिन्यातील कमाल तापमानाचा हा उच्चांक आहे. नागपुरातही पारा 38 अंशापर्यंत पोहोचला आहे. अकोला आणि नागपूरसह सर्वच जिल्ह्यात सध्या कमाल तापमान सामान्यापेक्षा तीन ते चार अंश जास्त आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळ्यात होते त्याच पद्धतीने अंगाची लाही लाही होणे सुरु झाले आहे. दरम्यान दिवसा कमाल तापमान 38 आणि 39 अंश सेल्सिअसपर्यंत जात असले, तरी रात्रीच्या वेळेला किमान तापमान अजूनही 15 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशी वेगळी अवस्था विदर्भात सर्वत्र पाहायला मिळत आहे. येणारा उन्हाळा विदर्भवासियांसाठी नेहमीपेक्षा जास्त कठीण असेल याची चाहूल आताच लागायला लागली आहे. हवामान विभागाच्या मते येणाऱ्या चार पाच दिवसात पूर्व विदर्भात नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत पारा आणखी वाढून 39 ते 40 अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे.

अकोल्यात तापमान आणि वातावरणातील चढ-उताराचा फटका गहू आणि कांद्याच्या पिकांना!

Akola News : गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात मोठे चढ-उतार पहायला मिळत आहेत. तापमान आणि वातावरणातील चढ-उताराचा फटका गहू आणि कांद्याच्या पिकाला बसला आहे. तापमानातील या दोलायमानतेचा मोठा फटका यावर्षीच्या गहू उत्पादनावर होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. दिवसा खूप ऊन आणि रात्री खूप थंडी अशा क्लायमेट फ्लक्चूएशन'चा सध्या अनुभव येत आहे. दिवसा 35 अंशापर्यंत वाढलेला पारा रात्री 10 ते 15 अंशांपर्यंत खाली उतरत आहे. यामुळे गव्हाचं पीक कालावधीपूर्वीच पक्व होण्याची परिस्थिती आहे. अशीच परिस्थिती कांदा पिकाचीही आहे.

हणबरवाडी इथल्या महालक्ष्मी यात्रेनिमित्त बैलगाडी, घोडागाडी शर्यतीचे आयोजन; महाराष्ट्र, कर्नाटकातील बैल जोड्या, घोडे सहभागी
Belgaon News : निपाणी तालुक्यातील हणबरवाडी येथील महालक्ष्मी यात्रेनिमित्त बैलगाडी, घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बैल जोड्या आणि घोडे सहभागी झाले होते. शौकिनांनी शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शर्यतीत पाचगावच्या सागर पाटील यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. प्रमोद सोडगे कबनूर आणि म्हैसाळ पाटील म्हैशाळ यांच्या बैलजोडीनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. बैल शर्यत अक्षय खोत हणबरवाडी, युवराज खोत हणबरवाडी, आण्‍णासो खोत हणबरवाडी यांनी पटकावला. घोडा गाडी शर्यत अनिकेत गुरव कागल, शरद संकपाळ नेरली यांनी क्रमांक पटकावले. बिनदाती बैल घोडा शर्यत अक्षय खोत हणबरवाडी, महावीर शिरटी सैनिक टाकळी, धनाजी दानोळी कुंभोज यांनी क्रमांक पटकावले. विजेत्यांना रोख रक्कम आणि पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदल केलेला नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. त्याचसंदर्भात विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जाणार आहे. तसेच राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस आहे. यासह आज दिवसभरात इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत त्या पाहूयात,


MPSC विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार
MPSC च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज  संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेटणार आहे. MPSC च्या परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा यासाठी पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग लेखी स्वरुपात निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतलाय. मंगळवारी रात्री शरद पवारांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक घेण्यास पुढाकार घेऊ असे म्हटले होते. त्यानुसार शरद पवार यांच्यासह पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.  


सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज तिसरा दिवस 
मागच्या दोन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. आज या सुनावणीचा तिसरा दिवस आहे. काल झालेल्या दुसऱ्या दिवशीदेखील ठाकरे गटांकडून अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. सिब्बल यांनी राजकीय पक्ष-विधीमंडळ पक्ष, मुख्य प्रतोद, पक्षातील बंडखोरी, तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तिवाद केला.


किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर
भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या विरोधात मोर्चा उघडलेल्या किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील घरी ईडीने धाड टाकली होती. आजचा सोमय्यांचा दौरा त्या संदर्भातच आहे का याचं उत्तर काही तासांमध्ये मिळणार आहे.


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.