Maharashtra News Updates 22 February 2023 : पाचगणीत  वऱ्हाडाचा ट्रक पलटी, 35 ते 40 वऱ्हाडी जखमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Feb 2023 11:54 PM
पिंपरी- चिंचवड शहरातील ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांना अज्ञातांकडून मारहाण

पिंपरी- चिंचवड शहरातील ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांना अज्ञातांकडून मारहाण झालीये, मात्र ते कार्यकर्ते भाजपचे होते असा आरोप भोसले यांनी केला आहे. प्रचार सुरू असताना हा प्रकार घडल्याचे ते म्हणतात. खासगी रुग्णालयात उपचारासाठी ते दाखल झालेत.

ठाण्यात संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

ठाण्यात संजय राऊत यांच्यावर कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. 


खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बद्दल बदनामी कारक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. प्राथमिक माहिती..

19 of 67,265 खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेला धुळ्यात दिमाखात सुरुवात
क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा धुळे २०२२-२३ उद्घाटन धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी अभिनेते देवदत्त नागे धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

राज्यातील सुमारे दहा जिल्ह्यांमधून तीनशे स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे,तीन दिवस चालणाऱ्या कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना ३५ लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत... 

 
संजय राऊत यांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..
खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्या नंतर संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्या विरोधात तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली.ठाणे नाशिक पाठोपाठ पुन्हा ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाच्या शिवसेना ठाणे शहर महिला संघटक  माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे .संजय राऊत बेताल वक्तव्य करीत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते काही ही बडबडत असतात,खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मालिन करण्याचे आक्षेपार्ह विधान करीत आहेत. संजय राऊत करीत असल्याचे सांगत भादवी कलम..211,153(अ),501,504,505(2) प्रमाणे तक्रार दिली आहे.पोलीस गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे 
MPSC च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेटणार

MPSC च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ उद्या संध्याकाळी पाच वाजता शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेटणार.  MPSC च्या परिक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा यासाठी पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुय.  राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी जोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोग निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतलाय. मंगळवारी  रात्री शरद पवारांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बैठक घेण्यास पुढाकार घेऊ असे म्हटले होते.  त्यानुसार शरद पवार यांच्यासह पाच जणांचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.

दुकानाचे कुलूप तोडून सात लाखाची रोकड चोरून चोरटा पसार...

मस्कासाथ बाजारात असलेल्या अगरबत्तीच्या व्यापाऱ्याच्या दुकानात कुलूप तोडून सात लाखाची रोकड घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला आहे. नितीन अग्रवाल असं व्यापाऱ्याचं नाव असून मामा अगरबत्ती नावने त्यांची फर्म आहे. आज सकाळी त्यांना फोनवरून दुकानाचे कुलूप तुटल्याची माहिती मिळाली. लागलीच नितीन अगरवाल यांनी घटनेची माहिती पाचपवली पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक व्यक्ती तोंडाला फडका बांधून हातात चाकू घेऊन दिसून आला. पोलिसानी सीसीटीव्हीच्या साह्यानं आरोपीची शोध सुरू केला आहे. दोन दिवसापूर्वी अशाच पध्दतीने दुचाकीवर आलेल्या कोळसा व्यापाऱ्याची 9 लाखाची रोकड घेऊन लुटारू पसार झाल्याची घटना ताजी असताना या दुसऱ्या घटनेन व्यपारी वर्गात भितीचे वातवरण निर्माण झाले आहे.

संजय राऊत यांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्या नंतर संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्या विरोधात तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली.ठाणे नाशिक पाठोपाठ पुन्हा ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाच्या शिवसेना ठाणे शहर महिला संघटक  माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे .संजय राऊत बेताल वक्तव्य करीत असून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते काही ही बडबडत असतात,खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मालिन करण्याचे आक्षेपार्ह विधान करीत आहेत. संजय राऊत करीत असल्याचे सांगत भादवी कलम..211,153(अ),501,504,505(2) प्रमाणे तक्रार दिली आहे.पोलीस गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे. 

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिकेवर पुढची सुनावणी 17 मार्चला

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिकेवर पुढची सुनावणी 17 मार्चला -

17 मार्चपर्यंत उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह कायम तोपर्यंत व्हीप बजावता येणार नाही

निवडणूक चिन्हाच्या अंतिम निर्णयाला स्थगिती न देता सुप्रीम कोर्टाने केवळ नोटीस बजावली आहे दोन्ही बाजूंना

जालना--अंबड येथे वाळू माफिया कडून तहसीलदाराला मारहाण..
जालन्यातील अंबड येथील तहसीलदाराला भर दिवसा तहसील कार्यालयात घुसून आरोपीने मारहाण केल्याची घटना समोर आलीय,त्यामुळे वाळू माफियांचा मुजोर पणा पोलिसांना आव्हान बनलाय, आज दुपारी आरोपी पंकज सोळुंके याने तहसीलदारांनी वाळू साठा जप्त केल्याचा राग मनात धरून तहलसीलदार विद्याचारण कडावकर यांच्या दालनात घुसून त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली, तसेच आरोपीने तहलसीलदाराना जीवे मारण्याची धमकी दिली, यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आरोपी ला हुसकावून लावल्याने पुढील अनुचित प्रकार टळला, दरम्यान आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत...

 
गोंदिया जिल्ह्यातील 9 कृषी केद्रांचे परवाने निलंबित

गोंदिया जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरू असून धान पिकासाठी, चिखलनी व वाढीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रासायनिक खताची मागणी असते. कृषी केंद्र धारकांना पॉस मशीनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे. मात्र जिल्ह्यातील कृषी केंद्र संचालक ऑफलाईन पद्धतीने अनुदानित खताची विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अशा 9 कृषी केंद्राचे परवाने निलंबित केल्याचे करण्यात आले आहेत.

शास्ती कर माफ करण्याचा निर्णय आम्ही विधानभवनात घेतलाय - एकनाथ शिंदे

शास्ती कर माफ करण्याचा निर्णय आम्ही विधानभवनात घेतलाय. याचा जीआर मी लवकरच काढणार आहे. अनधिकृत बांधकामासाठी तुम्ही मुंबई अन नागपूर पर्यंत मोर्चे काढले. पण आता तसे मोर्चे काढण्याची वेळ येणार नाही. ठाण्याच्या धर्तीवर इथली अनधिकृत बांधकाम नियमित केली जातील. साडे बारा टक्क्यांचा विषय, निगडी पर्यंत मेट्रोचा विस्तार, पाण्याची समस्या ही संपवणार.

खुर्चीचा मोह अन नको ते घडलं - एकनाथ शिंदे

2019 मध्ये भाजप शिवसेना युती होती. आपण सत्तेत आलोच होतो, पण अघटित घडलं, पण खुर्चीचा मोह अन नको ते घडलं. पण त्या सत्तेत नैराश्य पसरलं होतं. जनतेच्या मनात चूक झाल्याची भावना होती. म्हणून मोठा कार्यक्रम करावा लागला, तो तुमच्या समोर आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

नेरळमध्ये मोबाईलचं दुकान फोडत चोरी

कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये एक मोबाईलचं दुकान फोडून चोरट्याने १५ लाखांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.


नेरळच्या मुख्य बाजारपेठेत मोबाईल वर्ल्ड नावाचं दुकान आहे. या दुकानात २० फेब्रुवारीच्या मध्यरात्री शटर तोडून एक चोरटा घुसला. या चोरट्याने आधी नवीन मोबाईलचे बॉक्स तपासले. त्यानंतर काउंटरवर रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल एका पिशवीत भरून चोरून नेले. तसंच गल्ल्यात असलेली ८० हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्याने चोरून नेली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. सकाळी दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या चोरट्याचा शोध घेतला जातोय. या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

देशात पुन्हा मोदींचे सरकार यावे हेच विठुरायाला साकडे, माझ्या येण्याचा भाजपाला फायदा झाला तर आनंदच - गोवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

मी माझ्या खाजगी दौऱ्यानिमित्त सोलापूर जिल्ह्यात आलो असून देशात २०२४ मध्ये पुन्हा मोदींचे सरकार यावे हेच विठुरायाला साकडे घातल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले . आज डॉ सावंत यांनी विठ्ठल मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेतले. यावेळी भाजप आमदार समाधान अवताडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते . सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात राष्ट्रवादी चे माजी आमदार राजन पाटील , अपक्ष आमदार संजयामामा शिंदे यांच्यासह अनेकांच्या भेटीगाठी झाल्या. या माझ्या खाजगी भेटी असल्या तरी याचा फायदा महाराष्ट्र भाजपाला झाला तर मला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया डॉ सावंत यांनी दिली . गोव्यातून हजारो विठ्ठल भक्त पायी वारी करीत देवाच्या दर्शनाला इथे येत असतात. यामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय असून महाराष्ट्र सरकारने पंढरपूर मध्ये जागा दिल्यास इथे आम्ही महाराष्ट्र भवन उभारू असेही डॉ सावंत यांनी सांगितले.

लढाईत आमचा विजय झाला - भरत गोगावले

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती न देण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. सत्यमेव जयते असं झालं आहे. हे घरातलं भांडण होतं. त्या लढाईत आमचा विजय झाला. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत त्यात आमचा विजय झाला आहे. आम्ही व्हीप नाही बजावणार, पुढे वेळ आल्यावर पाहू, असे भरत गोगावले म्हणाले. 


 


संजय राऊत पवारांचे निकटवर्तीय. आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊद्या. आम्ही पळ काढत नाही संजय राऊत पळ काढतायेत. पोलीस चौकशी होऊद्या. खोटा आरोप असेल तर संजय राऊत यांनी समजून जायचं, असे भरत गोगावले म्हणाले.  


 .

हुतात्मा इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वेला जेऊर स्टेशनवर थांबा मिळावा, गावकऱ्यांचा जेऊर रेल्वे स्टेशनवर मोर्चा

Solapur News :  करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वेला थांबा मिळावा या मागणीसाठी जेऊर गाव बंद ठेऊन ग्रामस्थांनी जेऊर रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढला आहे.  जर 21 दिवसात हुतात्मा एक्स्प्रेस ला थांबा मिळाला नाहीतर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मोर्चावेळी देण्यात आले.

मुख्यमंत्री आज औरंगाबादेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहे. आपल्याच पक्षाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या ग्रँड सरोवर या हॉटेलच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येत आहेत. रात्री साडेनऊ वाजता ते विमानतळावर येतील त्यानंतर हॉटेलचे उद्घाटन करून साडेदहा वाजता ते परत मुंबईला परतणार आहेत.

Satara News: पाचगणीत  वऱ्हाडाचा ट्रक पलटी, 35 ते 40 वऱ्हाडी जखमी

Satara News: पसरणीचा घाट उतरल्यानंतर पाचगणीत  वऱ्हाडाचा ट्रक पलटी झाला आहे. 35 ते 40 वऱ्हाडी जखमी झाले असून पाच जण गंभीर झाले आहेत. पाचगणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. वऱ्हाड मांढरदेवीहून पाचगणी जवळील गोटेघर या ठिकाणी येत होते. अपघातानंतर संपूर्ण वाहतूक विस्कळीत

मैदान अपुरे पडेल एवढी गर्दी खेडमध्ये पाच मार्च रोजी होणाऱ्या सभेला करा : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : खेडमध्ये पाच मार्च रोजी मैदान अपुरे पडायला हवे, एवढी गर्दी सभेला करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते मुंबईत बोलत होते. खेड हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, तो आपल्याकडेच राहिला पाहिजे. सभेच्या दुसऱ्या दिवशी शिमगा आहे, त्यांचा शिमगा रोजचाच आहे. त्यांना बोंबलायला लावू. दसरा मेळाव्याला कांदा भाकरी घेऊन शिवसैनिक आले होते, ही आपली ताकद आहे, राहिलेला कांदा त्यांच्या नाकाला लावूया, असा टोलाही त्यांनी लगावला.

Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 

Nawab Malik : माजी मंत्री नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ 
 
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिकांच्या  न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची नियमित वाढ


8 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी 


कुर्ला येथील गोवावाल कंपाऊंडमधील गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं दाखल केला गुन्हा


नवाब मलिक यांच्यावर सध्या न्यायालयाच्या परवानगीनं कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

इंदापूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांना वाहनाने चिरडले

Indapur News : इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे मॉर्निंग वॉकला केलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनांनी चिरडल्याची घटना घडली आहे. अनिता शिवाजी शिंदे, अर्चना सनमत अशी मृत महिलांची नावे आहेत. सध्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाचा वेग आला असून या कामामुळेच वाहनांची वर्दळ असते. तेव्हाच हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज असून यामध्ये दोन महिलांचा बळी गेला आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच अंथुर्णे येथे एका 36 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. ही तीन दिवसातील दुसरी घटना असून ज्यात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जंक्शन गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून या भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra News: राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा वाटप

Maharashtra News: आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. तर अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी 5 हजार 177 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता मिळालीये. त्यामुळे 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ मिळणार आहे. 

Nandurbar News : धडगाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोला स्थानिकांचा विरोध; दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात

Nandurbar News : सातपुड्याच्या दुर्गम भागातील नगरपंचायत असलेल्या धडगाव नगरपंचायतीच्या कचरा डेपोची जागा देण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे त्यामुळे मोठ्या शहराप्रमाणे लहान गावांमध्येही कचरा डेपोचा प्रश्न समोर येत आहेत. धडगाव नगरपंचायतीचा कचरा डेपो रोषमाळ येथील सर्वे नंबर 23 मधील खाजगी जमीन नगरपंचायत खरेदी करून त्या ठिकाणी कचरा डेपो सुरू करणार होती त्यासाठी हरकती मागविण्यात येत होत्या या डेपोच्या जवळच असलेल्या शिवणीपाडा ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यांनी आपल्या हरकती नोंदवत असताना धडगाव नगरपंचायतीच्या कार्यालयात आपलं म्हणणं मांडत विरोध केला आहे. यामुळे धडगावसारख्या छोट्या नगरपंचायतीमधील कचरा प्रश्न समोर येत आहेत.


 

बीडच्या माजलगावमध्ये ट्रक आणि दुचाकीचा अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

Beed Accident : बीडच्या माजलगाव शहराजवळ असलेल्या बाजार समितीसमोर ट्रक आणि दुचाकीचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेख सलीम असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो लग्न समारंभासाठी माजलगाव शहरामध्ये आला होता. लग्न समारंभ आटोपून परत आपल्या गावी जात असताना स्पीड ब्रेकर आल्याने सलीमचा दुचाकीवरचा ताबा सुटला. यामध्ये ट्रकचा आणि दुचाकीचा अपघात झाला आणि या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

अमेरिकेतील सिएटल नगर परिषदेत ऐतिहासिक निर्णय; नगरपरिषदेत अखेर जातीभेद प्रतिबंध कायदा मंजूर

जातीय भेदभाव केवळ भारतातच होतात असं नाही याची पाळेमुळे परदेशात देखील रुजलेली आहेत. हीच बाब लक्षात घेत अमेरिकेतील सियाटल शहरातील नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रासाठी जातीभेद प्रतिबंधक कायदा अखेर मंजूर केला आहे. यासाठी मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन होताना पाहायला मिळत होतं. या आंदोलनात नगर परिषदेच्या सदस्य असणाऱ्या क्षमा सावंत यांनी पुढाकार घेतला होता. सध्या अमेरिकेत भारतातून जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांना जातीभेदाच्या गंभीर समस्येला अनेकवेळा तोंड देण्याची वेळ येते. या विरोधातच क्षमा सावंत यांनी आवाज उठवला होता आणि आपल्या प्रांतापुरतं का होईना त्यांनी जातीभेद प्रतिबंध कायदा लागू करण्याची मागणी केली होती. अखेर मंगळवारी नगर परिषदेत झालेल्या मतदानावेळी 6 विरुद्ध 1 मताने जातिभेद प्रतिबंध कायदा मंजुर करण्यात आला आहे. 

Supreme Court: सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरूवात, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू

Supreme Court: सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरूवात झाली आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू झाली असून विधीज्ञ कपिल सिब्बल आपली बाजू मांडत आहेत

Mumbai News: शिवाजी पार्क मैदानाची पुन्हा होणार धुळीचे साम्राज्य ? महाविकास आघाडीच्या काळात मंजूर केलेले तीन वर्षाचे कंत्राट महापालिकेने रद्द केले

Mumbai News: शिवाजी पार्क मैदानाची पुन्हा होणार धुळीचे साम्राज्य ? महाविकास आघाडीच्या काळात मंजूर केलेले तीन वर्षाचे कंत्राट महापालिकेने रद्द केले.


महापालिका जी/उत्तर विभागाच्या माध्यमातून शिवाजी पार्क मैदानाच्या भागात गवताळ परिसर निर्माण करण्यासाठी विहिरी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून रिचार्ज करणे आणि हे मैदान धुळमुक्त करणे याचसोबत या मैदानातील रेनवॉटरसह पर्जन्य जलवाहिनी टाकण्याच काम या कंत्राटद्वारे करण्यात आलं. 


महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये दादर शिवाजी पार्क मैदानातील धुळीची समस्या आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवण्याकरता महापालिकेच्या जी-उत्तर कार्यालयाकडून तीन वर्षांचा कंत्राट काढण्यात आलेलं होतं.


या कंत्राटात शिवाजी पार्क मैदानात हिरवळ लॉन तयार करण्याचं काम त्याचसोबत या मैदानाची निगा राखण्याकरता दरवर्षी 1 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार होता. 


या कंत्राटाला मनसे आणि भाजपने विरोध दर्शविला होता. या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता या सगळ्या संदर्भात तत्कालीन जी उत्तर विभागाचे वार्ड अधिकारी किरण दिघावकर यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं.


शिवाजी पार्क मैदानावर हिरवळ राखण्यासाठी वर्षाला एक कोटी रुपये खर्च करण्याची आवश्यकता नसून बाहेरील कंत्राटी कामगारांची मदत घेऊन मैदानावर पाणी मारत हिरवळ राखण्याचा प्रयत्न केला जाईल, अस महापालिकेने स्पष्ट केल आहे.


पण आता सत्ता बदलानंतर हे कंत्राट रद्द झाल्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेल आहे. 

Mumbai Crime News: मुंबई विमानतळावरून साडेआठ कोटीचे परदेशी चलन जप्त

Mumbai Crime News: मुंबई विमानतळावरून साडेआठ कोटीचे परदेशी चलन जप्त


आरोपी पूनम सोमबाया 53, कडून आठ कोटी 36 लाख रुपयांचे परदेशी चलन जप्त करण्यात आली आहे. 


आरोपीने बुटांच्या 48 मोज्यांमध्ये परदेशी चलन लपवले होते आणि ते बॅगेत लपवले होते.


सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परदेशी चलनासह अमेरिकेच्या पारपत्रावर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला अटक केली.


त्यात 10 लाख अमेरिकन डॉलर, 37 सिंगापूर डॉलर सापडले आहेत.


सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हि अनिवासी भारतीय असून मुंबईहून दुबई मार्गे शिकागोला जाणार होता पण त्यापूर्वीत त्याला अटक करण्यात आली.

Nashik Sanjay Raut : संजय राऊत यांची तासभर जबाब नोंदणी, माहिती न देता अधिकारी परतले... 

Nashik Sanjay Raut : संजय राऊत नाशिकमध्ये असताना ठाणे पोलिसांचे पथक जबाब घेण्यासाठी आले होते. अखेर तासाभरानंतर अधिकाऱ्यांचे पथक बाहेर पडले असून जबाब घेऊन माघारी परतले आहेत. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. साधारणपणे एक तास जबाब नोंदणीचे काम  सुरू होते. संजय राऊत यांना माहिती कशी मिळाली? कोणापासून आणि का धोका आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घेतल्याचे समजते. आता थोड्याच वेळात संजय राऊत हे माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. 


 


 

Beed News: मध्य प्रदेशातून आणलेल्या कामगारांची मुकादमाच्या तावडीतून केली सुटका

Beed News: गेवराई तालुक्यातील टाकरवन येथे मध्यप्रदेशातून ऊस तोडणीसाठी आणलेल्या 28 कामगारांची कामगार अधिकारी आणि मानवी हक्क अभियानाच्या कार्यकर्त्यांनी मुकादमाच्या धावडीतून सुटका केली आहे. टाकरवन येथील मुकादम गोपीनाथ पवार यांनी मध्यप्रदेशातून 28 कामगार उचलण्यासाठी आणले होते मात्र करार संपूनही या कामगारांकडून कमी पैशाच्या मोबदल्यात जास्त काम करून घेतले जात होतं या संदर्भातील तक्रार कामगार अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत या सर्व कामगारांची सुटका करून त्यांना मध्यप्रदेशात पाठवण्याची व्यवस्था केली आहे.

ShivSena Symbol Cisis : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर आज दुपारी सुनावणी

ShivSena Symbol Cisis : एकीकडे सत्तासंघर्षाची ही सुनावणी सुरू असताना तिकडे ठाकरे गटासाटी वेगळी कसोटी असणार आहे. कारण सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने काल सर्वोच्च न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात 941 पानांची याचिका दाखल केलीय. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हा एकनाथ शिंदे गटाला दिलं. याला ठाकरे गटानं आव्हान दिलंय. यावर सर्वोच्च न्यायालयाचं तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ आज दुपारी साडेतीन वाजता सुनावणी करणार आहे. 

Swabhimani Shetkari Saghtana Agitation : स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन

Swabhimani Shetkari Saghtana Agitation : शेतकरी (Farmers) प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Saghtana) आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन स्वाभिमानीच्या वतीनं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन (Agitation) करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टींनी केलाय.  


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्ष युक्तिवादाचा दुसरा दिवस

Maharashtra Political Crisis : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस, अध्यक्षांचे अधिकार, अपात्रतेची कारवाई यावरून दुसऱ्या दिवशीही जोरदार घमासान होण्याची शक्यता. 

Maharashtra News: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांचा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा

Maharashtra News: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांनी काल कन्नडमध्ये शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चावर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी टीका केली आहे. तुम्हीच सत्तेत आहेत, चावी फिरवली तर पैसे मिळतील.  सत्तेतले लोक मोर्चे कसे काढतात असावा त्यांनी केलाय. मोर्चे काढण्यापेक्षा सरकारला सांगितलं तर शेतकऱ्यांचे भलं होईल. लोक विकत आणून मोर्चे काढून काही होणार नाही अशी टीका त्यांनी केले.

Kolhapur Breaking : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या तीन संचालकांचे फोन नंबर ईडीने मागवल्याची माहिती

Kolhapur Breaking : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या तीन संचालकांचे फोन नंबर ईडीने मागवल्याची माहिती


नोटीस आलेल्यांसह माजी संचालकांनी मुश्रीफ यांची घेतली भेट


उद्या किरीट सोमय्या येणार आहेत कोल्हापूरच्या दौऱ्यावर


सोमय्या देखील बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार असण्याची माहिती

Maharashtra Politics: आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीवर दिले खोचक उत्तर

Maharashtra Politics: निवडणूक आयोग बरखास्त करा अशी मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी चांगलेच प्रत्त्युत्तर दिले आहे. ऍडव्होकेट जनरल अनिल परब यांनी दिलेले सल्ले चुकीचे निघाले आणि म्हणूनच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह तुम्हाला गमवावे लागले असे आमदार योगेश कदम म्हणाले आहेत. तसेच जनतेला सत्य कळलंय, धनुष्यबाण गहाण ठेवून मुख्यमंत्री पदासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची पायमल्ली करून तुम्ही गेलात, जेव्हा कोल्ह्याला द्राक्षे काढता येत नाहीत, तेव्हा ती त्याच्यासाठी आंबट होत असतात, धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव आपल्याला मिळणार नाही, हे समजल्यानंतर आता त्यांच्याकडून हेच सांगितले जाणार, हे अपेक्षित होते.


खासदार संजय राऊत हे 50 खोक्यांचा अजून हिशोब देऊ शकले नाहीत ते 2 हजार कोटींच्या सौद्याबद्दल बोलतायत, हिंमत असेल तर सिद्ध करून दाखवा, धनुष्यबाण आम्हाला मिळाल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेच्या मनात बाळासाहेबांचे विचार अजून घट्ट निर्माण करून महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही अधिक जोमाने प्रयत्न करणार आहोत आणि शिवसेना पक्ष अधिक बळकट करणार आहोत, असेही आमदार योगेश कदम यांनी यावेळी सांगितले. 

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेल्या मेळघाटचा आज स्थापना दिवस.

Melghat News : मेळघाट व्याघ्र प्रकल्प आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर लांबच लांब पसरलेली सातपुड्याची पर्वतरांग आणि त्यातील सर्वात संपन्न असं वाघांचं जंगल म्हणजे मेळघाट.. झपाट्याने कमी होत असलेल्या वाघांच्या संरक्षणासाठी भारतात सुरू झालेल्या व्याघ्र प्रकल्प योजनेतील पहिल्या 9 प्रकल्पात मेळघाटचा समावेश होता. महाराष्ट्रातील पहिला आणि आकारमानाने सर्वात मोठा असलेल्या मेळघाटात व्याघ्र प्रकल्प योजनेचा शुभारंभ झाला तो 22 फेब्रुवारी 1974. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आज 49 वर्षे पूर्ण करुन 50 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

वापीमध्ये गॅरेजमध्ये भीषण आग, 8 ते 10 दुचाकी आणि एका कार जळून खाक

Palghar News : गुजरातमधील वापीमध्ये चार रस्त्याजवळील गॅरेजमध्ये रात्री भीषण आग लागली. गॅरेजमध्ये असलेल्या दुचाकींना अचानक आग लागली. यानंतर गॅरेजशेजारील पार्किंगमध्ये एका आलिशान व्होल्वो कारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या आगीत 8 ते 10 दुचाकी आणि एका कार जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी तासाभरात ही आग आटोक्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Navi Mumbai: ठेकेदारांना नगरसेवक करतात ब्लॅकमेल; आमदार मंदा म्हात्रे यांचा गंभीर आरोप

Navi Mumbai: नवी मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून शहारातील विविध भागात नागरी कामे केली जात आहेत. यामध्ये रस्त्यांचे सिमेंट क्रॅाक्रीटीकरण करणे, पाम बीच मार्गावर सायकल ट्रॅक उभारणे, गटर बांधणे आदी कामांचा समावेश आहे. कोट्यवधी रूपयांची काढण्यात आलेल्या या कामांमध्ये महानगर पालिकेतील नगरसेवक ठेकेदारांना ब्लॅकमेल करीत असल्याचा गंभीर आरोप आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे. ज्या ठेकेदारांना मनपाची कामे मिळाली आहेत त्यांच्याकडे लाखो रूपयांची मागणी नगरसेवक जावून करीत आहेत. पैसे न दिल्यास  काम बंद पाडून त्यांच्या कामगारांना मारहाण केली जात आहे. त्यामुळे अशा लोकांवर महानगरपालिका प्रशासन, पोलीस यंत्रणेने त्वरीत आळा घालावा नाहीतर येत्या अधिवेशनात ब्लॅकमेल करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सभागृहात घेणार असल्याचा इशारा मंदाताई म्हात्रे यांनी दिलाय. त्याच बरोबर शहरात सुरू असलेल्या अनेक रिडेव्हलपमेन्ट कामांमध्ये माझ्या नावाचा वापर करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन

Swabhimani Shetkari Sanghatna Rasta Roko : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सत्ताधारी सोडा विरोधकांचेही लक्ष नाही असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर रास्तारोको आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांचे विजेचे बिल दुरुस्त करुन द्यावे, वीज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी. वीज दरामध्ये करण्यात येणारी 37 टक्के दरवाढ रद्द करण्यात यावी, फक्त पाच जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी, रात्री वीज दिल्यामुळे जंगली जनावरे आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होतो त्यात शेतकऱ्याचा बळी जातो. शेतकऱ्याने वापरलेली वीज यातील 50 टक्केच शेतकरी वापरतात, बाकीच्या चोऱ्या आणि लॉसेस शेतकऱ्यांच्या नावाने हॉर्स पावरच्या नावाखाली खपवतात, बुलढाण्यात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर  कारवाई झालीच पाहिजे, अशा काही प्रमुख मागण्यांसह राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. बुलढाण्यात ही ग्रामीण भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट बकाल याठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्तारोको करण्यात येणार आहे.

मुंबईच्या शाहूनगर परिसरातील कमलानगर झोपडपट्टीमध्ये मोठी आग, 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

Mumbai Fire : मुंबईच्या शाहूनगर परिसरात असलेल्या कमला नगर झोपडपट्टीमध्ये मोठी आग लागली आहे. या आगीमध्ये 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहापेक्षा जास्त गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. पहाटे चार वाजता ही आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये आतापर्यंत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Maharashtra News: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय,विद्यापीठ आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय विद्यापीठ आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित. आपल्या मागण्यांसंदर्भात 10 मार्चपर्यंत शासन निर्णय जारी करण्याची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी. अन्यथा अकरा मार्चपासून स्थगित झालेले आंदोलन पुन्हा सुरू करणार आहे. आजपासून शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कामावर रुजू होतील. 

 

पूर्णपणे सातवा वेतन लागू करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे आणि रिक्त जागा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भरणे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आंदोलन सुरू होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारी पासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पदवी परीक्षा त्यासोबतच बारावी बोर्ड परीक्षेच्या कामावर सुद्धा बहिष्कार टाकला होता. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारल्यानंतर त्याचा मोठा फटका शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना बसत होता. 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. याबरोबरच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायच्या निर्णया विरोधात दाखल केलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी 3.30 वाजता सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. 







 






महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा दुसरा दिवस


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुप्रिम कोर्टातल्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. काल पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. यावेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपने आमदारांवर कारवाई झाली असती तर आताच्या सरकारचे अध्यक्ष पडले असते असा युक्तीवाद केला.  यावर घटनापीठाने तुमचे म्हणणे आम्हाला पटले आहे. परंतू आता वेळ मागे कशी नेणार असा सवाल केला.  यावर तुमच्याच जूनमधील आदेशामुळे हे घडले आहे. तेव्हाच्या अध्यक्षांना अपात्रतेच्या प्रस्तावावर निर्णय घेऊ दिला नाही असे सांगितले. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कपिल सिब्बल युक्तीवाद करणार आहेत.


निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी
 
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला द्यायच्या निर्णया विरोधात दाखल केलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज दुपारी 3.30 वाजता सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. आयोगाविरोधात याचिका कोर्टाने ऐकू नये, त्यांना हायकोर्टानेही दोन वेळा नाकारले असा शिंदे गटाने दावा केला आहे.  त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार कीन नाही हे आज स्पष्ट होईल. 


चिंचवडमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सकाळी 10:30 वाजत पत्रकार परिषद होणार आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी दापोली - खेड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार 


 आज मातोश्रीवर दापोली - खेड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते  शक्तीप्रदर्शन करणार आहेत. दुपारी 12.30 वाजता मुंबई आणि गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते मातोश्रीवर गोळा होणार आहेत. माजी आमदार संजय कदम, सुर्यकांत दळवी, भास्कर जाधव, अनंत गीते सहभागी होणार आहेत.
 
राज्य मंत्रिमंडळाची बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृह होणार आहे. शिंदे गटाला शिवसेना नाव आणि चिन्हं मिळाल्यानंतर पहिली मंत्रीमंडळ बैठक आहे. 


कसबा चिंचवड प्रचाराचा धडाका 
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी 5 वाजता  रोड शो करणार. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. याबरोबरच छगन बुजबळ आणि धनंजय मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे. 


शरद पवार यांच्या कसब्यात तीन सभा 


कसब्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा प्रचार दौरा आहे. ते दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तीन सभा घेणार आहेत. 
 
स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर आंदोलन करणार


शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सत्ताधारी सोडा विरोधकांचेही लक्ष नाही असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर आंदोलन करणार आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथे महसुल परिषदेचा शुभारंभ


अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवरानगर येथे महसुल परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. 
 
एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलनाचा तिसरा दिवस
 
 एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देऊन काल विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून मार्ग काढू असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले आहे. परंतु, आंदोलनावर विद्यार्थी ठाम आहेत. 


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज जिल्हा दौऱ्यावरती आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देवदर्शन निमित्त सोलापूर जिल्ह्यातील असून भाजपच्या अनेक नेत्यांच्या त्या भेटीगाठी घेणार आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.