Maharashtra News Updates 08 February 2023 : 2004 ते 2014 पर्यंत क्षमता आणि  सामर्थ्य  दाखवण्याची संधी त्यांनाही होती' : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Feb 2023 08:06 PM
Thane : मुख्यमंत्र्यांच्या बंगालच्या बाहेर फुलाची सजावट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या वाढदिवस असल्याने ठाण्यात वाढदिवसाची जोरदार तयारी केली जातेये… कारण यंदा फक्त मंत्री नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झालेत यामुळे ठाण्यात ठिकठिकाणी बॅनर लागलेत तर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवास स्थानाच्या आत बाहेर हार आणि फुलांनी सजावट करण्यात आलीये तर समोरील नितिन कंपणी उड्डाणपुलाला देखील हार फुलांनी सजवले असुन “जिवेत शरदशतम” असं फुलांनी लिहिण्यात आलेय.

चंद्रपूर : प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर तणाव

चंद्रपूर शहरातील चिद्दरवार प्रसूतीगृहात दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. भद्रावतीच्या मोनिका आयतवार यांना दुसऱ्या खेपेच्या प्रसूतीसाठी या रुग्णालयात नियमित उपचारानंतर दाखल करण्यात आले होते. प्रसुतीची वेळ जवळ आल्यानंतर त्यांना आज सकाळी शस्त्रक्रिया टेबलवर घेण्यात आले. मात्र प्रसूती दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोनिकाच्या नातेवाईकांना ही माहिती दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. नातेवाईकांनी रुग्णालयाच्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी उपचारात हयगय केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आणि दोषींवर कारवाईची मागणी केली. दुसरीकडे डॉ. ज्योती चिद्दरवार यांनी मात्र या सर्व आरोपांचा इन्कार केला असून प्रसूती दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने गुंतागुंत निर्माण झाल्याने मृत्यू ओढविल्याचे सांगत सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक सुंता झाली आहे :   संजय केणेकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते वैचारिक सुंता झाल्यासारखे वागत आहे ,ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज यांना अतोनात त्रास दिला , त्या औरंगजेबाचे छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये सोळाशे पन्नास मध्ये वास्तव्य होते , म्हणून त्यांनी त्या काळात एक महल बांधला ,त्याला जनाना महल म्हणतात , त्या जणांना महलात मध्ये औरंगजेब  येथे वास्तव्यास होता , म्हणून त्या महलाचे सुशोभीकरण करून रंगरंगोटी करावी , अशा प्रकारचे पत्र एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने जिल्हाधिकारी यांना दिले आहे , प्रत्यक्षामध्ये औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर ची मागणी अनेक वर्षापासून चालू होते  , परंतु ती मागणी शिंदे फडणवीस सरकारने पूर्ण केली ,  या ऐतिहासिक शहराला आता छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले , त्या मुळे या शहरांमध्ये असणारा जनाना महल याचे सुशोभीकरण करावे असे वैचारिक दिवाळखोरी व सुंता झाल्यासारखे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वागत आहेत , असा घनाघाती आरोप भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांनी केला , व सरकारला देखील त्यांनी विनंती केली की , अशा कुठल्याही प्रकारच्या शासकीय निधी हा यावर खर्च करण्यात येऊ नये , तसेच भारतीय जनता पार्टीने या पत्राचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे .

PM Narendra Modi Speech : 2G आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यावरून पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर निशाणा

PM Narendra Modi Speech : 2G आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, यूपीए 2G मध्येच अडकून पडली आणि आज आपण 5G पर्यंत पोहोचलो. तर, दहशतवाद्यांना आव्हान देण्याची ताकद यूपीए सरकारमध्ये नव्हती असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 


 

PM Narendra Modi Speech : '2004 ते 2014 पर्यंत क्षमता आणि  सामर्थ्य  दाखवण्याची संधी त्यांनाही होती' : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

2004 ते 2014 हा काळ दहशतवादी कारवायांमुळे असुरक्षीत होती, या दहा वर्षाच्या काळात क्षमता आणि  सामर्थ्य  दाखवण्याची संधी त्यांनाही होती अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Speech Lok Sabha) यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर संबोधन केलं.

अदानींसोबत फोटो दाखवणाऱ्या राहुल गांधींवर मोदींचा पहिला थेट हल्ला, सभागृहातच उत्तर

Sanjay Raut:  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

Sanjay Raut:  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . 30 मार्च 2018 रोजी बेळगावात झालेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाषण केले होते.संजय राऊत यांनी भाषण करून दोन भाषिक गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा ठपका ठेवून टिळक वाडी पोलीस स्थानकात संजय राऊत यांच्यावर 153 अ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.नंतर पोलिसांनी जे एम एफ सी चौथ्या न्यायालयात दोषारोप पत्र संजय राऊत यांच्यावर दाखल केले होते.नंतर न्यायालयाने संजय राऊत यांना न्यायालयात तारखेला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते पण संजय राऊत सुनावणीला हजर राहिले नव्हते.संजय राऊत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता.त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी जामीन मंजूर केला आहे.ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार,मारुती कामाणाचे ,शंकर बाळ नाईक आणि हेमराज बेंचण्णवर यांनी संजय राऊत यांच्या वतीने काम पाहिले.

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर


राज्य सरकारकडून 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराची घोषणा


अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलनमधील कार्याची दखल

Budget session : येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार

Maharashtra Assembly Budget session : येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन असणार आहे. 9 मार्चला अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. 

अहमदनगरमध्ये घरासमोरुन चक्क 12 गाढवांची चोरी, अज्ञात गाढव चोराविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News : अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात चोरीची अजब घटना समोर आली आहे. धारणगाव येथे लक्ष्मण कापसे यांच्या घरासमोरील पटांगणातून त्यांच्या मालकीची चक्क 12 गाढवं चोरी गेली आहेत. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात गाढव चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गाढव चोरीच्या या घटनेची कोपरगाव तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

RBI : रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ, RBI चं पतधोरण जाहीर

RBI News : रिझर्व्ह बँकेने आज आपलं पतधोरण जाहीर केलं आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. आरबीआयने रेपो रेटच्या दरात वाढ केल्याने कर्जाचा हप्ता वाढणार आहे. शिवाय सर्वसामान्यांना बँकेतून कर्ज घेणं सुद्धा महागात पडणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव, 16 फेब्रुवारीला सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई  सत्र न्यायालयात धाव


नवीद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांचा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज


16 फेब्रुवारीला होणार सुनावणी


राजकीय हेतूतून अटक होण्याची शक्यता असल्याचा अटकपूर्व जामीन अर्जात उल्लेख


राजकीय हेतूने अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप


ईडीने मुश्रीफांवर केलाय 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल


सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्‍टरी लिमिटेड या दोन कंपन्यांकडून महत्त्वपूर्ण व्यवसाय न करता कोट्यवधीचा संशयास्पद प्रवाह असल्याचा ईडीचा दावा


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप

Sangli News: मिरजेत बालिकेचा पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू

Sangli News: मिरजेत झारीबाग येथे अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने चार वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. यशवी नीलेश देशमाने असे बालिकेचे नाव आहे. मिरजेत देशमाने कुटूंब हे झारीबाग परिसरातील अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर राहतात.  देशमाने यांना दोन कन्या आहेत. मोठी मुलगी आजारी असल्याने  रात्री तिला दवाखान्यात घेऊन जाताना लहान मुलगी यशवी झोपली असल्याने  देशमाने घराला कुलूप लावून बाहेर गेले. मात्र, गडबडीत गॅलरीचा दरवाजा बंद करण्यास विसरले. थोड्या वेळात जागी झालेली यशवी पालकांचा शोध घेत गॅलरीत गेली. तेथून इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यांत आले. मात्र मंगळवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. याबाबत गांधी चौक पोलिसात याची नोंद झाली आहे. पालकांच्या एका चुकीमुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत होती.

औरंगाबादमध्ये साडेआठ लाखांची लाच घेताना पकडलेला जलसंधारण विभागातील उपविभागीय अधिकारी ऋषिकेश देशमुखला तीन दिवसांची पोलीस कोठडी

Aurangabad News : औरंगाबादमध्ये साडेआठ लाखांची लाच घेताना पकडलेला जलसंधारण विभागातील उपविभागीय अधिकारी ऋषिकेश देशमुखला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ऋषिकेश देशमुखला लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोकडून कारवाई झाल्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली होती. ऋषिकेश देशमुख यांचे राजकीय नेते, प्रशासन, पोलीस अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे असल्याचे तपासात समोर येत आहे. जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने परभणी जिल्ह्यातील कंत्राटदाराचे 1 कोटी 37लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी 8 लाख 53 हजार 250 रुपये लाच घेताना देशमुखसह लिपिक भाऊसाहेब गोरेला पकडले. या दोघांच्या घरांची रात्रभर झाडाझडती घेतली. त्यामध्ये अतिरिक्त मालमत्ता आढळली नाही. वय जास्त असल्यामुळे दुसरा आरोपी लिपिक गोरेंना नोटीसवर सोडण्यात आले.

Maharashtra Civic Body Polls : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत तातडीच्या सुनावणीसाठी आज याचिकाकर्ते मेन्शनिंग करणार

Maharashtra Civic Body Polls :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत तातडीच्या सुनावणीसाठी आज याचिकाकर्ते मेन्शनिंग करणार


सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर पुढची संगणकीकृत तारीख 21 मार्च दाखवत आहे


आज सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान वकील हे प्रकरण सरन्यायाधीशांपुढे मेन्शनिंग करणार


तातडीची नवी तारीख मिळणार का याची उत्सुकता


सकाळी अकरा वाजेपर्यंत याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता

वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक, 21 फेब्रुवारीपासून सिंदखेडराजा इथून "विदर्भ निर्माण यात्रा" सुरु होणार

Buldhana News : विदर्भ राज्य वेगळे व्हावे यासाठी पुन्हा एकदा आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती "विदर्भ निर्माण यात्रा" काढणार असून येत्या 21 फेब्रुवारीपासून या यात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजामधून तर पूर्व विदर्भातून सिरोंचा येथून ही यात्रा नागपूरकडे निघणार आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भासाठी आता विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.  

कोकणातल्या समुद्राच्या पोटात दडलेल्या तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेतला जाणार

Ratnagiri News : कोकणातल्या समुद्राच्या पोटात दडलेल्या ऑईल आणि नॅचरल गॅसचा शोध आता घेतला जाणार आहे. त्यासाठी सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड या बंदरापासून चाळीस नॉटिकल मेल अंतरावर म्हणजेच खोल समुद्रात हा सर्व्हे सुरु आहे. या सर्व्हेला सिझमिक म्हणजेच भूकंपीय सर्वेक्षण असं म्हणतात. ओएनजीसी या कंपनीमार्फत हा सर्व्हे सुरु असून या काळात मच्छीमार बोटी किंवा इतर प्रकारच्या बोटींनी या भागात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तशाप्रकारचं पत्र देखील संबंधित विभागांना किंवा मत्स्य विभागांना देण्यात आलेलं आहे. 25 जानेवारी ते  फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत हा सर्व्हे सुरु राहणार आहे. त्यामुळे आता या कोकणातल्या समुद्रात तेलाचे आणि नैसर्गिक गॅसचे साठे मिळणार का? याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे.

 Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरमध्ये देशी दारुच्या दुकानातून 25 पेट्या दारुची चोरी

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात एका देशी दारूच्या दुकानातून 25 पेट्या दारूची चोरी झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. रात्रीच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात चोरांनी दुकानाचे शटर तोडून या दुकानाच्या आत प्रवेश करुन 25  देशी दारूच्या पेट्या लंपास केल्या आहेत. दुकान मालक सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता शटर तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. चोरीची शंका व्यक्त करत घटनेची माहिती पोलिसांना दिली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंदाजे 90 हजार रूपये किंमतीच्या रॉकेट कंपनीच्या 25 पेट्या चोरट्यांनी लंपास केल्याची माहीती मिळाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस चोरीचा तपास करीत आहे.

नागपूरमधील मालमत्ता कर न भरलेल्या साठ हजार रिकाम्या भूखंडांवर महापालिकेच्या जप्तीची टांगती तलवार

Nagpur News : नागपूरमध्ये वर्षानुवर्षे मालमत्ता कर न भरलेल्या साठ हजार रिकाम्या भूखंडांवर महापालिकेच्या जप्तीची टांगती तलवार लटकत आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर न भरलेल्या खुल्या भूखंडधारकरांना नागपूर महानगरपालिकेने 31 डिसेंबरपर्यंत थकित मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजावली होती. कर भरला नाही तर संबंधित भूखंड लिलावात काढण्याचे आदेश नागपूर महानगरपालिकेने आगस्ट 2022 मध्ये काढले होते. त्यापैकी सहा महिन्यात 75 हजार रिक्त भूखंडापैकी 12 हजार 220 भूखंड धारकांनी महापालिकेकडे धाव घेतली. त्यापैकी 7 हजार 201 भूखंड धारकांनी आपला थकित कर जमा केला. आतापर्यंत महापालिकेने आठशे भूखंड जप्त केले आहेत. उर्वरित जवळपास साठ हजार भूखंडधारक पुढे आले नाहीत तर त्यांच्यावर जप्तीची टांगती कारवाई केली जाईल असं महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूनंतर रिफायनरी विरोधक आक्रमक, 11 फेब्रुवारीला राजापूर तहसील कार्यालयावर महामोर्चा काढणार

Ratnagiri News : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूनंतर रिफायनरी विरोधक आक्रमक झाले आहेत. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता राजापूर तहसील कार्यालयावर महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.



अहमदनगर पोलिसांचे मॉकड्रिल वादाच्या भोवऱ्यात, मुस्लीमद्वेष पसरवला जात असल्याची तक्रार करणारी एक जनहित याचिका हायकोर्टात

Ahmednagar News : अहमदनगर पोलिसांकडून करण्यात आलेले मॉकड्रिल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मॉकड्रिल दरम्यान मुस्लीमद्वेष पसरवला जात असल्याची तक्रार करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी गृहमंत्रालयासह पोलीस महासंचालक आणि इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिल्याची माहिती तक्रारदाराने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. 

दुर्मिळ खवले मांजराची विक्री करताना दोघांना अटक, नागपूर, भंडारा वन विभागाची संयुक्त कारवाई

Bhandara News : दुर्मिळ खवले मांजरची विक्री करणाऱ्या दोघांना वन विभागाच्या नागपूर आणि भंडारा वन विभागाच्या पथकाने सापळा रचून भंडाऱ्यात ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून 20 किलो वजनाचे जिवंत खवले मांजर ताब्यात घेऊन दोघांना अटक केली. रामेश्वर मेश्राम (वय 32 वर्षे) रा. तीड्डी ता. भंडारा, सचिन उके (वय 29 वर्षे) रा. खमारी ता. मोहाडी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघे खवले मांजर विक्री करत असल्याची माहिती मिळताच वन विभागाने बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली.

Ratnagiri Fire : दापोली तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे घराला भीषण आग

Ratnagiri Fire : दापोली तालुक्यातील जालगाव पांगारवाडी येथे घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. दापोली पंचायत समितीचे माजी सभापती मनोज भांबीड यांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी झाले आहे. मध्यरात्री एक वाजता शॉर्ट सर्कीटमुळं ही आग लागली आहे. आगीमुळं घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. यामध्ये कोणतीही जीवितहाणी झाली नाही.

Washim Crime News: ATM फोडतांना दोन चोरट्यांना पोलिसांनी केले रंगे हात अटक

Washim Crime News: चौकीदाराच्या जागरूकतेमुळे आणि पोलिसांच्या कार्यतप्तरतेमुळे वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुभाष चौक परिसरात असलेल्या सराफा लाईनमधील ATM फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन  चोरट्यांना रंगेहात पकडण्यात पोलीसांना यश आले  आहे. परिसरातील  चौकीदार असलेले प्रमोद उखळकर यांना ATM मध्ये दोन चोरटे  शिरल्याचे  दिसले  आणि  जागरूक चौकीदारने रात्रीच्या  गस्तीवर असलेल्या  अंमलदार प्रदीप बोडखे आणि संदीप वाकुडकर यांना माहिती देताच तत्काळ हजर होत.  ATM मध्ये  शिरून पोलिसांनी  चोरट्यांना रंगे हात तात्काळ ताब्यात अटक केली.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (uddhav thackeray) आज दुपारी 12.30 वाजता मातोश्री येथे पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच उपनेत्यांचीही बैठक बोलावण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत काही महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करू शकतात. यात निवडणूक आयोग चिन्हा बाबत निर्णय द्याला का उशीर करतय, अंधेरी पोट निवडणुकीच्या वेळी निवडणुक आयोगाने निर्णय देताना जी तत्पर्ता दाखवली ती दाखवणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.


नवाब मलिकांच्या रुग्णालयातील प्रदीर्घ उपचाराविरोधातील ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी (Nawab Malik)


मुंबई – नवाब मलिकांना घ्यावा लागणार का रूग्णालयातून डिस्चार्ज? ईडीनं नवाब मलिकांच्या प्रदीर्घ उपचारांवर सवाल उपस्थित करत कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. कोर्टाच्या निर्देशानंतर नवाब मलिकांचा सरकारी डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आलेला अहवाल आज कोर्टापुढे सादर केला जाईल. त्यानंतर मलिकांच्या पुढील उपचारांबाबत कोर्ट निर्देश देईल. न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिकांवर गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात किडनीचे उपचार सुरू आहे. 


अर्थ संकल्पिय अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यासाठी आज बैठक


विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार, सकाळी 10 वाजता होणार आहे. 27 फेब्रुवारीला मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनला सुरुवात होणार. तत्पूर्वी नियोजनासाठी बैठकीच आयोजन करण्यात आलं. या बैठकीत अर्थ संकल्प सभागृहात कधी मांडला जाणार याची तारीख ठरणार आहे. या समितीत बाळासाहेब थोरात देखील आहेत, ते आजच्या बैठकीला उपस्थित रहाणार का? हे पाहावं लागणार आहे.


रिजर्व्ह बॅक आज आपलं पतधोरण जाहिर करणार (RBI)


मुंबई – रिजर्व्ह बॅक आज आपलं पतधोरण जाहिर करणार आहे. रिजर्व्ह बॅक रेपो रेट मध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवली जातीये.


आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेचा आज तिसरा (Aaditya Thackeray)


आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेचा आज तिसरा दिवस. यात्रा आज जालन्यात असणार आहे. आजच्या दिवसातली शेवटची सभा बीडच्या गेवराई येथे होणार आहे.


हेमंत रासने यांची पदयात्रा


भाजप, शिंदे गट आणि मित्र पक्ष कसबा युतीचे उमेदवार हेमंत रासने यांची पदयात्रा, सकाळी 9.30 वाजता


संजय राठोड आज सोलापुरात


सोलापूर – संजय राठोड आज सोलापूरात असणार आहेत. सकाळी अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर येथे जाऊन दर्शन घेतील. सकाळी 11 वाजता सोलापूरात बंजारा समाज सहविचार सभेत सहभागी होणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.