Ambadas Danve : जातीय तणाव वाढल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न; अंबादास दानवेंचे राज्यपालांना पत्र
Ambadas Danve Letter to Governor: जातीय तणाव वाढल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून यात लक्ष घालण्याची मागणी अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे राज्यपाल बैस यांच्याकडे केली आहे.
Ambadas Danve Letter to Governor: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात सतत हिंसाचाराच्या घटना घडत आहे. त्यामुळे यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान आता याच हिंसाचाराच्या घटनांवरून विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहले आहे. जातीय तणाव वाढल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून यात लक्ष घालण्याची मागणी दानवे यांनी पत्राद्वारे राज्यपाल बैस यांच्याकडे केली आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, संत परंपरा लाभलेल्या अठरा पगड जातीच्या महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून धर्मांध प्रवृत्तीच्या काही समाज कंटकांकडून खतपाणी घालून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याने या प्रकरणात लक्ष घालून या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अठरा पगड जातीच्या महाराष्ट्रात संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबा यांच्यासह महात्मा चक्रधर, सकळ संताची परंपरा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आहे. अशा कितीतरी महान विभूतींनी घडविलेल्या महाराष्ट्र राज्यात सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. परंतु राज्यात गेल्या काही महिन्यांपासून व गेल्या आठवड्याभरात सतत काही असामाजिक प्रवृत्तींकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचार करून दंगली घडविण्याचे प्रकार सुरू आहेत.
दररोज एका शहरात दंगल घडविण्याचा प्रयत्न होतो. यामुळे सतत वातावरण धगधगत ठेवून राज्यात अशांतता पसरविण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे. राज्यातील दंगलसदृश्य परिस्थिती पाहता, राज्याचे राज्यपाल म्हणून आपण या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असल्याचे दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी...
राज्यात जातीय सलोखा पाळण्याचा राज्याचा इतिहास असला तरी गेल्या अडीच ते तीन महिन्यांत विशेषतः या आठवड्यात राज्याच्या विविध शहरांमध्ये 8 घटनाहून अधिक जातीय तणाव किंवा हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी अचानक औरंगजेबाचे फोटो ठेवून उदात्तीकरण केले गेले आणि त्यातूनही जातीय तणाव वाढीस लागला. राज्यात जातीय तणाव वाढत असून सतत राज्यात अशांतता पसरविण्याचे काम सुरू आहे. पोलीस यंत्रणा जरी त्यांचे काम करत असली तरी या सर्व घटना रोखण्यात कुठेतरी सरकारलाही अपयश येत असल्याचे दानवे म्हणाले. तर राज्याचे प्रथम नागरिक म्हणून आपण या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: