GST Raid: जालना शहरात जीएसटी विभागाची होलसेल दुकानांवर धाडी; व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ
GST Raid In Jalna: जालना शहरात पाच ते सहा दुकानांवर जीएसटी विभागाने ही कारवाई केली आहे.
GST Raid In Jalna: गेल्या काही महिन्यांपासून जालना शहरातील व्यापारी कधी आयकर तर कधी जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत. दरम्यान गुरुवारी पुन्हा एकदा जीएसटी विभागाच्या पथकाने जालन्यात जुन्या मोंढा परिसरात असलेल्या होलसेल दुकानांवर धाडी टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून, जालना शहरात पाच ते सहा दुकानांवर जीएसटी विभागाने ही कारवाई केली आहे.
एकीकडे सर्वत्र दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, जालना शहारत जीएसटी विभागाने कारवाईची आतिषबाजी केली. शहरातील जुना मोंढा भागातील पाच ते सहा होलसेल दुकानांवर जीएसटी विभागाने अचानक छापे टाकले. यावेळी कारवाईसाठी 25 ते 30 अधिकाऱ्यांचे पथक शहरात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कारवाईत अधिकाऱ्यांनी दुकानदारांकडून काही कागदपत्रे आणि बिल ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या कारवाईमुळे शहरात व्यापारी वर्गात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
सणासुदीच्या काळात धाडी...
यापूर्वी स्टील कंपन्यांवर धाडी टाकणाऱ्या जीएसटी विभागाने गुरुवारी अचानक होलसेल दुकानांवर धाडी टाकल्या. विशेष म्हणजे वर्षातील सर्वात मोठा सण समजला जाणारा दिवाळीसारखा सण होलसेल दुकानदारांसाठी महत्वाचा असतो. याकाळात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र जीएसटी विभागाने याच काळात अचानक धाडी टाकल्याने होलसेल दुकानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर कालच्या कारवाईमुळे आज देखील काही दुकाने बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईत जीएसटी विभागाला नेमकं काय सापडले याबाबत अजून कोणतेही अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.