(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: औरंगाबादच्या ऑरिक सिटीला 'समृध्दी'ला तातडीने जोडण्याचे उद्योगमंत्र्यांचे निर्देश
Uday Samant: समृध्दी महामार्गाशी (Samruddhi Highway) ऑरिक सिटीला जोडल्यास गुंवणूकीत नक्कीच वाढ होणार: उद्योगमंत्री उदय सामंत
Aurangabad News: जगाच्या नकाशावर आलेल्या ऑरिक सिटीमध्ये (Auric City) अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यास इच्छूक आहेत. तर ऑरिक सिटीच्या जवळून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाशी (Samruddhi Highway) ऑरिक सिटीला जोडल्यास गुंवणूकीत नक्कीच वाढ होणार असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने हे काम पूर्ण करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले. ऑरिक सिटीला उद्योगमंत्र्यांनी शुक्रवारी भेट देऊन येथील उद्योजक तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना उद्योगमंत्री म्हणाले की, ऑरिक सिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू आहेत आणि अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. ऑरिक सिटीपासून केवळ 900 मीटरवरून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाला ऑरिक सिटी जोडल्यास नक्कीच फायदा होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुण्याशी कनेक्टीव्हीटी वाढून वेळेची बचत होणार असल्याने उद्योजक मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील. उद्योग वाढीसाठी काही नवीन योजना सुरू करता येतील का? याचाही विचार करण्यात येत आहे. ऑरिक सिटीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्याचे नियोजन करावे, ट्रक टर्मिनल उभारावे, रहिवाशी वसाहतींमधील समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी देखील प्रयत्न करण्याचे निर्देश उद्योगमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तर याचवेळी उद्योगमंत्र्यांनी पैठण, वैजापूर तसेच करमाड परिसरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी उद्योगमंत्री म्हणाले, उद्योजक आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवावा. इतर काही समस्या असल्यास तसा प्रस्ताव पाठवावा आणि त्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी दिवाळीतनंतर मुंबईत बैठक घेणार असल्याचेही उद्योगमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्री भुमरेंनी मांडल्या समस्या...
पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण एमआयडीसीतील समस्या उद्योगमंत्र्यांना सांगितल्या. गेवराई तांडा ते वाळुज रस्ता बनविल्यास या क्षेत्रातील उद्योगांना भरारी मिळणार असल्याने यावर तातडीने करावी, उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकरी द्यावी तसेच सीएसआर हा जिल्ह्यातील विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी उद्योजकांना सूचित करण्याची विनंती देखील भुमरे यांनी उद्योगमंत्र्यांना केली.
ऑरिक सिटीमध्ये उद्योग कधी येणार?
औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री यांनी अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचा दावा केला. मात्र दहा हजार हेक्टर जमीन संपादन करून तयार करण्यात आलेल्या ऑरिक सिटीमध्ये मोजकेच उद्योग आले आहे. तर बिडकीन भागात तर अजून एकही कंपनी प्रत्यक्षात आलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑरिक सिटीमध्ये उद्योग कधी येणार असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला आहे.