काळी टोपी हायहाय...! राज्यपालांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक; औरंगाबादच्या क्रांती चौकात आंदोलन
Aurangabad : यावेळी काळी टोपी आणि काळी रुमाल घालून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Aurangabad News: औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या 62 वा दीक्षान्त समारंभाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले असून, त्यांच्यावर टीका होत आहे. 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे आदर्श असल्याचं विधान करणाऱ्या कोश्यारी यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये ठाकरे गटासह मराठा संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचे अपमान केल्याचा आरोप करत औरंगाबादच्या क्रांती चौकात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मराठा संघटनांकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. तर राज्यपाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. राज्यपाल यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. तसेच नेहमी वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांना केंद्राने परत बोलवून घेण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे. तर यावेळी काळी टोपी आणि काळी रुमाल घालून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे.
आंदोलक आक्रमक...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल यांच्याविरूद्ध आंदोलनकर्ते आक्रमक होतांना पाहायला मिळाले. यावेळी राज्यपाल यांच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले. तर 'कोश्यारी हायहाय' अशा घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर यावेळी महिला आंदोलकांनी देखील घोषणाबाजी करत राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला.
दानवेंची टीका..
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल यांच्यावर जोरदार टीका केली. कोश्यारी हे राज्यपाल आहे, मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आज महाराष्ट्रातील प्रत्येकजण त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत आहे. राज्यपाल पदाची प्रतिमा त्यांनी धुळीस मिळवली आहे. त्यामुळे कोश्यारी सारख्या प्रवृत्तीला आता ठेचण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे अशा प्रवृत्तीला पाठींबा देण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप देखील अंबादास दानवे यांनी यावेळी केला.
मनसेकडूनही आंदोलन...
छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात औरंगाबाद मनसेकडून देखील आंदोलन करण्याची घोषण करण्यात आली आहे. आज दुपारी 1 वाजता शहरातील टीव्ही सेंटर येथे मनसेकडून राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यपालांच्या विधानाचे राजकीय पडसाद सर्वत्र उमटताना पाहायला मिळत आहे.