Aurangabad: औरंगाबादमधील पीक नुकसान भरपाईसाठी शासनाकडे 695 कोटींची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Aurangabad News: पंचनाम्याअंती सुधारित 695 कोटींची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरशः झोडून काढले असून, मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यानंतर प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास सुरवात केली आहे. तर पुढील आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्ह्यात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे 695 कोटी रुपयांची मदत शासनाकडून मिळावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी यांनी दिली आहे. त्यामुळे आता ही निधी कधी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात जिल्ह्यात 6 लाख 71 हजार 426 हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी झाली आहे. त्यातील 12 हजार 679 हेक्टरवरील पीक सततच्या पावसामुळे वाया गेले. मागील दोन महिन्यांत झालेल्या पावसामुळे 4 लाख 43 हजार 943 हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 628 कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती, मात्र पंचनाम्याअंती सुधारित 695 कोटींची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
अशी आहे आकडेवारी...
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार 4 लाख 30 हजार 742 हेक्टर जिरायती क्षेत्र असून 6 हजार 234 बागायती आणि 6 हजार 967 फळपिकांचे क्षेत्र आहे. सर्वाधिक बाधित क्षेत्र जिरायतीचे असून त्या मोबदल्यासाठी 585 कोटी निधी लागणार आहे. तर बागायतीसाठी 17 कोटी आणि फळबागांसाठी 25 कोटी लागणार आहे. त्यामुळे शासनाला सुधारित मागणीनुसार 695 कोटींचा प्रस्ताव सादर केला असल्याचे जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान...
गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीचा फटका बसणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याला यावेळी देखील अतिवृष्टी फटका बसला आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. ज्यात सोयाबीन, कापूस, मका आणि बाजरीसह इतर पीकांची समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सतत नुकसानभरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे. त्यातच आता जिल्हा प्रशासनाने नुकसानभरपाईसाठी 695 कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे.
मराठवाड्याच्या नुकसानभरपाईसाठी लागणार 2400 कोटी...
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात 17 लाख 70 हजार 748 हेक्टरवर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहेत. ज्यासाठी 2400 कोटी रुपये नुकसानभरपाईसाठी लागणार आहे. याबाबत विभागीय प्रशासनाने वरिष्ठ पातळावर अहवाल पाठवला असून, तशी मागणी देखील केली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
'शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीकविम्याचे कवच'; कृषिमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती