Video: जल्लोष करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांची प्रतिक्रिया घेतली नाही म्हणून पत्रकाराला मारहाण
Aurangabad Crime News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन काही तास उलटत नाही, तो त्यांच्या समर्थकांनी पत्रकाराला केली मारहाण.
Aurangabad News: शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी अखेर भाजपसोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यभरात बंडखोर आमदारांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला. मात्र औरंगाबादच्या बिडकीन गावात जल्लोष करणाऱ्या एका मुख्यमंत्र्यांच्या समर्थकाने प्रतिक्रिया घेतली नाही म्हणून 'यु ट्यूबच्या पत्रकारा'ला मारहाण केली आहे. तर या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. औरंगाबादमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला. दरम्यान पैठण तालुक्यातील बिडकीन येथील बस स्टॅन्ड परिसरात काही शिंदे समर्थकांनी सुद्धा जल्लोष केला. त्यामुळे जल्लोषाची बातमी करण्यासाठी गेलेल्या एका यु ट्यूबच्या पत्रकाराने या समर्थकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या नेत्याची प्रतिक्रिया का घेत नाही म्हणून, एका शिंदे समर्थकाने त्या पत्रकाराला थेट मारहाण सुरु केली. आधी चापट आणि नंतर लाथ मारली. या मारहाणीचा व्हिडिओ सद्या सोशल मिडीयावर फिरत आहे.
गुन्हा दाखल...
याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दिलीप जोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डिगंबर तुळशीराम कोथंबिरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक जल्लोष करत असताना, त्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलो असता, डिगंबर याने शिवीगाळ करत मारहाण केल्याच तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. मात्र तो सद्या फरार झाला आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष...
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयाबाहेर सुद्धा जोरदार जल्लोष करण्यात आला. संदीपान भुमरे यांच्या गारखेडा परिसरातील कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. तर संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी सुद्धा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड येथील कार्यालयात सुद्धा जल्लोष करण्यात आला. तर आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जल्लोष केला आहे. त्यामुळे आता या आमदारांपैकी कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.