संतापजनक! सतरा वर्षीय मूकबधिर मुलीवर गावातील व्यक्तीकडूनच लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत
Aurangabad Crime: आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय मूकबधिर मुलीवर गावातील व्यक्तीकडूनच लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या घरात कुणीच नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला देखील अटक करण्यात आले असून, आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. मोरू रामू राठोड असे नराधम आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तर पिडीत मुलगी मूकबधिर असल्याने तिला बोलता येत नाही, सोबतच तिची बुद्धी देखील कमी आहे. दरम्यान 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास मुलीचे आई-वडील घरात नसल्याचा फायदा घेत आरोपी मोरू राठोड पिडीत मुलीच्या घरात घुसला. घरत कोणीच नसल्याने आणि मुलीला बोलता येत नसल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तेथून फरार झाला.
आईची पोलिसात धाव...
घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने पिडीत मुलीचे आई-वडील मोलमजुरी करून घर चालवतात. दरम्यान संध्याकाळी घरी परतल्यावर मुलीने आईला घडलेल्या प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आईने मुलीची अधिक चौकशी केली असता तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे मुलीच्या आईने कन्नड शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार मोरू राठोड विरोधात पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीला अटक करण्यात आली असून, आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Aurangabad Fire News: ऐन दिवाळीच्या दिवशीच घराला आग लागली अन् होत्याचं नव्हतं झालं; पण सुदैवाने...
माहेरावरून पैसे आणण्यासाठी मारहाण...
दुसऱ्या एका घटनेत विवाहित महिलेला नवऱ्यासह इतर सासरच्या मंडळींनी घरबांधणीसाठी माहेरावरून 4 लाख रुपये आणण्याच्या कारणावरून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीणच्या वडोद बाजार पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार घरबांधण्यासाठी माहेरावरून 04 लाख रूपये आणावे म्हणुन, सासरच्या मंडळींनी शरिरीक व मानसिक छळ करून व शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लक्ष्मण पंडीत दुधे, भारत पंडीत दुधे, धुपताबाई पंडीत दुधे, मिरा भारत दुधे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.