(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathwada: मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता
Marathwada Rain Update: जून महिन्याच्या सुरवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Marathwada Rain Update: मृग नक्षत्र सुरु झाले असून, मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच आता मराठवाड्यात पुढील आणखी तीन दिवस काही भागात वादळीवारा, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाचे डॉ. के.के. डाखोरे यांनी हा अंदाज वर्तवला आहे.
डाखोरे यांच्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात 13 जून, 14 जून व 15 जून रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी 40 ते 50 किलोमीटर) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करत असताना काळजी घेण्याची गरज आहे.
वीज पडून आठ जणांचा मृत्यू....
मराठवाड्यात गेल्या चार दिवसात आठ जणांचा वीज पडून मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. अंगावर वीज पडून जालना जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला तर, दोन जण जखमी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी आहे. फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील रवी जनार्दन कळसकर (वय 22), रोहन विजय शिंदे (वय 15, दोघेही रा. साताळा ता. फुलंब्री) शेतात काम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील सावखेडा (उटाडेवाडी) येथील संजय नथ्थू उटाडे (45) हे आपल्या शेतात ठिबक सिंचनाच्या पाईपलाइनचे काम करत असताना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे अंगावर वीज पडून गजानन हरिश्चंद्र दराडे (27) या तरुणाचा मृत्यू झाला. तसेच आडगाव जावळे येथे घरावर वीज पडल्याने सरुबाई शहादेव लांडे ( वय 40 वर्षे) यांचा मृत्यू झाला.
जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील कोदा येथे शेतात काम करत असताना गंगाबाई पांडुरंग जाधव यांचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. मंठा तालुक्यातील पेवा येथील शेतकरी अनिल भारत शिंदे (22) शनिवारी आपल्या शेतात काम करीत असताना विजेचा कडकडाट सुरू झाला. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत माळकिणी येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना वसंत वामनराव जाधव (50) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.