Maharashtra Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप-शिंदे गट एकत्र लढवणार?; भाजप नेत्याकडून मोठा खुलासा
Maharashtra Elections: आगामी निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत मिळून लढवण्याबाबत भाजपकडून पहिल्यांदाच उघडपणे बोलण्यात आले आहे.
Maharashtra Elections: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घटक पक्षाबरोबर शिंदे गटातील प्रतिनिधी आमच्यासोबत आल्यास त्यांना सुद्धा सामील करून घेऊ अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप एकत्र लढण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे...
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना दानवे म्हणाले की, शिवसेनेचे 12 खासदार पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. तर मूळ शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे. यापूर्वी सुद्धा मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांच्या वादात सायकल चिन्ह मुलायम सिंह यांच्या ऐवजीं अखिलेश यादव यांना आले होते. त्यामुळे मला असं वाटत हे प्रकरण कोर्टात गेलं तर निवडणूक आयोग असो की न्यायालय 2/3 बहुमत असल्याने खरी शिवसेना शिंदे यांचीच असल्याचे सिद्ध होईल. तर याचवेळी बोलतांना दानवे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घटक पक्षाबरोबर शिंदे गटातील प्रतिनिधी आमच्यासोबत आल्यास त्यांना सुद्धा सामील करून घेऊ असे दानवे म्हणाले.
तर उद्धव ठाकरेंचं स्वागत करू...
दरम्यान राष्ट्रपती निवडणुकीबाबत बोलतांना दानवे म्हणाले की, भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे दानवे म्हणाले. तर राष्ट्रवादीकडून 27 टक्के ओबीसी उमेदवार देण्याच्या घोषणेबाबत बोलतांना दानवे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत भाजपने अगोदरच भूमिका घेतली असून, ओबीसी उमेदवारांना आरक्षणाप्रमाणे उमेदवारी देणार असल्याचे देखील स्पष्ट केलं असल्याचं दानवे म्हणाले.