Rajya Sabha Election 2022: मुंगेरीलालचे स्वप्न पूर्ण होणार नाही, संध्याकाळी गुलाल आमचाच: सत्तार
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा दावा सत्तार यांनी केला आहे.
Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (10 जून) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असल्याने एक एक मत महत्त्वाचं आहे. तर भारतीय जनता पार्टीचे मुंगेरीलालचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नसून, संध्याकाळी गुलाल आमचाच असणार असल्याचा दावा शिवसेने नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. तर याचवेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा सुद्धा साधला आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देतांना सत्तार म्हणाले की, संध्याकाळी आमचे चारही उमेदवार कोठ्यापेक्षा एक-एक मतदान शिल्लक घेऊन निवडून येतील यामध्ये कुठेही शंका नाही. कुणी काहीही बोललं तरीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार आणि बाळासाहेब थोरात या तिघेही नेत्यांनी जे नियोजन केले आहे. या नियोजनबद्ध लोकं मतदान करणार असल्याच सत्तार म्हणाले.
भाजपवर टीका...
तर पुढे बोलताना सत्तार यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधत टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीने हा जो खेळ खेळला आहे, त्याला धडा शिकवण्याचा काम महाविकास आघाडीसह सर्वच अपक्ष आमदार दाखवणार अशी टीका सत्तार यांनी केली आहे.
दानवेंचा मुलगा माझ्यासोबत...
सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असल्याने शिवसेना आणि भाजपसाठी एक एक मत महत्त्वाचं आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून अपक्ष आमदारांची मनधरणी सुरु आहे. मात्र सत्तार यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे माझ्यासोबत असणार असल्याचा दावा सत्तार यांनी केला आहे.